पिंटो कुटुंबीयांनी मुंबई, दिल्ली कशी काबीज केली?

0
35

– प्लॅस्टिक कंपनीत कामगार ते रायन ग्रुपचे संचालक
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर  
७ वर्षीय प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूल ग्रुपच्या व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली मुंबईसह देशभरात अत्यंत वेगाने या शाळेने आपले जाळे पसरवले. ऑगस्टिन पिंटो नावाच्या एका सामान्य कर्मचार्‍याने रायन इंटरनॅशनलच्या अनेक शाळा सुरू करण्यात कसे यश मिळवले याची कहाणी थक्क करणारी आहे.
१९७६ मध्ये अवघ्या एका शाळेपासून सुरू झालेले रायन इंटरनॅशनल स्कूलचे जाळे आज देशातच नव्हे तर विदेशातही पसरले आहे. आज देशात १३० पेक्षा अधिक रायनच्या शाळा चालतात. १८ हजार शिक्षक, २ लाख ७० हजार विद्यार्थी इतका मोठा पसारा एकट्या रायनचा आहे. पण, हे सगळे साम्राज्य नेमके उभे कसे राहिले? कोण आहेत हे पिंटो जे कर्नाटकातून मुंबईत आले आणि नंतर त्यांनी दिल्लीही काबीज केली?, असे अनेक प्रश्‍न पडल्यावाचून राहात नाही. ऑगस्टिन एफ. पिंटो हे मूळचे कर्नाटकच्या मंगळूरमधील रहिवासी. अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर ते १९७० मध्ये नोकरी शोधण्यासाठी मुंबईत आले. भारत स्विस प्लॅस्टिक नावाच्या कंपनीत त्यांची क्लार्क म्हणून नेमणूक झाली. पण अवघ्या दोनच वर्षात कंपनी बंद पडली आणि त्यांची नोकरी गेली. एका मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी मालाडमधील एका प्राथमिक शाळेत नोकरी स्वीकारली आणि तिथून त्यांची शिक्षणक्षेत्राशी पहिली नाळ जोडली गेली. शिक्षकाची नोकरी करत असतानाच ते ग्रेस अल्बकुर्क या गणित शिक्षिकेच्या प्रेमात पडले आणि १९७४ मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांच्या समोर एकच समान ध्येय होते, ते म्हणजे इंग्रजी शिक्षण देण्यासाठी शाळा उघडणे.
अवघ्या १० हजार रुपयांत त्यांनी पहिली शाळा मुंबईच्या बोरीवलीमध्ये सुरू केली. परंतु, हा पहिला संयुक्त उपक्रम काही फार यशस्वी झाला नाही, त्यांच्यावर शाळा बंद करण्याची वेळ आली. पण, १९८३ मध्ये त्यांनी सेंट झेवियर्स स्कूल नावाने पुन्हा एक शाळा उघडली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. ग्रेस अल्बकुर्क आता मॅडम पिंटोंच्या नावाने ओळखल्या जातात. रायन ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या काम करतात. अतिशय कॉर्पोरट स्टाईलने या शाळेचे व्यवस्थापन काम करते. पिंटोंचे देशातल्या सर्वपक्षीय बड्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. शाळेसाठी काही काम निघाले की ते करून घेण्यासाठी हे संबंध त्या हुशारीने वापरायच्या. शिवाय नेत्यांना आपल्या मतदारसंघात असे नामांकित इंग्लिश  स्कूल आणले की फायदा व्हायचाच. त्यामुळे फायद्यासाठी दोघेही
एकमेकांवर अवलंबून असायचे. २०१४ च्या आसपास देशात मोदी लाट दिसू लागल्यावर रायन व्यवस्थापनाने काळाची पावले वेळीच ओळखली. याच रायन इंटरनॅशनल स्कूलबद्दल २०१५ मध्ये एक मोठा वाद झाला होता. कारण पिंटो आणि कंपनीने शाळेतील कर्मचार्‍यांना सक्तीने भाजपा सदस्य करून घेण्याचे अभियान सुरू केले असा तेव्हा आरोप झाला होता. माध्यमामध्ये याच्या बातम्या आल्यानंतर हा प्रकार थंडावला. पण त्यामुळे पिंटो यांच्या भाजपा संबंधांची जोरदार चर्चा झाली. (वृत्तसंस्था)