प्रासंगिक

0
23

कॉंग्रेस आणि डाव्यांना काम मिळाले हो…!

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश यांची नुकतीच तीन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून त्यांच्या राहत्या घरी हत्या केली. कोणत्याही मानवी हत्येचे कुठलीही सुज्ञ व्यक्ती कधीच समर्थन करणार नाही. विचारवंत उजवा की डावा, यापेक्षा केवळ त्यांच्या वैचारिक विरोधामुळे होणार्‍या हत्या माणुसकीला खरोखरच काळिमा फासणार्‍या आहेत. वैचारिक लढाई ही विचाराने लढली जावी, अशी अपेक्षा असते. मात्र, सध्याच्या काळात सगळीकडे बाजारीकरणाने धुडगूस घातल्याने, ना पत्रकारिता त्यापासून अलिप्त राहू शकली ना विचारवंत! त्यातूनच सुपारीबाज पत्रकारांची नवी जमात निर्माण झाली असून, त्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. गौरीच्या हत्येवरून भाजपा आणि संघाला झोडपून काढले जात आहे. अजून हत्येची चौकशी सुरूच आहे, पण यांची चौकशी अगदी काही मिनिटांत आटोपली!
गौरी लंकेश यांना पत्रकारितेचा वारसा लाभला असल्याने त्या या क्षेत्रात नवख्या नव्हत्या. डाव्या चळवळीचा त्यांना विशेष जिव्हाळा होता. जेएनयूचा कन्हैया आणि ‘भारत तेरे तुकडे होेंगे’ म्हणणारा हे त्यांचे पुत्र. त्यांच्या पत्रिकेत त्यांनी नक्षली म्होरक्या साकेत राजनची मुलाखत छापून खळबळ उडवून दिली होती. नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे यासाठी त्या धडपडत होत्या. त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड राग होता. त्यांनी तो पत्रके वाटून व्यक्तही केला होता. रोहिंग्यांना भारतातून हाकलून देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शविला होता. संघ, भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या त्या कट्‌टर विरोधी आणि टीकाकार होत्या.
खरा प्रश्‍न असा आहे की, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ढोंगी पुरोगाम्यांनी जे ऊर बडवणे चालू केले आहे आणि ज्याप्रमाणे संघ, भाजपा आणि मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे, ते खरोखरच समर्थनीय आहे का? स्वतः गौरी लंकेश यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यात नक्षली, माओवाद्यांच्या सहभागाची शंका उपस्थित केली असताना, संघपरिवार आणि मोदींना अनाठायी गोवण्याचे कारण काय? गौरी लंकेश यांची हत्या कर्नाटकात झाली असताना, गौरीला संरक्षण देण्यात तिथले कॉंग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असताना, थेट केंद्र सरकारला दोषी ठरविण्यात येत आहे. गौरी लंकेशच्या हत्येचा ज्यांना वारंवार उमाळा येत आहे त्यांनी इतरत्र होणार्‍या हत्यांबाबत मात्र सोयिस्करपणे मौन बाळगले आहे. केरळात तर स्वयंसेवकांच्या हत्या नित्यनेमाने होत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये मुस्लिमांच्या दीदींच्या आशीवार्दाने जिहाद्यांनी उच्छाद मांडला असून, त्याबद्दल फार कुठे चर्चा झालेली दिसत नाही.
गौरी लंकेशच्या हत्येनिमित्त ढोंगी पुरोगाम्यांना आयते कोलीत मिळाले असून, त्याचा पुरेपूर फायदा घेत, या निमित्ताने आपला मोदीद्वेषाचा कंड शमवण्याचा त्यांचा डाव दिसतो. परत एकदा राजकीय पर्यटनाला सुरुवात झाली असून, राजकीय डोमकावळ्यांचे कर्नाटक हे माहेरघर राहील, यात शंका नाही!
निश्‍चितच गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास होईल आणि गुन्हेगारांना शासन होईल. न्यायपालिका सर्व बाजू तपासून न्यायनिवाडा करेल. म्हणूनच या पुरोगाम्यांनी याबाबतीत अनावश्यक ढवळाढवळ न करता संयम बाळगणे गरजेचे आहे. परंतु, एकदा मोदीफोबिया झाला म्हटले की, काही विचारायची सोयच राहात नाही! जळी, स्थळी सर्वत्र, संबंध असो वा नसो, मोदींना दोषी ठरवून झोडपण्याची एकही संधी ढोंगी पुरोगामी सोडायला तयार नसतात. दाद्रीचे हैदराबादी व्हॅक्सीन आणि तेही डाव्या हाताला टोचले म्हटल्यावर, परिस्थिती आणखीनच गंभीर होत असते.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य असो की भाषणस्वातंत्र्य असो… त्याचा उपभोग घेत असताना चुकूनही दुसर्‍यांच्या हक्कांवर गदा तर आणत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. आपण एकमेव विचारवंत असल्याच्या थाटात आजकाल जो हैदोस घातला जातो तो नक्कीच चिंताजनक आहे. गौरी लंकेशच्या निमित्ताने पुरोगाम्यांनी जो धुराळा उडवला आहे तो नक्कीच दुसरा एखादा इश्यू मिळताच खाली बसेल. अशा प्रकरणांत पुरोगाम्यांना पीडितांबद्दल किती सहानुभूती असते, हा संशोधनाचा विषय आहे. मीडियाला हाताशी धरून खरेतर हे देश, समाजाची प्रतिमा मलिन करण्याचे पातक करतात. अर्थातच, जनतेला यांच्या ढोंगीपणाची चांगली कल्पना असल्याने, जनतेत आजही यांची किंमत यथातथाच आहे. या प्रकरणात फारतर या निमित्ताने पुरोगाम्यांना भाजपा आणि केंद्र सरकारवर भुंकायची एक संधी मिळाली, एवढेच म्हणू शकतो!
डॉ. अनिल पावशेकर
९८२२९३९२८७