भारत-बेलारूसमध्ये १० महत्त्वाचे करार

0
57

– पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्यात सखोल चर्चा
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर 
भारत आणि बेलारूसमध्ये आज मंगळवारी १० महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यात विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत आणि विस्तारित करण्याच्या कराराचाही समावेश आहे.
भारत भेटीवर आलेले बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर सखोल चर्चा झाली. द्विपक्षीय संबंधाला नवीन दिशा देण्यासोबतच लष्करी क्षेत्रातही संयुक्त उत्पादन करण्याचा आणि द्विपक्षीय विकासाला एकत्रित हातभार लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दोन्ही देशांना एकमेकांच्या देशात व्यापार व गुंतवणुकीला प्रचंड वाव असल्याने, द्विपक्षीय आर्थिक सहकार्य जास्तीतजास्त वाढविण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत आम्ही संरक्षण क्षेत्रात संयुक्त विकास आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणार आहोत.
आजच्या बैठकीत आम्ही द्विपक्षीय संबंधाचा नव्याने आढावा घेतला आणि ते आणखी विस्तारित करण्यासाठी उभयतांचे मत जाणून घेतले.
संरक्षण क्षेत्रातील संयुक्त विकासासोबतच तेल व वायू, शिक्षण आणि क्रीडा यासारख्या क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.
२५ वर्षांचा प्रवास…
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करताना सांगितले की, दोन्ही देशांच्या राजनयिक संबंधाना आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता या संबंधांना आपल्याला नव्या उंचीवर न्यायचे आहेत. आपल्याला हा द्विपक्षीय संबंधातील रौप्यमहोत्सव आगळ्याच पद्धतीने साजरा करायचा आहे.
लुकाशेंको आज सकाळी भारताच्या दोन दिवसांंच्या दौर्‍यावर आले आहेत. यावेळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत व्यावसायिक शिष्टमंडळही भारतात आले आहे. पंतप्रधानांसोबतच्या चर्चेनंतर त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेतली. (वृत्तसंस्था)