सीमेवरील नागरिकांना हवे स्वत:चे बंकर्स

0
30

-• पाकिस्तानचा वारंवार गोळीबार
नौशेरा, १२ सप्टेंबर 
पाकिस्तानी सैनिकांकडून वारंवार होणारा गोळीबार आणि तोफांचा मारा यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नियंत्रण रेषेवर राहणार्‍या नागरिकांनी आपल्या गावांमध्ये बंकर्सची मागणी केली आहे.
काही महिन्यांपूर्वी पाकी सैनिकांनी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार व तोफांचा मारा केला होता. यात चार नागरिक ठार व पाच जण जखमी झाले होते. अनेक घरे उद्‌ध्वस्त झाली होती. २३ गावांमधील पाच हजारावर लोकांना आपले घरदार सोडावे लागले होते. यातील बहुतांश लोक अजूनही सरकारी शाळांमध्ये राहात आहेत.
चार दिवसांच्या काश्मीर दौर्‍यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची सोमवारी या नागरिकांनी भेट घेतली आणि पाकी गोळीबारापासून आमचे व परिवाराचे रक्षण करता यावे, यासाठी जवानांप्रमाणेच आम्हालाही स्वत:चे बंकर्स उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली.
सीमावर्ती भागातील प्रत्येक घरात अशा प्रकारचे सुरक्षित बंकर असावे. कारण, आम्ही फार जास्त काळ आपल्या घरापासून दूर राहू शकत नाही.
आम्हाला आपल्या घरी परत जायचे आहे आणि तिथे सुरक्षित राहायचे आहे. जेवण तर आम्हाला मिळेलच, पण त्यापेक्षाही जास्त गरज आम्हाला बंकर्सची आहे, अशा आशयाचे निवेदन या नागरिकांनी राजनाथसिंह यांना सादर केले. (वृत्तसंस्था)