लोकांना गुण-दोषांसह स्वीकारणे म्हणजेच हिंदुत्त्व

0
53

सरसंघचालकांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर
कोणी काय खावे आणि कोणता पेहराव करावा, हा हिंदुत्त्वाचा भाग नाही. लोकांचा ते जसे आहेत अर्थात त्यांच्या गुण-दोषांसह स्वीकार करणे म्हणजे हिंदुत्त्व आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
५० देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांशी सरसंघचालकांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधला. इंडिया फाऊंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी अनेक मुद्यांवर मनमोकळेपणाने मत व्यक्त केले. सोबतच, भाजपा आणि संघातील संबंधांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती.
अयोध्येवर कोर्टाचा निर्णय मान्य
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदप्रकरणी सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही डॉ. मोहनजी भागवत यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिराचा प्रश्‍न निकाली निघेल का, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर सरसंघचालक म्हणाले की, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि न्यायालय जो काही निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. (वृत्तसंस्था)