एका झाडाची गोष्ट…

0
42

यथार्थ   
झाडे ही संवेदनशील असतात, तुमच्या भावना, स्पर्श, वेदना त्यांना कळतात. केवळ माणसांच्याच नाही, तर सर्वच सजीवांच्या बाबत ती झाडे अतिशय संवदनशील असतात, हे आता सिद्ध झाले आहे. डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी आधी हा शोध लावला आणि मग त्यांचे अधुरे राहिलेले कार्य जगभरातल्या त्यांच्या शिष्यांनी, त्यांना मानणार्‍या शास्त्रज्ञांनी पूर्ण केले. ‘ताओ ऑफ फिजिक्स’ वाले डॉ. फ्रिडॉप काप्रादेखील त्यातले एक… झाडांचे आयुष्य असते का? आपण लावली की ती लागतात, जगविली तितकी जगतात अन् कापून टाकली की संपतात, असेच बहुतांना वाटत असते. माणसांचे व इतर प्राण्यांचे, पक्ष्यांचे जसे आयुर्मान असते, तसे झाडांचेही असतेच ना… काही झाडे तीन-चारशे वर्षांचीही असतात. त्यांच्या या जगण्यात माणसांचा वाटा किती? आपण झाडे लावतो, जगवितो का? मरणारा पक्षी, प्राणी जगविल्याच्या बातम्या मोठ्या आत्मगौरवाने आम्ही देतो, वाचतो आणि आनंदित होतो. झाडे उन्मळून पडलीत, त्यांच्या मुळाशी कुणी मोरचूद टाकले, आग लावून, वणव्यात होरपळलीत तर ती वाचविण्याचा कुणी प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. मुळात आम्ही झाडांच्या बाबत फारसे संवेदनशीलच नाही. विकासाच्या नावाखाली आधी आम्ही निसर्गातील कुठल्या घटकावर घाव घालत असू तर ती झाडे आहेत! झाडे तोडणे ही हिंसा आहे, असे आम्हाला वाटत नाही. याचे कारण आम्ही त्यांना सजीवच मानत नाही. त्यांच्यात रक्त, मांस नाही, म्हणजे त्यांना संवेदना नाही, म्हणून त्यांना वेदनाच होत नाहीत, असा झाडून सार्‍यांचाच समज असतो. काहींना ते ज्ञान असले, तरीही संवेदनेच्या पातळीवर त्याचे प्रकटीकरण होत नाही. म्हणूनच परवा चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या मोहर्ली गेटजवळ असलेल्या रॉयल टायगर रीसॉर्टजवळचा ‘पाखड’चा पन्नास वर्षांचा वृक्ष उन्मळून पडलेला पाहून निसर्गस्नेही, पक्षिमित्र डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे हृदय कळवळले आणि त्यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने तो वृक्ष पुनरुज्जीवित केला. ही घटनाच मानवी संवेदना आणि त्याचे जाणतेपण यांची अत्यंत वेगळ्या, विज्ञाननिष्ठ पातळीवर दखल घ्यावी अशीच आहे. त्यांना या कामात मदत करणार्‍या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, दिना रुपदे, धनंजय बापट या सार्‍यांनाच सलाम!आपण आता झाडे लावू लागलो आहोत. पृथ्वीचे वाढते तापमान, कमी होत जाणारे पर्जन्यमान यामुळे मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची वेळ आली असल्याने, आम्ही पुन्हा झाडांच्या आश्रयाला जातो आहोत.
वृक्ष हे संवदेनशील असतात. अगदी माणसांपेक्षाही जास्त असतात, हे आता सिद्ध झालेले आहे. आधी माणसांची नैसर्गिक जाण उत्तम होती, कारण त्या वेळी तो निसर्गाच्या सान्निध्यातच होता. तोही निसर्गाचा एक घटक होता. त्यामुळे त्या वेळी वृक्षांबद्दल त्याला वैज्ञानिक ज्ञान नसेलही, मात्र त्याला ती उपजत समज होती. भौतिकाच्या, बुद्धिनिष्ठतेच्या विज्ञानवादी जगात माणूस उपभोगवादी झाला अन् त्याने निसर्गावर आक्रमण केले. तो निसर्गाचा घटक राहिला नाही. अनेक समस्या त्याचमुळे निर्माण झाल्या आहेत. त्यात विविध रोग आहेत अन् विकृतीही आहेत. झाडे केवळ संवेदनशीलच नसतात, तर ती टेलिपथीकदेखील असतात. सुदूर संवेदन, संभाषण त्यांच्यात होते. इतर जीवांच्या मनातले त्यांना कळते… जगदीशचंद्र बोस यांच्या अमेरिकन मार्गस्थाने एक प्रयोग केला. त्याने झाडाला विद्युत तारा जोडल्या आणि कार्डियोग्रामच काढला. कागदावर ते उमटू लागले. हे होत असताना त्याने सहज विचार केला की, सुरा घेऊन हे झाड अर्धे कापून काढावे… नुसता विचारच होता, तरीही ते झाड थरारले. त्याच्या या थरारण्याचा कागदावर आलेख उमटला. नुसताच विचारच होता. त्या शास्त्रज्ञाने तो व्यक्तही केला नव्हता किंवा सुरादेखील त्याने आणला नव्हता… तरीही झाडाला ते कळले. त्यानंतरचे विसेक दिवस तरी तो प्रयोगशाळेत आला, तरीही ते झाड थरारून जायचे. हळूहळू त्याला त्या झाडाला विश्‍वासात घ्यावे लागले. वीस-पंचवीस दिवसांनी झाड आश्‍वस्त झाले…
झाड केवळ स्वत:च्या बाबतच संवेदनशील नाही, तर सार्‍याच सजीवांबद्दल त्यांच्यात संवेदना असतात. डॉ. काप्रांनी त्यांच्या प्रयोगशाळेत गांडुळांवर प्रयोग केले. गरम पाण्यात ते गांडूळ टाकायचे. गांडूळ पाण्याच्या तापमानाशी समरस होतात की मरतात, हे तपासायचे होते. गांडूळ उकळून मरायचे… तिथेच एक निवडुंगाचे रोपटे होते. गांडुळांच्या या तडफडून मरण्याची प्रतिक्रिया या निवडुंगावर उमटायची. काप्रा त्या झाडाला हातही लावायला गेले तर ते थरथरायचे. दुष्ट माणूस आहे हा! झाडांचेही अज्ञात जीवन आहे. ‘दी सीक्रेट लाईफ ऑफ प्लांटस्’ नावाचे पुस्तकच लिहिले गेले आहे. भगवान कृष्णाने गीतेत सहजभावाने या संवेदना प्रसवल्या आहेत. भगवान बुद्ध, महावीरांनीही ते सांगितले आहे. महावीरांच्या एका सभेला कुणीच माणसे आली नाहीत. तरीही त्यांनी प्रवचन दिले. अत्यंत तन्मयतेने दिले. त्यांच्या शिष्यांनी विचारले, ‘‘कुणीच नाही, तरीही तुम्ही प्रवचन कुणासाठी दिले?’’ महावीर म्हणाले, ‘‘तुम्हाला नाही दिसले म्हणून कुणीच नव्हते असे नाही.’’ त्याचा अर्थ तिथे देव होते, असा काढला गेला. मात्र, तिथे झाडे होती, पक्षी होते, प्राणीही होते. सगळे गप्प राहून ऐकत होते. झाडेही ऐकतात आणि त्यांना कळतं, हे अध्यात्म महावीरांना कळले होते.
महावीरांचा गोशालक नावाचा एक शिष्य होता. तो त्यांच्या विरोधात गेला होता. एकदा ते कुठल्याशा गावात जात असताना मार्गात त्यांना एक रोपटे दिसले. गोशालकाने विचारले, ‘‘हे झाड जगेल असे वाटते का तुम्हाला?’’ महावीर म्हणाले, ‘‘नक्कीच जगणार आहे!’’ गोशालकाने ते रोपटे उपटून फेकून दिले आणि हसला. महावीर काहीच बोलले नाहीत. ते त्या गावाहून परतत असताना पाऊस येऊन गेला होता. ते त्या ठिकाणी पोहोचले तर ते रोपटे पुन्हा रुजले होते. फेकले तिथेच त्याने पुन्हा जमिनीत मुळे खुपसली होती… झाडांचे भवितव्य ठरविणारे आपणच आहोत, हा गोशालकाचा गैरसमज अजूनही माणसांमध्ये आहे. झाडे ही आपली सहोदर आहेत, आम्ही आलो तिथूनच तीही आलेली आहेत अन् आम्ही जाणार तिथेच तिही जाणार आहेत, ही खरी नैसर्गिक समज आहे.
आम्ही शहरे वसविली. सिमेंटच्या अन् सृजनच नसलेल्या इतर सामग्रीच्या वृक्षविरोधी इमारती उभ्या केल्या. झाडे शेवाळ बनून तिथे आपली माया पांघरती झाली. आता इमारती तापू नयेत म्हणून आम्ही ‘ग्रीन वॉल्स’ बनवू लागलो आहोत. तिकडे चीनने वायुप्रदूषणाशी लढण्यासाठी नवा प्रयोग हाती घेतला असून त्यात लांग्जाऊ विभागात एक अनोखी ‘फॉरेस्ट सिटी’ उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. या शहरातील इमारतींतच ४० हजार झाडे असतील. याशिवाय आसपासच्या परिसरातील १० लाख झाडे-वनस्पतींचेही संरक्षण या शहराला दिले जात आहे. या शहराचा प्लॅन इटालीतील फर्म स्टेफानो बोईरी यांनी तयार केला आहे. या शहरातील लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याच्या आनंदासह सर्व अत्याधुनिक सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. ३४२ एकरांच्या परिसरात ७० इमारती बांधल्या जाणार आहेत. नागरी पर्यावरणाचा हा पहिलाच प्रयोग आहे. पनवेलच्या सुनीता आठल्ये या ५४ वर्षांच्या महिलेने घरातच कचर्‍यात झाडे लावण्याचा प्रयोगही यशस्वी केला आहे. कुंड्यांत विघटन होणारा कचरा टाकून त्यात त्या थेट झाडे लावतात. आंबा, पेरू, चिकू, आवळा अशी कितीतरी झाडे त्यांनी कचर्‍याच्या कुंड्यांत लावली आहेत. त्यांच्या घरात डासही नाहीत अन् दुर्गंधीतर अजीबातच नाही… आम्ही झाडे वाचविण्याच्या आधी ते वाचणे शिकायला हवे. डॉ. पिंपळापुरे यांना झाड वाचता आले, त्यामुळे ते वाचविले पाहिजे, हेही त्यांना कळले. भा. भ. बोरकरांची-
झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड, गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड, वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते, गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते…
ही कविता आपल्याला जगता आली, त्या दिवशी आम्ही खरे पर्यावरणवादी झालो, असे समजायचे…!
– श्याम पेठकर