मेडिकलमध्ये निवासी महिला डॉक्टरला मारहाण

0
72

नागपूर, १२ सप्टेंबर
निवासी डॉक्टरांना होणारी मारहाण थांबावी यासाठी शासनातर्फे डॉक्टरांना सुरक्षा पुरविली आहे. तसेच कायदेदेखील करण्यात आले. मात्र, या सर्व बाबींचा रुग्णांच्या नातेवाईकांवर काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका निवासी महिला डॉक्टरला रुग्णाच्या महिला नातेवाईकाने मारहाण केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे.
मेडिकलच्या वार्ड क्र. २२ मध्ये सेवा देणार्‍या एका निवासी महिला डॉक्टरला नुकतीच रात्री मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. गायनॉकॉलॉजी विभागात सात महिन्यांची गरोदर महिला उपचारासाठी आली होती. तिची तपासणी केल्यानंतर संबंधित निवासी महिला डॉक्टरने तिला थोडे थांबायला सांगितले. मात्र, सोबत असलेल्या महिलेने आताच शस्त्रक्रियागृहात घ्या, असा तगादा लावला. त्यांना समजावून सांगत असताना त्या महिलेने डॉक्टरला मारहाण केली.
निवासी डॉक्टरला कायम अशा गंभीर स्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डॉक्टरांनी काही महिन्यांपूर्वी राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्या आंदोलनामुळे डॉक्टरांना मारहाण करणार्‍याला अटक आणि दंड असा शासनाने नियम केला. मात्र, नातेवाईकांना या नियमाची कोणतीही भीती नसल्याची स्थिती आहे. आपल्या रुग्णावर लवकर उपचार व्हावे, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, डॉक्टरांना देखील मर्यादेचे पालन करावे लागते. डॉक्टरांच्या मारहाणीचे सत्र असेच सुरू राहिले तर राज्यव्यापी आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता काही निवासी डॉक्टरांनी बोलून दाखविली.

प्रशासनाने केली तक्रार
मारहाणीची घटना कळताच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकल गाठले. या प्रकरणाची तक्रार मेडिकल प्रशासनातर्फे देण्यात आली. तसेच त्यांनी रात्रीच संपूर्ण मेडिकलचा राऊंड घेतला. तसेच कार्यरत असणार्‍या सुरक्षा रक्षकांना सूचना केल्या. यावेळी मेडिकलचे डॉ. प्रवीण भुयार उपस्थित होते.