श्रद्धांजली

0
40

आमचे बाबा : बाबुराव देव

१सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १० च्या सुमारास आमचे वडील प्रभाकर पुंडलिक उपाख्य बाबुराव देव यांचे वार्धक्यामुळे वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. गत ५५-५६ वर्षे त्यांच्या वत्सलछायेत राहण्याचे भाग्य मला मिळाले. गांधीहत्येनंतर झालेल्या संघबंदीनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व सत्याग्रह केला. त्यानंतर त्यांनी धान्य व कापूस अडतीचा व्यवसाय सुरू केला. एकाधिकार कापूस योजनेमुळे तो बंद पडला. त्यांनी आणिबाणीच्या काळात १९ महिन्यांचा मिसा अंतर्गत कारावास भोगला.
बाबा लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक होते. संघाच्या योजनेतून त्यांना जनसंघाच्या कामाचे दायित्व दिले गेले. त्या वेळी त्यांनी सदुभाऊ पांडे व आबासाहेब महाजन यांच्यासोबत काम सुरू केले.
गांधीहत्येनंतर अनेक ठिकाणी संघस्वयंसेवकांवर हल्ले झाले. तसेच यवतमाळातही झाले. बळवंतराव बापटांच्या वडिलांना व दामले वकिलांना विनाकारण घरी जाऊन समाजकंटकांनी मारले. नंतर बाबा, लखुकाका सहस्रबुद्धे, चंदूकाका महानूर यांनी श्याम टॉकीजमध्ये जाऊन दोघा-तिघांना येथेच्छ बदडले; तर भाऊसाहेब पाटणकरांना मारायला आलेल्यांपैकी दोघांना लखू चौकात इलेक्ट्रिकच्या खांबाला बांधून चोपले. भाऊसाहेब पाटणकरांनी त्यांची सुटका केली. अशी आठवण वसंतराव गोखले नेहमी सांगतात.
जनसंघाच्या कामात असताना कॉंग्रेसच्या व अन्य पक्षाच्या लोकांशी त्यांचे संबंध मधुर होते. त्यात जांबुुवंतराव धोटे, वसंतराव नाईक, देवराव पाटील, उत्तमराव पाटील (धुळे) प्रामुख्याने होते. आणिबाणीत, माझे ज्येष्ठ बंधू अण्णा यांना यवतमाळ नप शाळेतून ते संघाचे म्हणून काढण्यात आले. आई व मी डी. आय. आर.खाली काही दिवस अटकेत होतो. कुटुंबात कमवता कुणीही नव्हता. त्या काळात यवतमाळात मिसा बंदीच्या कुटुंबीयांना मदत म्हणून निधी व धान्य जमा केले होते. नागपूरच्या जेलमधून त्यांनी आईला निरोप पाठवला, ‘‘या निधीतून आपण काही घ्यायचे नाही. आपल्यापेक्षा कुणाला जास्त गरज असेल तर पाहा.’’
जनसंघाच्या कामात असताना त्यांनी अनेक आंदोलनांत भाग घेतला. अनेक आंदोलने उभी केली. प्रसंगी कार्यकर्त्यांसह २५-३० कि.मी. सायकलने प्रवास केला, तर कधी ५-१० कि.मी. पायीही जावे लागले. शासनाने धान्यावर सेस लावला होता, तो रद्द व्हावा म्हणून त्यांनी व अन्य ४-५ कार्यकर्त्यांनी ४ दिवस उपोषण केले होते. सेस वाढ रद्द झाल्यावर सुमतीबाईंच्या हस्ते रस घेऊन उपोषण सुटले. ‘यस्मान्नोविजते लोको लोकान्नो विजते चय:’ या गीतेमधील १२ व्या अध्यायातील वचनाप्रमाणे त्यांचा लोकसंग्रह होता. सार्वजनिक जीवनासारखेच ते वैयक्तिक जीवनात अत्यंत कर्मठ होते. त्यांचे स्वत:साठी अत्यंत कठोर आचरण असायचे, तर इतरांसाठी विशाल मानवतावादी दृष्टिकोन असायचा.
आणिबाणीच्या काळानंतर अडत व्यवसाय पूर्ण बंद झाला होता. त्या व्यवसायाचे कर्ज फेडणे मोठे आव्हान होते. नवीन व्यवसायासाठीही कर्ज काढावे लागले, कारण तेही गरजेचे होते. त्यामुळे अक्षरश: कर्जाचा डोंगर झाला होता. एक दिवस बँकेचे संचालक घरी आले व म्हणाले, ‘‘आम्ही पूर्ण व्याज माफ करतो. तुम्ही मुद्दल भरा. तसा अर्ज द्या. बाबांनी निक्षून सांगितले, ‘‘मला व्याजासहित बँकेचे पैसे फेडायचेच आहेत. मला फक्त वेळ द्या.’’ नंतर व्याजासह पैसे फेडले गेले.
अटलजी, स्व. नानाजी देशमुख व जगन्नाथराव जोशी त्यांचे आदराचे स्थान होते. नानाजींचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. सर्वश्री बबनराव देशपांडे, मा. गो. वैद्य, वसंतराव भागवत, उत्तमराव पाटील (धुळे), प्रभाकरपंत पटवर्धन, लक्ष्मणराव मानकर, सुमतीताई सुकळीकर, प्रमिलाताई टोपले, मोतीरामजी लहाने, दादाजी देशकर व दादासाहेब हावरे या समवयस्कांशी त्यांचा सतत संपर्क असे.
अटलजींबद्दल त्यांच्या मनात विशेष आदराचे स्थान होते. १३ महिन्यांचे त्यांचे सरकार आले, तेव्हा त्यांनी घरी मोठा धार्मिक कार्यक्रम केला होता व सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांना, भेदभाव न करता सपत्निक पूजेला बसविले होते.
२०१४ मध्ये मोदींचे सरकार झाले. त्यावेळेस माझ्या मुलाने (मंदार) त्यांना विचारले, ‘‘आबा, मोदी पी. एम. झाले. खूष आहात ना?’’ ते म्हणाले, ‘‘मोदी पी. एम. झाल्यापेक्षा पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले, याचा आनंद जास्त आहे.’’ त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचे समवयस्क मित्र व कार्यकर्ते नारायणराव पांडे त्यांना भेटायला आले. नारायणकाकांना चालता येत नसल्याने ऑटो पोर्चपर्यंत आणला. काका ऑटोत बसलेले व बाबा समोर खुर्चीवर. अक्षरश: नि:शब्द भेट! १० मिनिटे दोघेही एकमेकांकडे पाहात होते. दोघांच्याही डोळ्यांत अश्रूंच्या धारा. माझ्या पत्नीने (सौ. मंजूषा) त्या भावस्थितीचा फोटा काढला. नंतर तरुण भारत दैनिकामध्ये ‘याचसाठी केला होता अट्‌टहास’ या शीर्षकासह तो छापला होता. कौटुंबिक व सामाजिक आयुष्यात त्यांनी अनेकांना मदत केली. अनेक संसार उभे केले. अनेक वाचवले. अनेकांना कामधंद्याला लावले. अनेक वादात मध्यस्थी करून ते मिटवले, पण त्याचा उच्चार कधीही केला नाही. जेव्हापासून समजायला लागले तेव्हापासून त्यांचे आयुष्य शेवटपर्यंत बघण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्याप्रमाणे ‘असू अम्ही सुखाने पत्थर पायातील’ या भावनेने कार्य करणार्‍या सर्व दिवंगत व हयात कार्यकर्त्यांना बाबांच्या स्मृतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक अभिवादन!!!
मोहन देव
९८५०४०६०८२