असत्संगाचा प्रश्‍न

0
40

कल्पवृक्ष
गेल्या काही दिवसात साधू, संत, गुरू, बाबा यांच्या बाबतीत संशयाचे, अविश्‍वासाचे वातावरण तयार झाले आहे. शेवटी काही संतमहंतांना एकत्र येऊन एक ब्लॅकलिस्ट घोषित करावी लागली. संत कुणाला म्हणावे, यासंबंधी काही प्रक्रिया असावी, असेही त्यांनी घोषित केले. ही वेळ आपल्या समाजावर यावी, हे आपल्या धर्माच्या, संस्कृतीच्या जागरणाचे, उत्थानाचे लक्षण आहे, की अध:पतनाचे? प्रश्‍न बारा-पंधरा लोक वाईट निघतात, त्यांचा नाही. केवळ या बाबांना नावे ठेवून, हा विषय संपत नाही. त्यांच्या मागे हजारो लोक का जातात, हा खरा सांस्कृतिक प्रश्‍न आहे. गेल्या काही वर्षांत, अशा बाबांच्या नावाने गर्दी जमा करणे, आपली संख्या वाढविणे, प्रचार करणे, राजकारणाकरिता धर्माचा उपयोग करून घेणे सुरू आहे, त्याचे हे अपरिहार्य परिणाम आहेत. समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचा मुख्य विषयच या प्रकारात बाजूला पडला आहे. धर्म हा शब्द या ठिकाणी प्रचलित अर्थाने वापरला आहे. समाजावर प्रभाव निर्माण करण्याच्या हव्यासातून खरे धर्मप्रबोधन दुय्यम झाले आहे. ‘‘धर्म केवळ पूर्वीच्या काळच्या अनुभवांवरच आधारलेला आहे, असे नव्हे, उलट स्वत:ला काही प्रत्यक्ष अनुभूती आल्याखेरीज कुणीही खरोखर धार्मिक या संज्ञेस प्राप्त होऊच शकणार नाही.’’ असे विवेकानंद नि:संदिग्ध शब्दांत सांगतात. त्यांनी आपल्या गुरूची वेळोवेळी परीक्षा घेतली आणि त्यांच्या गुरूचीही त्याला हरकत नव्हती. एकदा रामकृष्ण रात्री उठले आणि सारदामाता ज्या मठात राहात असत, तिकडे निघाले. त्यांचा एक शिष्य जागा होता. त्याच्या मनात संशय निर्माण झाला. तो बाहेर येऊन, हळूच रामकृष्णांच्या मागे गेला. रामकृष्ण थोडे समोर जाऊन एका कोपर्‍यात गेले. लघुशंका करून परत आले. परत येताना त्यांना शिष्य बाहेर उभा असलेला दिसला. ‘‘काय रे अजून झोपला नाही?’’ अशी त्याची चौकशी करून ते खोलीकडे परत गेले. दुसरे दिवशी शिष्याशी बोलताना रामकृष्ण म्हणाले, ‘‘शिष्याने गुरूविषयी शंका घेतलीच पाहिजे. गुरूची परीक्षा घेण्यात काहीही गैर नाही.’’ आपले सारे प्राचीन वा़ङ्‌मय शंकासमाधान, चर्चा, संभाषण, जिज्ञासा यावर आधारित आहे. अंधविश्‍वासाला त्यात कुठेही स्थान नाही. ‘आत्मदीपो भव:’ स्वत: दीप बना, हाच त्यांचा संदेश आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तो गुरू. आत्मविकासाची दिशा दाखवतो तो गुरू. डोके गहाण ठेवून माझी भक्ती कर, म्हणतो तो भोंदू. जो खरा मोठा असतो, तो साधा असतो, खुल्या मनाचा असतो, पारदर्शक असतो. आत आणि बाहेर, असे त्याचे दोन भाग नसतात. त्याचे जीवन एक खुले पुस्तक असते. ‘माय लाईफ इज माय मेसेज,’ असे म्हणण्याची त्यांच्यात हिंमत असते. आपले अध्यात्म समाजापर्यंत पाहोचवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. आपल्या आजूबाजूला काही दर्गे व मंदिरांमध्ये पाहिले तरी त्याचे प्रत्यंतर येईल.
मुळात अशा बाबा, बुवांची माणसाला गरजच का पडते? त्यांचे स्तोम वाढते कसे? पिचलेला, पीडित, दु:खी, असुरक्षित, भयग्रस्त समाज मुख्यत: त्यांना बळी पडतो. दुसरी कुठलीतरी बाह्यशक्ती आपले भले करेल, अशी त्यांची भाबडी श्रद्धा असते. खरे म्हणजे अध्यात्म आत्मविश्‍वास, निर्भयता, विवेक, कर्मनिष्ठा अशी मूल्ये शिकवत असते. पण, माणसांना सर्व प्रश्‍नांची सोपी उत्तरे हवी असतात. मग अमुक विधी करा, अमुक दान करा, अशी उत्तरे त्यांना भावतात. बाबांची कृपा झाली की संकटांचा नाश होईल, अशी त्यांची श्रद्धा असते. फार मोठा वर्ग या मानसिक दुर्बलतेतून त्यांच्याकडे वळणारा असतो. अपराधभावना असलेली, विश्‍वास हरवलेली, न्यूनगंड असलेली माणसं कुणाच्या तरी पायावर डोके ठेवून स्वत:ला समर्पित करून टाकतात. अनेक श्रीमंत लोकांच्या मनात पापाबद्दल अपराधभावना असते. ते आपली प्रतिमा सुधारण्याकरिता साधुसंतांचा आश्रय घेतात. प्रचंड दान देतात. एकीकडे सेवाकार्यही सुरू असते, दुसरीकडे समाजाला फसवून कमाईपण केली जाते. पैसा दिला नाही तरी चालेल, पण पाप करू नकोस, असे कोणताही बाबा त्यांना सांगत नाही. बाबांची प्रतिमा मग मोठी होत जाते. गर्दी वाढते. त्याचा फायदा राजकारणी घेतात. पण, ज्यांना निवडणुकीला उभे राहायचे नाही, मते मिळवायची नाहीत, तेही त्यांच्या मदतीने आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी व्यक्तीप्रमाणेच त्यांनीही आपल्या कामावरचा विश्‍वास गमावलेला असतो.
या प्रकरणाला आणखी एक बाजू आहे. माणूस म्हणजे एक छोटा बिंदू असतो. असे नगण्य राहणे कुणालाच नको असते. समाजात कुठेतरी आपले स्थान तो शोधत असतो. स्वत:च्या पलीकडे काहीतरी करण्याची, स्वत:ला कुठेतरी जोडून घेण्याची एक मूलभूत गरज माणसाला असते. मग तो या झगमगाटाला, प्रतिमेला बळी पडतो. माणसाला ओळख मिळते, काहीतरी करत असल्याचा आनंद मिळतो. एका मोठ्या समूहाचा तो भाग होतो. पण, त्याचा आधार श्रद्धा असल्यामुळे त्याच्या मनात चिकित्सा, समीक्षा, असे विषय येतच नाहीत. डोळ्यांवर झापड बांधली जाते आणि कधीतरी हा डोलारा कोसळतो. म्हणूनच अध्यात्म प्रथम ‘स्व’चा शोध घ्यायला सांगते. विवेकदीप उजळायला सांगते.
स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्याच्या मानसिकतेला आणखी आयाम आहे. असा संत, बाबा आपल्या जातीचा असला तर अहंकार अधिक सुखावतो. तो बाबा कितीही सुमार असला, तरी त्याच्या जातीची माणसं त्याच्याभोवती जमा होतात. त्यांची कुणी चिकित्सा केली की, जातीय अस्मितांचे प्रश्‍न निर्माण होतात. राजकीय आणि सामाजिक नेते आपल्या फायद्याकरिता त्यांच्या आरत्या ओवाळतात. ‘भेदाभेदभ्रम अमंगळ’ या तुकारामांच्या आध्यात्मिक तत्त्वाला आपण हरताळ फासतो. अध्यात्म आणि धर्म यांच्या मुळाशी आपण जात नाही, हीच मुख्य समस्या आहे. आणि तोच त्यावरचा उपायही आहे…
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११