संघ, संस्कृत, संगीत आणि योग ही डॉ. वर्णेकरांच्या जीवनाची चतुःसूत्री

0
56

– डॉ. लीना रस्तोगी यांचे प्रतिपादन
– संस्कृत विद्यापीठात डॉ. श्री. भा. वर्णेकर व्याख्यानमाला
नागपूर, १२ सप्टेंबर
संघ, संस्कृत, संगीत आणि योग ही डॉ. श्री. भा. वर्णेकरांच्या जीवनाची चतुःसूत्री होती. विद्वान प्राध्यापक, व्यासंगी संशोधक, सर्व शास्त्रपारंगत, योगसाधक, प्रखर राष्ट्रभक्त, पत्रकार व संपादक, वात्सल्यमूर्ती अशा विविध पैलूंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचे धनी डॉ. वर्णेकर होते. संस्कार, संस्कृत आणि भारतीय संस्कृतीवरील निष्ठा हेच डॉ. वर्णेकरांच्या जीवनाचे सार होते, असे प्रतिपादन संस्कृत विदुषी डॉ. लीना रस्तोगी यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. व्याख्यानमालेतील पहिले पुष्प डॉ. लीना रस्तोगी यांनी ‘प्रज्ञाभारतींचे विविधांगी व्यक्तित्व’ या विषयावर गुंफले. कुलगुरू डॉ. उमा वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. संस्कृत भाषा तथा साहित्य संकायाच्या अधिष्ठाता डॉ. नंदा पुरी आणि कुलसचिव डॉ. अरविंद जोशी यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. लीना रस्तोगी म्हणाल्या, ज्ञानी, तेजस्वी अशा डॉ. वर्णेकरांना त्यांच्या प्रासादिक, सरल वैदर्भीय शैलीतील संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाने, पांडित्याने आणि प्रतिभेने प्रभावित होऊन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी ‘प्रज्ञाभारती’ अशी उपाधी दिली. न्यूयॉर्कमधील जनतेने त्यांच्या संस्कृतनिष्ठेने भारावून जाऊन ‘भारतपुत्रा’ अशी उपाधी दिली. संस्कृत भाषा जनभाषा व्हावी यासाठी स्वतः वर्णेकरांनी बारा वर्षे संस्कृतशिवाय अन्य भाषा बोलणार नाही असे व्रत घेतले व ते पार पाडले. गुरूंवरील श्रद्धा, भारतीय संस्कृतीवरील निष्ठा आणि संस्कृत भाषेवरील उत्कट प्रेम या तीन गोष्टींमुळेच त्यांनी संपूर्ण विश्‍वात आदर प्राप्त केला, असे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. उमा वैद्य म्हणाल्या, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्याच्या साहित्यकृतींमधून दिसून येतो. व्यक्तिमत्त्वावर झालेले संस्कार, हे साहित्यकृतींमधून प्रकट होत असतात, त्याचा प्रत्यय वर्णेकरांच्या वाङ्‌मयातून दिसतो. कार्यक्रमाचे संचालन डॉ. पराग जोशी यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. कविता होले यांनी केले. व्याख्यानाला डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर, डॉ. श्रीनिवास वर्णेकर, दिलीप म्हैसाळकर, श्रद्धा तेलंग, डॉ. हंसश्री मराठे, डॉ. वीणा गानू तसेच संस्कृतानुरागी, संस्कृत अभ्यासक उपस्थित होते.