यूट्यूबवरील ‘गवतफुला’ची ग्रामीण विद्यार्थ्यांना मोहिनी!

0
77

प्रमोद बोराटने
पुलगाव, १३ सप्टेंबर
अलीकडे संगणकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान, यामुळे शिक्षणक्षेत्रात बराच फायदा होऊ लागलाय्. पूर्वी पुस्तकातील धडे व कविता गिरवून पाठ करणे जिकिरीचे होते. पण, आज शिक्षणक्षेत्रातील मंडळींसाठी ऍण्ड्रॉॅईड फोन गुरू ठरत आहे! कविता व धडे उजळणीतून नव्हे, तर चित्रीकरण करून विद्यार्थ्यांना सोप्या व सहज पाठ होतील, अशा पद्धतीने शिकविण्याचे तंत्रज्ञान आता यूट्यूबच्या माध्यमातून सर्व भागात पोहोचले आहे.
गावकुसात व डोंगर-दर्‍यांत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. पण, त्यांना शिकवायचे म्हणजे तारेवरची कसरतच! या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातील कविता व धडे सोप्या पद्धतीने त्यांच्याच भाषेत शिकविण्यासाठी आता काही शिक्षक पुढे सरसावले आहेत. पुण्या-मुंबईकडील महागडे तंत्रज्ञान इकडे वापरणे परवडणारे नाही. शिवाय त्यांची बोलीभाषा विद्यार्थ्यांनाही कळणार नाही. तेव्हा आहे त्या स्थितीत त्याच विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन ग्रामीण भागातच कविता व धड्यांचे साध्या मोबाईलवर चित्रीकरण करून, त्या यूट्यूबवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे तंत्रज्ञान आता ग्रामीण भागातही रुजू लागले आहे.
येथील विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेत, घोडेगाव कोळोना येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेंद्र गणवीर यांचा नुकताच यासाठी सत्कार करण्यात आला. नाशिक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडीओ स्पर्धेत राजेंद्र गणवीर यांनी चित्रित केलेल्या ‘गवतफुला’ या कवितेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. इंदिरा संत या कवयित्रीची पाठ्यपुस्तकातील ‘गवतफुला’ ही कविता ग्रामीण भागातच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चित्रित करण्यात आली. अशा कविता व पाठ्यक्रमाचे चित्रीकरण केल्याने त्या विद्यार्थ्यांपर्यंत लवकर पोहोचतात व विद्यार्थी अर्थासह लवकर शिकतात, हा अनुभव शिक्षकांना आल्याने, आता अनेक ग्रामीण भागात वेगवेगळ्या विषयांवर चित्रीकरण होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात त्याचा चांगला फायदा होत आहे.
या डिजिटल शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात सर्वप्रथम संदीप गुंड या शिक्षकाने केली आणि मग हा ज्वर ग्रामीण भागात हळूहळू वाढत गेला. नाशिकच्या स्पर्धेत शैक्षणिक चित्रफिती ग्रामीण भागातून आल्या होत्या, हे विशेष!
येथील शिक्षक राजेंद्र गणवीर यांनी कविता व पाठ्यक्रम ग्रामीण भागात चित्रित करून यूट्यूबवर टाकले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात या कवितांचा व पाठ्यक्रमाचा चांगला उपयोग विद्यार्थी करताहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. आता शासनानेही याच माध्यमाचा वापर करून ‘मित्रा’ हा एक नवीन ऍप विकसित केला आहे. घोडेगाव कोळोणा या छोटेखानी गावातील शिक्षक राजेंद्र गणवीर यांनी तयार केलेल्या कविता चित्रफिती शिक्षणक्षेत्रात लोकप्रिय होत आहेत.
‘गवतफुला’ या कवितेनंतर शाळेतीलच लॅपटॉपचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ही एक कविता चित्रफीत नुकतीच तयार केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर चित्रित झालेली ही चित्रफीत आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना यूट्यूबवर या सहजगत्या उपलब्ध होऊ शकतात