पाकवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चा असा हा थरार!

0
41

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर  
भारतीय लष्कराने गेल्या वर्षी २८-२९ सप्टेंबरच्या रात्री सीमापार जाऊन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करुन सर्जिकल स्ट्राईक केला होता. यात जवळजवळ पन्नासाहून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. पण, सर्जिकल स्ट्राईक करणे आणि पुन्हा सुरक्षित माघारी परतणे हे लष्करी जवानांसाठी वाटते तेवढे सोपे नव्हते. कारण सर्जिकल स्ट्राईक आटोपून जेव्हा भारतीय जवान माघारी परतत होते त्यावेळी अचानक पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू झाला. यात काही गोळ्या जवानांच्या अगदी कानाच्या बाजूने गेल्या होत्या पण, सुदैवाने कोणतीही जीवितहानी तेव्हा झाली नाही.
सर्जिकल स्ट्राईक टीमचे नेतृत्व करणार्‍या मेजर माईक टँगो (बदललेले नाव) यांनी ‘इंडियाज मोस्ट फीयरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिट्री हीरोज’ या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकच्या त्या रात्रीचा थरार मांडला आहे. हे पुस्तक शिव अरुर आणि राहुल सिंह यांनी लिहिले आहे. यामध्ये सर्जिकल स्ट्राईकबाबतच्या १४ गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.उरी हल्ल्यात आपले जवान ज्या लष्करी तुकडीने गमावले होते. त्याच दोन तुकडीतील जवानांची सर्जिकल स्ट्राईकसाठी निवड करण्यात आली. कारण की, त्यांना सीमेपलीकडील भाग बर्‍यापैकी माहिती होता, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या लॉंचिंग पॅड्सवर हल्ला करण्याचे ठरले होते. पण या लॉंचिंग पॅड्‌सला पाकिस्तानी लष्कराचेही संरक्षण होते. दहशतवाद्यांवर हल्ला करून भारतीय जवान माघारी येत असताना पाकिस्तानी लष्कराला याची कुणकूण लागली आणि त्यांनी थेट गोळीबार सुरू केला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने भारतीय जवान अजिबात घाबरले नाहीत. पण नियंत्रण रेषेजवळील रस्ता चढणीचा होता. त्यामुळे ज्या दिशेने गोळीबार सुरू होता, त्या दिशेकडे जवानांची पाठ होती. त्यामुळे भारतीय जवान थेट त्यांच्या निशाण्यावर होते, असे मेजर टँगो यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
ज्या मार्गाने आम्ही गुलाम काश्मीरमध्ये घुसलो होतो, त्याच मार्गाने परत न जाण्याचे ठरले होते. त्याऐवजी आम्ही दुसरा मार्ग निवडला होता. पण हा मार्ग बराच दूरवरचा आणि थोडा गुंतागुंतीचाही होता. पण तुलनेने बर्‍यापैकी सुरक्षित होता. म्हणून आम्ही त्याची निवड केली होती. पण पाकिस्तानी लष्कराने त्याच दिशेने गोळीबार सुरू केला. अनेकदा माझ्या कानाच्या बाजूने काही गोळ्या गेल्या, असा थरारक अनुभव मेजर टँगो यांनी सांगितला आहे.
टीम लीडर म्हणून मेजर टँगो यांनीच जवानांची निवड केली होती. त्यामुळे १९ जवान सुखरूपपणे लष्कराच्या तळावर पोहचतील की नाही याची त्यांना भीती वाटत होती. आपण आपले जवान गमावू अशी भीती टँगो यांना वाटत होती. पण, सुदैवाने भारतीय जवान पुन्हा सुखरूपणे आपल्या तळावर परतल्याने मी सुटकेचा निश्‍वास सोडला, असा अनुभव टँगो यांनी कथन केला. दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून मदत मिळते ही गोष्ट आता जगजाहीर झाली आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळीही ही गोष्ट समोर आली आहे. सूत्रांच्या मते, दहशतवाद्यांना अशी अजिबात अपेक्षा नव्हती की, भारतीय लष्कर थेट आत घुसून मारा करतील. त्यामुळेच ते या हल्ल्याने अवाक झाले आहे. (वृत्तसंस्था)