कर्जमाफीसाठी दीड लाख अर्ज

0
32

– ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तीन दिवस
– योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
– ७७ हजार कुटुंबांची झाली नोंदणी
नागपूर, १२ सप्टेंबर
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी नागपूर जिल्ह्यात १ लाख ५२ हजार ३४५ शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. कर्जमाफी मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज सादर करून कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा सुलभपणे लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ५३० आपले सरकार सेवा केंद्रे, १६५ सुविधा सेतू केंद्रे तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७२ शाखांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवरूनच शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ तसेच पूर्णत: मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी बॉयोमेट्रिक डिवाईस सुद्धा उपलब्ध आहे. शेतकर्‍यांनी घेतलेल्या २०१५-१६ या वर्षातील पीक कर्जाची पूर्णत: परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी जिल्ह्यात ७७ हजार ११ कुटुंबांनी नोंदणी केली आहे.
कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुका व महसूल मंडळ स्तरावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासोबतच कर्जमाफीचे अर्ज भरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यासाठी महसूल तसेच जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी निबंधक यासोबतच तालुका कृषी अधिकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करीत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या महसूल विभागाला तात्काळ सादर कराव्यात. त्यानुसार ज्या शेतकर्‍यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरले नाहीत त्यांना या योजनेच्या लाभासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी कुर्वे यांनी दिली.

योजनेच्या लाभासाठी संपर्क
शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभासाठी अडचण येत असल्यास ७८८७४६३२९० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत यावर संपर्क साधावा, असे आवाहन करताना जिल्हाधिकारी कुर्वे म्हणाले की, कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पूर्ण करताना तक्रार असल्यास ती सोडविण्यसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अद्याप नोंदणी केली नसल्यास तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.