हिंदू हाच जगातील एकमेव धर्म

0
141

– उर्वरित सर्व संप्रदाय
– सरसंघचालकांचे प्रतिपादन
हरिद्वार/नवी दिल्ली, १२ सप्टेंबर
जगात हिंदू हाच एकमेव धर्म आहे आणि उर्वरित सर्व संप्रदाय आहेत. आपण सारेच जण मुळात हिंदू आहोत. हिंदू धर्माची दारे इतर सर्वांसाठी नेहमीच खुली आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत भागवत यांनी येथे केले.
पतंजली योगपीठात सोमवारी आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. डॉ. मोहनजींच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जगात हिंदू हाच एकमेव धर्म आहे आणि या धर्माचे दरवाजे सर्वांसाठीच खुले आहेत. आम्ही हिंदू निर्माण करीत नाही. कारण आपल्या सर्वांचे पूर्वज हिंदूच आहेत, असे सरसंघचालक म्हणाले.
तत्पूर्वी, डॉ. मोहनजी भागवत यांचे पतंजली योगपीठात आगमन झाल्यानंतर योगगुरू रामदेव बाबा आणि इतर सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रामदेव बाबा यांनी मोहनजींना गदा भेट देताना हिंदुत्वाची मशाल अशीच तेवत ठेवा, असे आवाहन केले. योगपीठात जाण्यापूर्वी सरसंघचालकांनी कनखल येथील सूरतगिरी आश्रमात गंगा पूजन आणि आरती केली. त्यानंतर संतांनी त्यांना आशीर्वाद देऊन दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनीही सूरतगिरी आश्रमात सरसंघचालकांची भेट घेतली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रावत यांनी त्यांना पुस्तक आणि केदारनाथांचे स्मृतिचिन्ह भेट दिले. यावेळी कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा आणि कॅप्टन मनोज पांडे यांच्या आई-वडिलांचा सरसंघचालकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सोशल मीडियाचा गैरवापर नाही
रा. स्व. संघ कधीच सोशल मीडियावरील प्रक्षोभक वक्तव्यांचे समर्थन करीत नाही आणि असे करणार्‍यांच्या पाठीशीदेखील उभा राहात नाही. संघाने कधीच आक्रमक भूमिका मान्य केली नाही, तसेच संघाने कधीच कुणाशी भेदभावही केला नाही, असे सरसंघचालकांनी ५० मिशनमधून आलेल्या विदेशी राजदूतांशी संवाद साधताना स्पष्ट केले. प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश हेही या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनीच ट्विट करून सरसंघचालकांच्या भूमिकेची माहिती दिली.
या कार्यक्रमात राजदूतांना मार्गदर्शन करण्यासोबतच डॉ. भागवत यांनी प्रश्‍नांची मनमोकळी उत्तरेही दिली. इंडिया फाऊंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रा. स्व. संघ विविध क्षेत्रांमध्ये सुमारे १.७० लाख सेवा प्रकल्प हाताळत आहे. यात आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. यातील सर्वच किंवा आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकल्पाला आपण भेट देऊ शकता, असेही मोहनजी यांनी सांगितले.
भाजपा आणि संघ वेगळा
संघ कधीच भाजपाचा कारभार चालवत नाही आणि भाजपाही संघाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. आम्ही सर्वच स्वयंसेवक असल्याने आम्ही केवळ सल्लामसलत करतो आणि एकमेकांचे मत जाणून घेतो. पण, काम करणे आणि निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेतली जाते, अस सरसंघचालकांनी स्पष्ट केले असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी ट्विटरवरून दिली.