दिल्लीचे वार्तापत्र

0
79

राहुल गांधी, तुम्ही असेच बोलत राहा…

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर जे बोलले, त्याचे कौतुक करावे की निषेध, ते समजत नाही. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी आपल्या काही चुकांची कबुलीही दिली, याबरोबर आपल्या पक्षाला घरचा अहेरही केला! हे करताना गेल्या जवळपास दोन दशकांपासून कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व आपल्या आईकडेच आहे, याची जाणीवही त्यांनी ठेवली नाही. पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताकरता त्यांच्यावर टीकाच जास्त केली. याबरोबर पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळायला आपण तयार असल्याचे संकेतही राहुल गांधी यांनी दिले.
अमेरिकेतील विद्यार्थ्यांसमोर राहुल गांधी यांनी बोलणे काही चुकीचे नव्हते, पण ते जे बोलले ते मात्र पूर्णपणे चुकीचे होते. राजकारणात यशस्वी होण्यासाठी जे अनेक गुण कारणीभूत ठरतात, त्यात वक्तृत्व हा मोठा गुण आहे. मात्र, राहुल गांधी यांच्याजवळ वक्तृत्व नाही. त्यांचे भाषण एखाद्या शाळकरी विद्यार्थ्यासारखे पाठ केल्यासारखे वाटत असते. तशीच स्थिती संसदेत वा अन्यत्र भाषण करताना राहुल गांधी यांची असते. पक्षातील नेते राहुल गांधी यांच्या भाषणाची अशीच तयारी करून घेतात, राहुल गांधीही पूर्ण भाषण जवळपास पाठ करून आलेले असतात. पण, प्रत्यक्ष भाषण करताना राहुल गांधी गोंधळतात आणि एखादी चूक करून स्वत:चे हसे करून घेतात.
राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे, काय बोलायचे यापेक्षा काय बोलू नये, हे समजण्याचा असतो. राहुल गांधी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रत्येक विदेश दौरा हा वादाच्या भोवर्‍यात सापडत असतो. तसा त्यांचा यावेळचा अमेरिका दौराही वादाच्या भोवर्‍यात सापडला. याचे कारण म्हणजे त्यांनी परदेशाच्या धरतीवरून भारताच्या पंतप्रधानांवर, त्यांच्या सरकारवर टीका केली. सामान्यपणे परदेशात गेल्यावर आपण सगळेच कोणत्याच पक्षाचे नसतो, तर फक्त भारतीय असतो. त्यामुळे परदेशात आपल्या मतांचा प्रसार आणि प्रचार करण्यात काही गैर नसते, मात्र असे करताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर, त्यांच्या सरकारवर टीका करणे औचित्याला धरून नसते. याचा अर्थ, विरोधी पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानांवर, सरकारवर टीका करण्याचा अधिकार नसतो, असा नाही. तुम्ही आपल्या देशात असताना पंतप्रधानांवर, सरकारवर कितीही टीका करा, कुणी त्यावर आक्षेप घेणार नाही. पण, याचे भान राहुल गांधी यांनी ठेवले नाही.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची सुरुवात करण्याच्या आधी राहुल गांधी यांनी त्यांची प्रशंसा केली. मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ते आहेत, एकाच वेळी सभेतील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना कसे जिंकायचे, याचे कौशल्य त्यांच्याजवळ आहे, असे सांगत मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत अभियाना’चे राहुल गांधी यांनी कौतुक केले. मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. नंतर मात्र त्यांनी आपले खायचे दात दाखवले! पंतप्रधान मोदी यांनी पीडीपीशी आघाडी करत सरकार स्थापन केल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये विघटनवाद्यांचा हिंसाचार वाढला, नोटबंदीचा देशावर प्रतिकूल परिणाम झाला, आर्थिक विकास दर घटला, बेरोजगारी वाढली, असे राहुल गांधी म्हणाले. चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. सवार्र्त महत्त्वाचे म्हणजे भारत हा देश घराणेशाहीनेच चालत आहे, असे सांगताना त्यांनी अखिलेश यादव, अभिषेक बच्चन, अनिल अंबानी, मुकेश अंबानी, स्टॅलिन यांची उदाहरणे दिली.
राहुल गांधी बर्कले विद्यापीठात जे बोलले, तो योगायोग नाही, तर तो एका योजनेचा भाग म्हणावा लागेल. त्यामुळेच बर्कले विद्यापीठात भाषण करताना आपण किती तटस्थ आणि निष्पक्ष आहेत, याचे दर्शन घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव का झाला, या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी २०१२ मध्ये कॉंग्रेस पक्षाला अहंकाराची लागण झाली, आम्ही जनतेशी संवाद थांबवला, लागोपाठ १० वर्षे सत्तेत राहिल्यामुळे कोणत्याही पक्षात असे अवगुण येत असतात, असे एखाद्या विचारवंताचा आव आणत राहुल गांधी यांनी सांगितले. मात्र, कॉंग्रेस पक्षाला म्हणजे नेमक्या कुणाला अहंकाराची लागण झाली, ते त्यांनी स्पष्ट केले नाही.
खरं म्हणजे राहुल गांधीही २०१२ मध्ये कॉंग्रेसच्या राजकारणात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. ज्या घराणेशाहीचा उल्लेख त्यांनी केला, त्या घराणेशाहीच्या एकमेव आधारावरच अन्य कोणतीही पात्रता नसताना, स्वत:ला पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि विद्वान समजत होते. त्यामुळेच डॉ. मनमोहनसिंग परदेशाच्या दौर्‍यावर असताना, त्यांच्या सरकारच्या एका अध्यादेशाच्या प्रती राजधानी दिल्लीतील प्रेसक्लबमध्ये टराटरा फाडत होते. यातून राहुल गांधी यांच्या अहंकाराचे, आपण पंतप्रधानापेक्षा श्रेष्ठ असल्याचा अहंकारच दिसत नव्हता का? डॉ. मनमोहनसिंग सरकार चुकीच्या दिशेने जात होते, त्यांचा अध्यादेश चुकीचा होता, तर तसे सांगण्याचे अन्य मार्ग आणि घराणेशाहीने मिळालेला अधिकारही राहुल गांधी यांच्याकडे होता. पण, त्याचा वापर न करता त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाचा अपमान केला. डॉ. मनमोहनसिंग यांच्या पायाजवळही उभे राहण्याची आपली लायकी आहे का, याचे आत्मपरीक्षण राहुल गांधी यांनी केले पाहिजे. त्यामुळेच आज अमेरिकेत जाऊन स्वत:च्या नसलेल्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवणार्‍या राहुल गांधी यांना, ‘तेव्हा कुठे गेला होता सोनियासुता तुझा धर्म?’ असे विचारावेसे वाटते.
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची मान उंचावली असे सांगतात, तेव्हा हसावे की रडावे ते समजत नाही. देशाच्या संसदेत ५४६ सदस्य आहेत, असे सांगणार्‍या राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न बघण्याआधी आधी आपले सामान्य ज्ञान वाढवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याआधी राहुल गांधी यांनी देशातील शेतीचा अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजे शेतकर्‍यांसाठी मी आलूची फॅक्टरी सुरू करणार, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती!
काहीच समजत नसताना आपल्याला सर्वकाही समजते, या राहुल गांधी यांच्या आविर्भावामुळे कॉंग्रेसचे नेते त्रस्त आहेत, मात्र त्यांना बोलता येत नाही. तरी मध्यंतरी कॉंग्रेसच्या एका प्रदेशपातळीवरील नेत्याने राहुल गांधी यांचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे फायदा नाही, तर कॉंग्रेसचे नुकसानच जास्त होत आहे. तरीही राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदासोबत पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहतात. कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाला करायचे, हा देशातील जनतेचा नाही, तर कॉंग्रेसच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे, मात्र देशाचा पंतप्रधान कुणाला करायचे, याचा निर्णय जनतेने २०१४ मध्ये राहुल गांधी यांना नाकारून आणि नरेंद्र मोदी यांची निवड करत घेतला आहे.
लोकशाहीत आपण कुणालाच स्वप्न पाहण्यापासून रोखू शकत नाही, त्यामुळे स्वप्न पाहणे हा राहुल गांधी यांचा अधिकार आहे, याबाबत शंका नाही. मात्र, स्वप्न पाहताना आणि बोलताना आपले हसे आणि देशवासीयांची करमणूक होणार नाही, याची काळजी राहुल गांधी यांनी घेतली पाहिजे. राहुल गांधी जेवढे जास्त बोलतील, तेवढा कॉंग्रेसचा नाही तर आमचा फायदा होत असतो, असे भाजपाचा एक ज्येष्ठ नेता सांगत होता. राहुल गांधी यांनी देशहितासाठी कॉंग्रेसचे नुकसान आणि भाजपाचा फायदा करायचे ठरवले असेल, तर आपण त्यांना रोखणारे कोण? राहुल गांधी तुम्ही असेच बोलत राहा, पंतप्रधान मोदींवर विनाकारण टीका करत राहा, असेच आपण देशाच्या दीर्घकालीन हितासाठी म्हणू शकतो…
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७