बांगलादेशने घेतली पाकची जागा!

0
83

– बनावट भारतीय चलनाची तस्करी
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर 
नोटबंदीपूर्वी सर्वाधिक बनावट भारतीय चलनाची तस्करी करणारा देश राहिलेल्या पाकिस्तानची जागा नोटबंदीनंतरच्या काळात बांगलादेशने घेतली आहे. अलीकडील काळात बांगलादेशातून बनावट भारतीय चलनाची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. बनावट भारतीय चलनाचे अनेक छापखाने पाकमध्ये होते. या देशातून मोठ्या प्रमाणात बनावट चलन अतिरेकी व तस्करांच्या माध्यमातून भारतात पाठविले जात होते. यावर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे पाकमधील सर्व छापखाने बंद पडले होते.
केंद्र सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर ५०० व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या. पण, अलीकडील काळात या नोटाही बनावट स्वरूपात छापण्यास सुरुवात झाली. सीमेपलीकडून या बनावट नोटा भारतात तस्करी करून आणल्या जात असल्याचे अनेक घटनांवरून उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, हा शेजारी देश बांगलादेश असल्याचे समोर आले आहे. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफने या जप्त केलेल्या या बनावट नोटांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशात छापण्यात आलेल्या या बनावट भारतीय चलनाची सीमावर्ती भागातील १३ जिल्ह्यांमधून तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे. यात जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, प. बंगाल, आसाम आणि मेघालय या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापैकी ११ ठिकाणांहून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात बीएसएफने जप्त केलेल्या बनावट चलनाची किंमत ३२ लाख रुपये होती. २०१६ च्या शेवटी नोटबंदीनंतर हे प्रमाण कमी झाले होते. तर २०१५ मध्ये तब्बल २.६ कोटी रुपयांच्या बनावट नोटा गुवाहाटी आणि प. बंगालच्या दक्षिण भागातून जप्त करण्यात आल्या होत्या.
२०१६ च्या पहिल्या सहा महिन्यात दीड कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. सूत्रांच्या मते, बांगलादेशातील टोळी दोन हजार रुपये किमतीच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापण्यासाठी लागणारा कागद सौदी अरब आणि मलेशियातून आयात करतात. (वृत्तसंस्था)