विकास ठाकरे यांची हायकोर्टात धाव

0
78

– कॉंग्रेसचे मनपातील नामनिर्देशित सदस्य प्रकरण
नागपूर, १२ सप्टेंबर
येत्या १५ सप्टेंबर रोजी होणार्‍या नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेसचे नामनिर्देशित सदस्य म्हणून माजी नगरसेवक किशोर जिचकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर, आपल्याला न्याय मिळावा म्हणून माजी महापौर विकास ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणावर उद्या बुधवार १३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्या शिफारशीवरून विकास ठाकरे यांनी कॉंग्रेसचे नामनिर्देशित सदस्य म्हणून अर्ज सादर केला होता. त्याच दिवशी किशोर जिचकार यांनीही अर्ज दाखल केला होता. दरम्यान, कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांनी वेगळी चूल मांडून तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड केली. बहुमताच्या आधारे विभागीय आयुक्त कार्यालयाने नामनिर्देशित सदस्यत्वाचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी वनवे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले होते. आपल्याला कॉंग्रेसच्या गटनेतेपदावरून हटविण्याच्या निर्णयाला अखेर संजय महाकाळकर यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यामुळे नामनिर्देशित सदस्यत्वाची नियुक्ती रोखून धरण्यात आली होती. अलीकडेच उच्च न्यायालयाने मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी तानाजी वनवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर कॉंग्रेसच्या नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार मनपाने १५ सप्टेंबरच्या आपल्या विषयपत्रिकेत किशोर जिचकार यांच्या निवडीचा विषय अंतर्भूत केला.
मनपाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळाच्या आधारे एकूण पाच नामनिर्देशित सदस्यांपैकी चार जागा भाजपाच्या व एक जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली होती. भाजपाने पहिल्याच बैठकीत आपल्या चारही सदस्यांची नावे निश्‍चित केल्यानंतर मनपाच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाला मंजुरीही देण्यात आली होती. कॉंग्रेसच्या एका सदस्याचे नाव मात्र आपसातील वादामुळे खोळंबले होते.
कॉंग्रेसतर्फे नामनिर्देशित केल्या जाणार्‍या एका जागेसाठी विद्यमान गटनेते तानाजी वनवे यांनी किशोर जिचकार यांच्या नामनिर्देशित सदस्यत्वाला समर्थन दिल्यामुळे त्यांच्या नावावर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विकास ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.