भारत-जपान ‘युज्योऽ’चे नवे पर्व

0
68

शिंजो आबे यांचे अहमदाबादेत ‘सुतेकी’ स्वागत
अहमदाबाद, १३ सप्टेंबर
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे आज बुधवारी गुजरातच्या अहमदाबाद येथे सुतेकी (भव्य) स्वागत करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचार बाजूला सारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर गळाभेट घेऊन स्वागत केले. भारत आणि जपानमधील युज्योऽच्या (मैत्रीच्या) नव्या पर्वाला यामुळे सुरुवात झाली आहे.
अहमदाबाद विमानतळावर आगमन झाल्यानंतर शिंजो आबे यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीचे पारंपरिक नृत्य सादर करून स्वागत झाले.
आठ किमीचा रोड शो
विमानतळापासून पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्या रोड शोला सुरुवात झाली. आठ किलोमीटरच्या या रोड शोमध्ये आबे आणि त्यांच्या पत्नी भारतीय वेशभूषेत उपस्थिती होत्या. यावेळी त्यांना भारतीय संस्कृतीची विविधता दाखविण्यात आली. या रोड शोची सांगता साबरमती आश्रमाजवळ झाली. आश्रमात आल्यानंतर नरेंद्र मोदी, शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नी अकई आबे यांनी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर या सर्वांनी साबरमती रिव्हर फ्रंटच्या बगिच्यात काही वेळ निवांत बसण्याचा आनंद लुटला.
आज बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन
जपानच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा दोन दिवसांचा आहे. त्यांचा हा दौरा भारतासाठी विशेष ठरणार आहे. या दौर्‍यात ते भारताला बुलेट ट्रेनची भेट देणार आहेत. दोन्ही दिवस त्यांचा मुक्काम गुजरातमध्येच राहणार आहे. मोदी आणि आबे यांच्या हस्ते उद्या गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांच्यात उच्चस्तरीय चर्चा होणार असून, एक वाजता दोन्ही देशांमध्ये सामंजस्याचे दहा महत्त्वाचे करार आणि पत्रपरिषद होणार आहे. उद्याच रात्री साडेनऊच्या सुमारास ते जपानला रवाना होणार आहेत.
जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत १.८० लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (वृत्तसंस्था)