मेयोतील मृतदेहाचे उंदरांकडून विच्छेदन!

0
25

– दोन्ही डोळे व नाक कुरतडले
– नातेवाईकांच्या गोंधळामुळे तणाव
नागपूर, १३ सप्टेंबर
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) येणार्‍या रुग्णांना उपचारावेळी अनेक समस्या आणि डॉक्टरांची हेटाळणी सहन करावी लागते. अशातच येथील मृतदेहदेखील सुरक्षित नाही. मेयोमध्ये विच्छेदनासाठी ठेवण्यात आलेल्या मृतदेहाचे दोन्ही डोळे व नाक उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक बाब बुधवार १३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मेयो प्रशासनाने मात्र याबाबत केवळ बघ्याची भूमिका निभावली. मृतदेहाची अशी अवस्था झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी परिसरात गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होेते. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा तणाव निवळला आणि नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला.
ंइंदोरा परिसरात फोटो स्टुडिओ चालविणारे मधुकर टेंभुर्णे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी विच्छेदनासाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागात पाठवण्यात आला. पंचनाम्यासाठी बुधवारी जरीपटका पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता, शवाचे डोळे कुरतडल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली. मात्र डॉक्टरांनी आपल्याला काहीच माहीत नसल्याचा आव आणत केवळ बघ्याची भूमिका निभावली. मृतदेहाची विटंबना सहन न झाल्याने आणि डॉक्टरांच्या चुप्पीमुळे नातेवाईकांनी परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हा वाद मिटवला. त्यानंतर मेयोच्या शवविच्छेदनगृहात मृतदेहाचे डोळे कुरतडल्याची नोंद पोलिसांच्या पंचनाम्यात करण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे नातेवाईकांनी दुपारी ३ वाजता मृतदेह स्वीकारला.
मेयोच्या शवविच्छेदनगृहामध्ये उंदरांचा वावर असून, ते मृतदेह कुरतडतात हा मुद्दा तत्कालीन आमदार आणि विद्यमान आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत मांडला होता. मात्र त्यानंतरही मेयो प्रशासनाने सुधारणा केलेली नाही. या विभागात तीन ‘फ्रीज’ आहेत. मात्र त्यांनाही छिद्रे असल्याचे समजते. उंदरांनी डोळ्यांमधून रक्त बाहेर येईस्तोवर मृतदेह कुरतडला आहे. तसेच नाकही कुरतडल्याने चेहरा विद्रूप दिसत होता. मागील ७ वर्षांपासून मेयोच्या शवविच्छेदनगृहात उंदरांचा मुक्तसंचार आहे. मात्र मेयो प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होते.
विभागप्रमुखांचे अधीक्षकांना पत्र
मेयोच्या शवविच्छेदन विभागाचे प्रमुख डॉ. मरकंद व्यवहारे यांनी १२ जुलै २०१७ रोजी वैद्यकीय अधीक्षकांना विभागातील काही अडचणींची माहिती देणारे पत्र पाठविले होते. त्यामध्ये विच्छेदनगृहात मृतदेह ठेवताना चेहरा व शरीर पूर्ण झाकून आणि बांधून ठेवावे लागतात. येथील दरवाजा बरोबर नसल्याचे नमूद करून कोल्डस्टोरेजमध्ये समस्या आहेत. कर्मचारी मृतदेह व्यवस्थित झाकत नाही. शिवाय यापूर्वीही मृतदेह कुरतडण्याचे प्रकार घडल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.
मेयोच्या शवविच्छेदन विभागातील मृतदेह कुरतडल्याबाबत कोणतीही तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही. नातेवाईकांनी दुपारी ३ वाजता विच्छेदनानंतर मृतदेह स्वीकारला. विभागप्रमुख डॉ. व्यवहारे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी विभागातील समस्या मांडणारे पत्र प्रशासनाला दिल्याचे कळले.
डॉ. अनुराधा श्रीखंडे, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय.