ब्रिटनने आवळल्या डॉनच्या मुसक्या

0
50

दाऊदची ४ हजार कोटींची संपत्ती सील
•अंडरवर्ल्डला जबरदस्त हादरा
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर
मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्डचा पळपुटा डॉन दाऊद इब्राहिमच्या सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीला ब्रिटन सरकारने सील ठोकले आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा आणखी एक मोठा विजय असल्याचे मानले जात आहे.
सध्या पाकिस्तानच्या नापाक भूमीत आश्रयास असलेल्या दाऊदची जगभरात ६.७ अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याची माहिती आहे. भारतीय चलनानुसार ही संपत्ती ४२ ते ४५ हजार कोटींच्या घरात जाते. ब्रिटन सरकारने केलेल्या कारवाईकडे दाऊदच्या साम्राज्याला अर्थात अंडरवर्ल्डला दिलेला मोठा हादराच आहे, यादृष्टीने बघितले जात आहे.
दाऊद आणि त्याच्या डी-कंपनीची ब्रिटनमध्ये हॉटेल्स, अनेक आलिशान इमारती व बंगले आहेत, ज्यांची किंमत हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत दाऊदच्या वॉरविकशायर येथील हॉटेलसह आलिशान बंगल्यांचाही समावेश आहे. भारत सरकारने ठोस पुरावे सादर केल्यानंतर गेल्या महिन्यात ब्रिटन सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीत दाऊदचा समावेश केला होता. यानंतर ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने मालमत्ता गोठवण्यासंदर्भात जारी केलेल्या यादीत दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील तीन ठिकाणांचाही उल्लेख होता.
ब्रिटनने जारी केलेल्या यादीनुसार, कासकर दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानातील ठिकाणांचे पत्ते असे होते. १) घर नं. ३७, मार्ग क्रमांक ३०, डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान. २) नूराबाद, कराची, पाकिस्तान आणि ३) व्हाईट हाऊस सौदी मशिदजवळ, क्लिफ्टन, कराची या पत्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनमध्ये संपत्ती खरेदी करताना त्याने तब्बल २१ नावांचा वापर केला आहे.
फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, दाऊद इब्राहिम जगातील क्रमांक दोनचा सर्वाधिक श्रीमंत असा डॉन असल्याचे मानले जाते. तर, ब्रिटनमध्ये त्याची चार हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
भारत सरकारचे मोठे यश
दाऊद इब्राहिमवरील कारवाई म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मिळालेले मोठे यश मानले जात आहे. कारण, ब्रिटनसह जगभरात दाऊदची संपत्ती कुठे-कुठे आहे, याची तपशीलवार माहिती भारत सरकारने ब्रिटनला दिली आहे.
युएईची कारवाई
यापूवी, संयुक्त अरब अमिरात सरकारनेही दाऊद इब्राहिमची १५ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यानंतर अमिरात सरकारने ही कारवाई केली होती. घ(वृत्तसंस्था)
लंडनमधील दाऊदची संपत्ती
– लंडनच्या हर्बर्ट रोडवर ३५ कोटी रुपयांची संपत्ती.
– स्पिटल स्ट्रीटवर ४५ खोल्यांचे आलिशान हॉटेल.
– रोहॅम्पटनमध्ये कमर्शिअल बिल्डिंग.
– लंडनच्या जॉन्सवूड रोडवर आलिशान घर.
– शेफड्‌र्स बुश, रोमफोर्ड क्रोयदोमध्ये हॉटेल आणि संपत्ती.