पाणीटंचाईचा दोष पावसावर लादणे ही पळवाट

0
30

जलसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांचे रोखठोक प्रतिपादन
-जलसंधारणासाठी नाल्यांची ऍन्जिओप्लास्टी आवश्यक
-पाऊस भरपूर, पण शास्त्रीय नियोजनाचा अभाव
-जलसंधारणासाठी पाण्याचा प्रवास कालावधी महत्त्वाचा
-तांत्रिक समस्येची अतांत्रिक सोडवणूक
नागपूर, १२ सप्टेंबर
जलसंधारण हा विषय आता गुळगुळीत झाला आहे आणि गावोगावी जलतज्ज्ञ निर्माण झाले आहेत. जलसंधारणाची कामे करताना जमिनीचा पोत लक्षात न घेता केवळ तांत्रिक आधारावर त्याचे नियोजन करणे व त्यातून पाणीटंचाईची समस्या सुटत नाही असे लक्षात आल्यानंतर त्याचा दोष पावसावर लादणे ही नियोजनकर्ते, राजकीय नेते आणि अभियंत्यांची पळवाट असल्याचे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ जलसंधारण तज्ज्ञ आणि शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी केले.
तरुण भारतच्या थेट-भेट अंतर्गत नुकतीच त्यांनी तरुण भारतच्या संपादक विभागातील सहकार्‍यांशी प्रदीर्घ चर्चा केली आणि या विषयाचे महत्त्व सर्वांगाने विशद केले.
सध्या राज्यात सर्वत्र जलसंधारणाची कामे सुरू आहेत, तरीही समस्या कायम आहे. शेतीला पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, धरणे पूर्णपणे भरत नाहीत, ही कारणे सांगण्यात येतात आणि सर्वात शेवटी याचा दोष पावसावर लादून लोक मोकळे होतात. पाऊस कमी झाला म्हणून पाणीसाठा नाही, ही शुद्ध फोकनाड आहे. कारण पडलेल्या पावसाचे सगळे पाणी साठविण्याची क्षमताच आम्ही विकसित केली नाही, असेही खानापूरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आधुनिक काळात नद्यांचा प्रवाह आणि पात्रांची रुंदी कमी होत आहे. पावसाची झड लागत नाही, पाणी जमिनीत मुरत नाही, पाऊस सर्वत्र पडत नाही. दोन वर्षे दुष्काळ आणि तिसर्‍या वर्षी महापूर अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी जमिनीत मुरणे महत्त्वाचे
मुळात पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरावे अशी अपेक्षा आहे. जलसंधारण हे काम भूगर्भशास्त्रज्ञ आणि स्थापत्य अभियंते यांच्याशी संबंधित आहे. पण केवळ अभियंते ही कामे करीत आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांचा यात सहभाग घेतला जात नाही. जमिनीचा पोत माहिती नसलेले लोक हे काम करीत असून, ती कामे करणारे तज्ज्ञ तंत्रज्ञ नाहीत, ही समस्या आहे व त्यामुळे जलसंधारणाचा हेतू साध्य होत नाही, याकडेही खानापूरकर यांनी लक्ष वेधले.
विदर्भातील जमिनीत ८२ टक्के भागात डेक्कन बेसाल्ट आहे. त्यात तीन स्तरावरील दगडांचे निरनिराळे गुणधर्म आहेत. भारतातील एकूण धरणांच्या ४० टक्के धरणे महाराष्ट्रात आहेत. पाणी भरपूर आहे, पाऊस भरपूर आहे, पण समस्या कायम आहे, हा खरा प्रश्‍न असल्याचे त्यांनी सांगितले.

उगम ते संगम बंधार्‍यांची रचना
पावसाचे पाणी साचण्यासाठी माथा ते पायथा आणि उगम ते संगम असे नाल्यांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. शासनाने सध्या बांधलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने बांधले आहेत. जमिनीत काळा दगड व मुरुम मातीचा भाग त्याची पाणी साठवणक्षमता कमी असते. सध्या कमी वेळात भरपूर पाऊस पडतो आणि त्याचा वेग अधिक असल्यामुळे ते पाणी वाहून जाते. गावातील नाल्यांची खोली आणि रुंदी वाढवून पाण्याचे भांडे १०० टक्के भरावे अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यालाच आम्ही नाल्यांची ऍन्जिओप्लास्टी म्हणतो व हेच काम शिरपूर पॅटर्नमध्ये होते. यात शिरपूरचे आमदार अमरीश पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशीच कामे इतर ठिकाणी होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

तीन वर्षांचा पाणीसाठा
शिरपूर पॅटर्नमध्ये बंधार्‍यांची शास्त्रशुद्ध व्यवस्था केल्यामुळे सध्या तीन वर्षांचा पाणीसाठा आहे. पुढील दोन वर्षे पाऊस आला नाही तरी शेती व पिण्यासाठी पाणी आहे. भांडे मोठे केले आणि बाष्पीभवनाचा हिशेब करून प्रमाण निर्धारित केले. त्याठिकाणी मे महिन्यात बागायती शेती फलोत्पादन सहज शक्य झाले आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी याठिकाणी येऊन अवलोकन करावे आणि त्याचे अनुकरण आपल्या गावात करावे, असे आवाहनही यावेळी खानापूरकर यांनी केले. सध्या भारतातील दहा राज्यांत पाण्याची टंचाई आहे. दुसरीकडे शिरपूर पॅटर्ननुसार २५० गावात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. टंचाईग्रस्त गावात लघुपाणलोट क्षेत्र विस्तारित झाले आहे. त्यामुळे महापूर आणि दुष्काळाचे उत्तर हे शिरपूर पॅटर्न असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.