हा वाजपेयींचा भारत नाही

0
76

-• भाजपाच्या नोटीसवर गुहांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर 
‘हा अटलबिहारी वाजपेयींचा भारत नाही’ अशी प्रतिक्रिया भाजपाची नोटीस मिळाल्यानंतर प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आज मंगळवारी व्यक्त केली आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप गुहा यांनी केला होता. या आरोपावरून कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीसांनी रामचंद्र गुहा यांना नोटीस बजावली आहे. भाजपाकडून नोटीस मिळाल्यानंतर ‘हा अटलबिहारी वाजपेयींचा भारत नाही’ असे ट्विट गुहा यांनी केले आहे. ‘भारतात आता स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. एवढेच नव्हे तर, त्यांची हत्या देखील केली जात आहे. पण आम्ही याच्यावर अजिबात शांत बसणार नाही. एखाद्या पुस्तकात किंवा लेखामध्ये केलेल्या लिखाणाचे उत्तर केवळ लेखणीतूनच देता येते असे वाजपेयी म्हणाले होते. मात्र, आता वाजपेयींचा हा भारत राहिलेला नाही’ असे गुहा यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी एका वाहिनीशी बोलताना केला होता. गुहा यांच्या आरोपांमुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीसांनी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांधी यांनीही आरोप पुराव्यासकट करावेत, असे भाजपाने म्हटले आहे.
लंकेश यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा. स्व. संघ आणि भाजपाविरोधात बोलणार्‍या प्रत्येकावर दबाव आणला जातो किंवा मारझोड केली जाते किंवा सरळ संपवलेही जाते, असे वक्तव्य केले होते. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खासदार बी. एस. येडियुरप्पा यांनी जर आपले आरोप सिद्ध करणारे पुरावे राहुल गांधी यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सरळ समोर मांडावेत असे आवाहन गांधी यांना केले आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांत टीका केली होती. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या बंगळुरू येथील राहत्या घरी मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर मारेकरी कोण असावेत यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. (वृत्तसंस्था)