कल्पवृक्ष

0
43

हृदयातील भगवंत राहिला…

एकदा एका माणसाच्या मनात गुरू करण्याची इच्छा झाली. तो गुरूच्या शोधात निघाला. वेशीवरच त्याला एक सज्जन माणूस बसलेला दिसला. त्याने त्याला विचारले, ‘‘मला गुरू कुठे मिळेल आणि तो कसा ओळखायचा?’’ यावर तो म्हणाला, ‘‘त्याने हिरवे पागोटे घातलेले असेल आणि वडाच्या झाडाखाली बसलेला असेल.’’ हे ऐकल्यावर तो माणूस निघाला. गावोगाव गुरूच्या शोधात भटकायला लागला. अनेक महिने गेले, पण त्याला कुठेही वडाच्या झाडाखाली बसलेला, हिरवे पागोटे घातलेला माणूस भेटला नाही. शेवटी, थकून-कंटाळून तो गावी परत आला. आणि पाहतो तर काय, शिवेवर वडाच्या झाडाखाली हिरवे पागोटे घालून एक माणूस बसलेला दिसला. तो त्याच्या जवळ गेला. ज्याला त्याने विचारले होते, तोच माणूस हिरवे पागोटे घालून बसलेला होता. त्याला आश्‍चर्य वाटले. त्याने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही त्याच वेळेस का नाही सांगितले, की तुम्हीच माझे गुरू आहात म्हणून?’’ तो म्हणाला, ‘‘तू विचारले त्या वेळीही, मी हिरवे पागोटे घालून येथेच बसलो होतो, पण तुझेच लक्ष नव्हते. जो मुळातच जागृत नाही त्याला जगात कुठेही गुरू भेटू शकत नाही आणि जो जागृत आहे, त्याला कुठेही गुरू भेटल्याशिवाय राहणार नाही.’’ पुढे तो म्हणाला, ‘‘आपल्या आयुष्यातही असेच घडत असते. आपल्या प्रत्येकाच्या जवळ जे आहे, त्याकडे आपले साफ दुर्लक्ष होते. आपल्याजवळ असलेली शक्ती आपण विसरतो आणि कुठल्यातरी बाह्य शक्तीची कृपा व्हावी म्हणून तिच्या शोधात फिरत राहतो. अध्यात्माचा रस्ता आतून बाहेर जातो. बाहेरून आत जात नाही. गुरू फक्त हीच दिशा दाखवतो. त्याने वाटचाल केलेली असल्यामुळे काही संकेत देतो. वाटचाल आपली आपल्यालाच करायची असते.’’
पूर्वी आकाशवाणीवर सकाळी ‘कुठे शोधिशी रामेश्‍वर अन् कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी…’ हे सुधीर फडके यांच्या आवाजातले अर्थपूर्ण भक्तिगीत लागायचे. काशी किंवा रामेश्‍वरला जायला हरकत नाही, पण हृदयातल्या भगवंताकडे दुर्लक्ष व्हायला नको. ‘काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशाशी’ अशा आर्त स्वरात ते गीत आपल्याला प्रश्‍न विचारते. पण, काय असतो हा हृदयातला भगवंत आणि उशाशी असलेला दीप? आमच्या तरुण वयात एकदा एका थोर, पण अप्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तीशी भेटण्याचा योग आला. केवळ पुस्तकी माहिती असलेले आम्ही तरुण होतो. आम्ही त्यांना प्रश्‍न विचारला, ‘‘खरेच विवेकानंदांना रामकृष्णांनी जसा देव दाखवला, तसा देव दिसू शकतो का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थात, दिसू शकतो. तुम्हालाही दिसू शकतो. मीही दाखवू शकतो.’’ त्यांच्या उत्तराने आम्ही अनपेक्षितपणे चक्रावून गेलो. ते आमची गंमत तर करत नाही ना, असे हसतच आम्ही त्यांना विचारले. तेही हसायला लागले आणि गमतीने म्हणाले, ‘‘विवेकानंद इतके लाईटली विचार करत होते का?’’ पुढे ते म्हणाले, ‘‘आपण या विषयावर कधी गंभीरपणे विचार करत नाही. तुमच्या मनात देवाची कशी प्रतिमा आहे, कोणते स्वरूप आहे, तसा देव दाखवतो. बोला.’’ आता त्यांनी चेंडू आमच्याच कोर्टात टाकला. आम्ही म्हणालो, ‘‘मूर्तीत, चित्रात दिसतो तसा.’’ ते म्हणाले, ‘‘या प्रतिमा कलावंतांनी, चित्रकारंानी निर्माण केल्या आहेत. देव तसाच आहे, याची तुम्हाला खात्री आहे का? आणि दिसल्यानंतर तो देवच आहे, याची खात्री पटण्याकरिता नक्की त्याने काय करायला हवे? ज्याला तुम्ही पाहिलेच नाही, त्याची तुम्ही केलेली कल्पना खरीच आहे, हे कशावरून?’’ आम्ही पुन्हा आमचे पुस्तकी ज्ञान पाजळले आणि म्हणालो, ‘‘देव सर्वत्र आहे, तो कोणत्याही स्वरूपात दिसू शकतो.’’ तितक्यात तेथे घरमालकाचा कुत्रा आला. ते म्हणाले, ‘‘हे पाहा, या स्वरूपात देव आला आहे, असे मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही विश्‍वास ठेवाल का? तुम्ही सांगितलेली कल्पना खरी आहे, हे तुम्हाला सिद्ध करता येत नाही. मी ज्या स्वरूपात दाखवेल, त्यावर तुमचा विश्‍वास नाही. आणि मुळात तुम्ही ज्याला सर्वव्यापी आहे म्हणता, त्याला साध्या डोळ्याने पाहता येईल का? आकाशगंगेतील ग्रहतरी साध्या डोळ्‌यांनी दिसतात का? त्याकरिता प्रचंड मोठ्या दुर्बिणींची, ब्रह्मांडासंबंधी मूलभूत ज्ञानाची आवश्यकता असते. तुम्हाला देव पाहायचा असेल, तर तुम्हालाही दृष्टी विकसित करावी लागेल. देव सर्वत्र असेल, तर तो तुमच्यातही आहे. देवाची कल्पना काही वेळ बाजूला ठेवा. तुमची स्वत:ची मूर्ती कशी असावी, याचीतरी तुम्ही कल्पना केली आहे का? सर्वात उत्तम हे आहे, की स्वत:ला समजून घ्या. आपल्यातल्या मूर्तीचे, देवाचे दर्शन घ्या. आपण आपल्याला पाहू शकतो आणि स्वत:ला घडवू शकतो, ही ईश्‍वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रथम त्याचा आदर करा. एखादा मूर्तिकार दगडातून मूर्ती तयार करतो, त्या वेळी तो काय करतो? मूर्ती दगडात आधीपासून असतेच. त्याच्या मनातही त्याची स्पष्ट कल्पना असते. तो फक्त दगडाचा अनावश्यक भाग छिन्नीने हळुवारपणे काढून टाकतो. आपल्यातला अनावश्यक भाग कठोरपणे काढून स्वत:ची मूर्ती घडवा. आपले स्वत:बद्दलचे आकलान जसे वाढत जाईल, तसे मूर्तीतील बारकावे स्पष्ट होत जातील. या बाबतीत स्वत:शी प्रामाणिक राहण्याची गरज असते. अशी मूर्ती घडवताना एकाग्रता, भावनांचा संयम, विवेक, कौशल्य, सौंदर्यदृष्टी, प्रतिमेविषयी स्पष्टता, सातत्य, स्वत:वरची श्रद्धा, विश्‍वास अशा गुणांची गरज असते. यालाच आध्यात्मिक साधना म्हणतात. ही प्रदीर्घ काळची साधना असते. ती पूर्ण होण्याकरिता आधी अपूर्णतेचा अनुभव यावा लागतो. मग दुसर्‍यांनी परिपूर्ण राहावे, हा आग्रह चुकीचा आहे, हेही कळते.’’
हृदयातल्या भगवंताचा नवा अर्थ त्या दिवशी कळला. इथे उजेड पाडल्याशिवाय कुठलाही, कोणताही अंधार दूर होऊ शकत नाही, याची जाणीव झाली.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११