जिल्ह्यातील तिघांना राज्य शिक्षक पुरस्कार

0
69

– दीपक कडू, दिलीप केणे व सतीश पुंड होणार सन्मानित
नागपूर, १२ सप्टेंबर
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना दरवर्षी ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. यावर्षी नागपूर जिल्ह्यातून तीन शिक्षकांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी राज्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. नागपूर शहरातील शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक दीपक केशव कडू यांना माध्यमिक गटात पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राथमिकमध्ये दिलीप माणिक केणे, तर आदिवासी प्राथमिक शिक्षकांमध्ये सतीश अंबादास पुंड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या शिक्षकांना सोमवार १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कृत करण्यात येईल.
दीपक कडू २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिवाजी महाविद्यालयात गणिताचे शिक्षक आहेत. त्यांना आतापर्यंत विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त आले आहेत. यावर्षी प्रथमच त्यांनी माध्यमिक गटात पुरस्कारासाठी अर्ज केला आणि पुरस्कार जाहीरही झाला. विशेष म्हणजे याचवर्षी ते निवृत्त होत आहेत. प्राथमिक गटात पुरस्कारप्राप्त दिलीप केणे पारडसिंगा (काटोल) येथील जीप प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर आदिवासी विभागात प्राथमिक शिक्षक गटात पुरस्कार प्राप्त करणारे सतीश पुंड पिपरी केंद्र रामटेक येथील जिप प्राथमिक शाळेत आहेत. शिवाय नागपूर विभागात शील व्यंकटेश सोमणकर यांना अपंग गटात पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्ह्यातून एक प्राथमिक शिक्षक, एक माध्यमिक शिक्षक, प्रत्येक विभागातून एक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, राज्यातून एक कला शिक्षक, एक क्रीडा शिक्षक, एक स्काऊट शिक्षक, एक गाईड शिक्षिका आदींना पुरस्कार दिले जातात. राज्यातून १ पुरस्कार अपंग प्रवर्गासाठी असतो. तसेच प्रत्येक आदिवासी क्षेत्रानुसार पुरस्कारांची संख्या निश्‍चित करण्यात आलेली आहे. मागीलवर्षी नागपूर शहराला तीन पुरस्कार प्राप्त झाले होते. मात्र यावर्षी एकाच पुरस्कारावर समाधान मानावे लागत आहे.

सर्वांच्या सहकार्याचे फळ : दीपक कडू
१९८६ मध्ये शिवाजी महाविद्यालयात दाखल झालो. तेव्हापासून एकनिष्ठ राहून कार्य केले. यासाठी महाविद्यालय प्रशासन, सहयोगी आणि कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामुळेच हे यश मिळविणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया दीपक कडू यांनी तभाशी बोलताना व्यक्त केली. सध्या कनिष्ठ महाविद्यालयांना खासगी शिकवणींचे ग्रहण लागले आहे. मात्र विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महाविद्यालयांशिवाय इतर कुठेही होऊ शकत नाही. महाविद्यालयात नियमित तासिका व्हाव्या आणि वर्गांना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. यातूनच एक समृद्ध शिक्षणव्यवस्था तयार होईल. ती शिकवणी वर्ग कधीच करू शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.