अहंकारामुळेच कॉंगे्रसचा पराभव

0
88

– राहुल गांधी यांची जाहीर कबुली
-२०१२ मध्ये पक्षाचे नेते झाले होते उद्धट 
– लोकांशी बोलायला तयार नव्हते
– संपूर्ण देशातच घराणेशाही, मलाच दोष का?
– मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज
कॅलिफोर्निया, १२ सप्टेंबर 
२०१२ या वर्षात कॉंगे्रसमध्ये प्रचंड अहंकार संचारला होता. पक्षाचे नेते इतके उद्धट झाले होते की, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधणेही बंद केले होते. सतत दहा वर्षे सत्तेत राहण्याचा हा परिणाम होता. पुन्हा एकदा आपलीच सत्ता येणार, या  भ्रमात आम्ही राहिलो आणि त्यामुळे अहंकार आणखीच वाढला. या अहंकारामुळेच २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्हाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला, अशी जाहीर कबुली कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मंगळवारी येथे दिली.
२००४ मध्ये आम्ही जो आराखडा तयार केला होता, तो आगामी दहा वर्षांसाठी होता. पण, २०१०-११ या वर्षात आल्यानंतर आम्हाला कमालीचा गर्व आला होता. त्यामुळे पुढील धोरण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. २०१२ मध्ये तर आमच्या प्रत्येकच नेता प्रचंड अहंकारी झाला होता. लोकांशी संवाद साधायचा, त्यांच्या समस्या ऐकायच्या हे सर्व प्रकार बंद झाले होते, असे राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले.ओघानेच त्यांनी घराणेशाहीवरही आपले मत मांडले. भारत देश याच घराणेशाहीवर चालतो. फक्त माझ्याबद्दल बोलू नका. अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, धूमलची मुलेही माझ्याप्रमाणेच संबंधित घराण्यातील आहेत. मुकेश अंबानी, अभिषेक बच्चनही घराणेशाहीचेच वंशज आहेत आणि अशाप्रकारेच संपूर्ण देश चालत आहे. पण, कॉंगे्रसमध्ये असेही अनेक नेते आहेत, ज्यांचा घराणेशाहीशी काहीच संबंध नाही. प्रत्येक राज्यात असे अनेक नेते आहेत आणि त्यांचे नावही मी सांगू शकतो. तिथेच, आई-वडील, आजी आणि आजोबांच्या प्रभावामुळे राजकारणात आलेल्या लोकांची संख्याही कमी नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी आता मी पूर्णपणे सज्ज आहे. तथापि, माझ्यावर जबाबदारी सोपवायची की नाही, हा निर्णय पक्षालाच घ्यायचा आहे. आमच्या देशात संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागते. ती सध्या सुरू आहे. मी एकटा निर्णय घेत नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची समिती असते, असेही  राहुल म्हणाले.
काश्मीरमध्ये दहशतवाद वाढला
काश्मीरमधील स्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. आमच्या सत्ताकाळात डॉ. मनमोहन सिंग, पी. चिद्‌म्बरम्, जयराम रमेश आणि इतरांसह मी स्वत: दहशतवाद नष्ट करण्यासाठी काम केले. आम्ही सुरुवात केली तेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद वाढला होता. २०१३ पर्यंत आम्ही दहशतवादाचे कंबरडे मोडले होते. यानंतर मी मनमोहन सिंग यांना मिठी मारली व हे आपल्या सर्वात मोठ्या यशापैकी एक असल्याचे म्हटले होते.
नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ते आहेत. नरेंद्र मोदी हे माझेही पंतप्रधान आहेत. त्यांच्यात अनेक चांगले गुण आहेत. त्यांची संवादशैली माझ्यापेक्षाही उत्तम आहे. गर्दीत तीन-चार समुहांना काय संदेश द्यायचा हे त्यांना चांगले माहीत आहे. एखादा संदेश देण्याची त्यांची क्षमता अतिशय प्रभावी आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी यांची स्तुती केली. त्याचवेळी पंतप्रधानांवर त्यांनी टीका केली. नरेंद्र मोदी यांची आर्थिक धोरणे देशाचे नुकसान करणारी आहे. नोटबंदी आणि जीएसटी घाईघाईने लागू करण्याचा निर्णय देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारा आहे. ८ नोव्हेंबर रोजीचा नोटबंदीचा निर्णय मोदी यांनी एकतर्फीच घेतला होता. आर्थिक सल्लागार आणि संसदेचे मतही विचारात घेण्यात आले नव्हते. या निर्णयाची फार मोठी किंमत भारताला चुकवावी लागली. (वृत्तसंस्था)