अग्रलेख

0
92

बरे झाले, उपरती झाली!

देशातील सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाच्या उपाध्यक्षाला, गतकाळात केलेल्या चुका मान्य करण्याची उपरती झाली, हे बरेच झाले. विलंबाने का होईना, उपाध्यक्षांना शहाणपण सुचले, हे त्या पक्षाच्या दृष्टीने चांगले झाले. उपाध्यक्षांनी जी कबुली दिली आहे, ती कबुली म्हणजे पक्षासाठी शुभसंकेत मानला पाहिजे. केलेल्या चुकांमुळेच मतदारांनी या पक्षाला घरचा रस्ता दाखवला होता, हे २०१४ मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर सव्वातीन वर्षांनी कळले, हेही बरे झाले. ही बाब आधीच लक्षात घेतली असती, तर लोकसभेनंतर झालेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले नसते. जुन्याजाणत्या नेत्यांना अडगळीत टाकून संधिसाधू चेहर्‍यांना पुढे केल्याने, स्वातंत्र्यापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या पक्षाचे पानिपत झाले, हे स्पष्ट आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या या पक्षाची, जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात जी वाताहत झाली, त्याची कारणमीमांसा पराभवाच्या तीन वर्षांनंतर का होईना, करण्यात आली आणि विशेष म्हणजे ज्यांच्यावर पक्षाच्या पराभवाचे खापर फोडले जाते, त्यांनी अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात केलेल्या भाषणात ही कारणमीमांसा केली, याला महत्त्व आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच या पक्षाचे उपाध्यक्ष आणि स्वयंघोषित युवराज, भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानत आले. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी यांना मोदी, भाजपा आणि संघच दिसत होता! या पक्षाची केंद्रात सलग दहा वर्षे राजवट असताना लाखो कोटी रुपयांचे घोटाळे झालेत, भ्रष्टाचाराच्या किडीने देश पोखरून निघाला, जनता या पक्षाच्या राजवटीला कंटाळली होती आणि जनतेने २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंगाही दाखविला. लोकशाहीत जनताच सर्वश्रेष्ठ आहे, हे स्पष्ट झाले. सदासर्वकाळ तुम्ही जनतेला गृहीत धरून चालू शकत नाही, हे मतदारांनी मतपेटीतून स्पष्ट केले. मतपेटीसाठी स्वत: अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करायचे, दाढ्या कुरवाळायच्या अन् इतरांवर सांप्रदायिक असल्याचा आरोप करायचा, हा दुटप्पीपणा जनतेने ओळखला आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या पक्षाची वाट लावली. आज हा पक्ष अस्तित्वाची लढाई लढतो आहे. २०१२ साली आमच्या पक्षात, पक्षाच्या नेत्यांमध्ये अहंकार पसरला होता, नेते एवढे उर्मट झाले होते की, त्यांनी सर्वसामान्य लोकांशी संवादही थांबविला होता. स्वत:च्या पक्षाचे स्पष्ट बहुमत नसतानाही सतत दहा वर्षे सत्तेत राहिल्यामुळे नेते गुर्मीत वागत होते. २०१४ सालीही आपलीच सत्ता येणार, या गुर्मीत नेते वावरत होते. पण, प्रत्यक्षात नेत्यांची ही गुर्मी मतदारांनी पार उतरवली, हे युवराजांना आता कळले. बरे झाले, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी यांना चूक लक्षात आली. तसा उशीरच झाला आहे. कारण, २०१९ च्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष, पक्षातील अहंकारी नेते, चुका दुरुस्त करतील याची कसलीही खात्री देता येत नाही. याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात भाजपाने २०१९ च्या निवडणुकीसोबतच गुजरात आणि ओरिसासारख्या राज्यांमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारीही सुरू केेली आहे. शिवाय, सव्वातीन वर्षांच्या कार्यकाळात मोदी आणि शाह यांनी केवळ कॉंग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात धन्यता न मानता देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर केले आहे. जनतेच्या हिताच्या योजना प्रत्यक्षात राबवून जनतेला दिलासा देण्याचे काम मोदींकडून सुरू असताना, कॉंग्रेस व राहुल गांधी सातत्याने पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करीत आहेत. ही टीका जनतेला आवडत नाही, हे लक्षात घ्यायलाच कॉंग्रेस पक्ष तयार नाही. आता अमेरिकेत जाऊन कॉंग्रेसच्या युवराजांना चुका कबूल करण्याची उपरती झाल्याने आणि पुढल्या महिन्यात ते पक्षाची सूत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त असल्याने, २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेस एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून समोर येईल, याची शक्यता तेवढी वाढली आहे. गतकाळात ज्या चुका केल्या, त्याचे फळ जनतेने २०१४ साली कॉंग्रेसला दिले. पण, त्यातून बोध न घेता राज्यसभेतील पाशवी बहुमताच्या बळावर कॉंग्रेसने संसदेत मोदी सरकारला घेरण्याचे आणि संसदेचे कामकाज ठप्प पाडण्याचे एकमेव काम केले. संसदेत कॉंग्रेस कशाप्रकारे गोंधळ घालते आहे, हे देशाने पाहिले. जनहिताच्या मुद्यांवर सरकारला चर्चा करण्यास भाग पाडण्याऐवजी, सरकारशी संघर्ष करून संसदेचे अतिशय मौल्यवान कामाचे तास वाया घालवण्यात युवराज व त्यांच्या सहकार्‍यांनी धन्यता मानली, यातच सगळे आले. घराणेशाहीबद्दल राहुल गांधी जे बोलले ते काही प्रमाणात खरे असले तरी पूर्ण सत्य नाही. देशात सगळीकडेच घराणेशाही आहे, मग मलाच का लक्ष्य केले जाते, असा सवाल त्यांनी केला. पण, कॉंग्रेस पक्षात जेवढी घराणेशाही आहे, तेवढी अन्य कुठल्याही पक्षात नाही. भाजपामध्ये कसलाही राजकीय वारसा नसलेले लोक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत, याचा विसर राहुल गांधींना पडलेला दिसतो. कुशाभाऊ ठाकरे, एम. व्यंकय्या नायडू, बंगारू लक्ष्मण, नितीन गडकरी यांना घरून कोणत्याही प्रकारचे पाठबळ नव्हते आणि राजकीय वारसाही नव्हता; तरीसुद्धा हे नेते भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोचले, ते केवळ पक्षात घराणेशाही नसल्यामुळेच! पंतपधानपदी आरूढ असलेले नरेंद्र मोदी यांचे तर ज्वलंत उदाहरण आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेला माणूस देशाचा पंतप्रधान होतो आणि पक्ष अशा व्यक्तीला संधी देतो, हे फक्त भाजपासारख्या पक्षातच होऊ शकते. कॉंग्रेसने डॉ. मनमोहनसिंगांना जरूर पंतप्रधानपद दिले होते, पण प्रत्यक्षात कारभार कोण चालवत होते, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचा अध्यादेश जाहीरपणे फाडून त्या पदाचा अवमान करीत खरी सत्ता कुणाची आहे, हे तर युवराजांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले होते. त्यामुळे घराणेशाहीद्दल राहुल गांधींना बोलण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्याची राहुल गांधी यांना संधी आहे. पण, या दोन्ही नेत्यांवर ते टीका करू शकत नाही. कारण, त्यांची घराणेशाही मान्य करूनच राहुुल गांधींच्या कॉंग्रेसने उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंहांची समाजवादी पार्टी आणि लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केली होती. आजही बिहारमध्ये लालूंसोबत असलेली कॉंग्रेसची युती कायम आहे. हे सगळे विसरून राहुल गांधी घराणेशाहीबाबत झालेली चूक मान्य करणार नसतील, तर कॉंग्रेस पक्षाचे काय होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही! कॉंग्रेस पक्षात अनेक दिगग्ज नेते आहेत. प्रत्येक राज्यात कॉंग्रेसचे अस्तित्व आहे, निष्ठावान कार्यकर्ते आहेत. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी काहींना संधी देऊन कॉंग्रेस पक्ष स्वत:ची ताकद वाढवू शकतो. पण, दिल्लीत बसलेल्या चौकडीकडून आपले निर्णय लादण्याचेच काम अजूनही चालू असल्याने, प्रादेशिक नेतृत्वाला एकप्रकारे दुर्लक्षित करीत संधी नाकारली जात आहे. त्यामुळे अमेरिकेत जाऊन गतकाळात झालेल्या चुकांची नुसती कबुली देण्याने काम भागणार नाही. त्यासाठी कॉंग्रेसला अन् राहुल गांधींना प्रत्यक्ष कृती करावी लागेल. खरे तर राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या विद्यापीठात जाऊन चुकांची कबुली देण्याऐवजी दिल्लीत भरगच्च पत्रकार परिषद घेऊन अशी कबुली दिली असती, तर कॉंग्रेस पक्षाच्या दृष्टीने ते अधिक चांगले ठरले असते…