रस्त्यांवरील खड्ड्यांवर समाधी

0
23

– युवक कॉंग्रेसचे लक्षवेधक आंदोलन
– नागपूर महानगरपालिकेचा निषेध
नागपूर, १२ सप्टेंबर
शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे आहेत. वारंवार ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही महानगरपालिका दखल घेत नसल्यामुळे नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज अनोखे आंदोलन करून खड्ड्यांवरच समाधी बांधल्या आणि मनपा प्रशासनाचा निषेध केला.
युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोले यांच्या नेतृत्वात गंगाबाई घाट परिसरातील खड्ड्यांवर या समाधी बांधण्यात आल्या.
बंटी शेळके यांच्या नेतृत्वात याआधीही अनेक नगारानाद व घंटानाद आंदोलन शहरात विविध ठिकाणी करण्यात आले. मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन, आंदोलने करूनही जाग आलेली नाही. करदात्या जनतेच्या प्रश्‍नांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच गंगाबाई घाटाजवळील मुख्य मार्गावर स्मार्ट सिटी मुख्य मार्ग नामकरण असे घंटानाद आंदोलन करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या नावावर कोट्यवधींचा निधी उचलूनही शहर जसेच्या तसेच असल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही प्रशासन जागे झाले नाही. त्यामुळे युवक कॉंग्रेसने गांधीगिरी करत अनोखे ‘फोन लगाओ आंदोलन’ करताना खड्ड्यांवर फलक उभारून सहायक आयुक्त गांधीबाग झोनमधील अधिकार्‍याचा मोबाईल क्रमांक टाकण्यात आला.
हजारो करदात्या नागरिकांनी फलकावर दिलेल्या नंबरवर फोन करूनही अधिकार्‍यांकडून थंड प्रतिसाद मिळाला. एवढे फोन करूनही जीवघेणे खड्डे बुजविण्यात आले नाही.
सात दिवसांमध्ये जर हे खड्डे बुजविण्यात आले नाही तर शहरात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांवर समाधी बांधण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.