वेध

0
38

मूर्ती लहान…!

मनात इच्छाशक्ती असेल, तर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो, मग त्याला वयाचीही मर्यादा अडथळा निर्माण करू शकत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण नागपुरातील एका चिमुकलीने समाजासमोर उभे केले आहे. या चिमुकलीचे नाव आहे- दिव्या देशमुख! दिव्याला समजायला लागल्यापासूनच तिला वडिलांकडून बुद्धिबळाचे बाळकडू मिळाले. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी तिने आवडी-निवडी, टीव्ही, कार्टून, मोबाईल या सर्वांवर पाणी सोडले. मनावर नियंत्रण व संयम या दोन गुणवैशिष्ट्यांमुळेच दिव्याला अल्पवयात मोठे यश प्राप्त करता आले. वयाच्या बाराव्या वर्षी तिने जगज्जेतेपद मिळविले. एकदा नव्हे, तर दोनदा या विश्‍वविजेत्या चषकावर आपले नाव कोरण्याचा मान मिळविणारी नागपूर-विदर्भातील ती पहिली आणि एकमेव बुद्धिबळपटू ठरली! बुद्धिबळाच्या ६४ घरांच्या पटावर जगातील दिग्गज बुद्धिबळपटूंना सळो की पळो करून सोडणार्‍या दिव्याने नुकत्याच ब्राझील येथे पार पडलेल्या १२ वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धेतील मुलींच्या विभागात विश्‍वविजेता होण्याचा मान मिळविला. एवढेच नव्हे, तर कमी वयात बुद्धिबळातील ‘फिडे मास्टर’ हा किताब पटकाविण्यातही तिला यश आले आहे. दिग्गज बुद्धिबळपटूंना हरविणार्‍या दिव्याला जास्त आनंद मात्र, वडील डॉ. जितेंद्र देशमुख यांना पराभूत करण्यात येतो! वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच दिव्या बुद्धिबळ खेळाकडे वळली. वडिलांसोबतच सराव करता करता तिने आपला खेळ विकसित केला. त्यामुळेच की काय, आपण वडिलांना पराभूत केले पाहिजे, हेच तिच्या मनात सतत घोळत राहिले. त्यामुळेही कदाचित तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकांचे आव्हान थिटे वाटले असावे. ज्या वयात इतर मुले-मुली हाती रिमोट घेऊन घरी असताना सदैव टीव्हीसमोर बसतात, कार्टूनमधील विविध पात्रांमध्ये रंगून जातात, एवढेच नव्हे, तर आईवडील किंवा घरच्या वडीलधार्‍यांचे मोबाईल हिसकावून घेत त्यावर गेम खेळत बसतात, त्याच वयात दिव्याने या सार्‍या बाबींना दूर सारून आपली वेगळीच वाट निवडली आणि त्यावर ती यशस्वी रीत्या मार्गक्रमण करीत आहे. दिव्याने गेल्या पाच-सहा वर्षांपासून टीव्हीच पाहिलेला नाही. ती कधीकधी बोलून जाते की, आमच्या घरी टीव्हीच नाही! आपल्या या कामगिरीमुळेच तिने ‘वंडर गर्ल’ म्हणूनही नावलौकिक मिळविला आहे. याआधी तिने एक जेतेपद पटकाविल्यानंतर तिला मिळालेला चषक चक्क तिच्या स्वत:च्या उंचीपेक्षा उंच होता! दिव्याने वयाच्या सातव्या वर्षी वूमन फिडे मास्टरचा मान पटकावला होता. दिव्याने आतापर्यंतच्या आपल्या अल्पकालावधीत दोन वेळा राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेत विजेतेपद मिळविले आहे. याशिवाय तिने अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. नागपूर ही बुद्धिबळाच्या दृष्टीने एक उत्कृष्ट नगरी म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते. अनुप देशमुख आणि स्वप्निल धोपाडेनंतर दिव्यानेही नागपूरचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावला आहे. नागपूर-विदर्भातील पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर्सचा किताब अनुपने मिळविला होता, तर स्वप्निल विदर्भातील एकमेव ग्रॅण्डमास्टर आहे; तसेच दिव्याही आता विदर्भातील पहिली महिला फिडे मास्टर ठरली आहे. एवढेच नव्हे, तर जगात हा किताब पटकाविणारी ती सर्वात कमी वयाची बुद्धिबळपटू आहे!
महेंद्र आकांत
९८८१७१७८०३