सीतारामन् यांचा धडाका सुरू

0
59

रोज घेणार तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर  
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आपल्या कामाचा धडाका आता सुरू केला आहे. देशाची सुरक्षा मजबूत राहील, यासाठी त्या यापुढे दररोज तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार आहेत.देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या मुद्यांवर जलद निर्णय व्हावे, यासाठी सीतारामन् यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या मते, संरक्षण सामुग्रीच्या खरेदीबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेची यापुढे प्रत्येक १५ दिवसात एकदा बैठक घेण्यात येणार आहे. यामुळे संरक्षणविषयक महत्त्वाच्या प्रस्तावांना वेळेत मंजुरी देता येणार आहे. तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसोबतच त्या संरक्षण सचिवांसोबतही दररोज वेगळी बैठक घेणार आहेत.
देशाची संरक्षणविषयक तयारी आणि नौदलाच्या सज्जतेसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तिन्ही सैन्यदल प्रमुखांसोबत घेण्यात येणार्‍या बैठकीची रूपरेषा तयार करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सीतारामन् यांनी सोमवारी संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले होते. लष्कराच्या मालकीच्या जमिनींशी संबंधित बाबी आणि पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. (वृत्तसंस्था)