आयुष पुगलियाच्या खुनाची चौकशी सुरू

0
19

– कारागृह प्रशासन करणार सर्व बाबींचा तपास
नागपूर, १३ सप्टेंबर
येथील मध्यवर्ती कारागृहात आयुष पुगलिया या तिहेरी जन्मठेपेच्या कैद्याचा खून झाल्यानंतर सर्व स्तरातून कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत असल्याने या घटनेला जबाबदार कोण, याची चौकशी कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे.
कुश कटारिया या मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून आयुषने त्याचा खून केला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आयुषला तिहेरी जन्मठेप सुनावली होती. मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. ज्या बराकीत आयुषला ठेवण्यात आले होते तेथेच राजुरा (जि. चंद्रपूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सूरज कोटनाके यालाही ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून आयुष आणि सूरज यांच्यात धुसफूस सुरू होती. या कारणावरून ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास सूरजने आयुषचा खून केला होता. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी कारागृह प्रशासनावर टीकेची झोड उठविली.
आयुषच्या खुनाला जबाबदार कोण, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. एकाच बराकीत राहत असताना आयुष आणि सूरज यांच्यात धुसफूस सुरू होती. त्यांचे भांडण देखील झाले होते. त्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली होती. हे कारागृह प्रशासनाला माहीत नव्हते का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची कारागृह प्रशासनाने आपली चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत आयुष आणि सूरज यांच्यातील भांडणाची माहिती कोणत्या कर्मचार्‍याला होती, तसे असेल तर त्यांना वेगळ्या बराकीत का ठेवले नाही, ज्यावेळी ही घटना घडली त्या बराकीत कुणाची ड्युटी होती, त्यावेळी ते कर्मचारी किंवा अधिकारी कुठे गेले होते, बराकीत फरशी, तुटलेला चमचा कसा आला, या सर्व बाबींचा तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी स्वत: कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई करीत आहेत.
सूरज कारागृहातच
आयुषच्या मृत्यूप्रकरणी धंतोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. सूरजला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी न्यायालयातून प्रॉडक्शन वारंट मिळविला. त्यानंतर बुधवारी गृह मंत्रालयाला पत्र लिहून सूरजला ताब्यात घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली. या घटनेमुळे गृह मंत्रालय देखील गंभीर आहे. वृत्त लिहीपर्यंत गृह मंत्रालयाने परवानगी दिली नव्हती. परंतु, मध्यरात्रीपर्यंत किंवा गुरुवारी सकाळपर्यंत परवानगी मिळू शकते असे धंतोलीचे दुय्यम पोलिस निरीक्षक दिनेश शेंडे यांनी सांगितले. परवानगी मिळताच उद्या गुरुवारी सूरजला ताब्यात घेण्यात येईल, असेही शेंडे यांनी सांगितले.
कुणाचीही गय नाही : देसाई
आयुष पुगलिया याच्या खुनात जो कुणी कर्मचारी दोषी असेल त्याची गय केली जाणार नाही. अगोदरच नागपूर कारागृहाची लॅप्सेस कारागृह म्हणून ओळख आहे. नागपूर कारागृहाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत असतानाच ही घटना घडली. त्यामुळे या प्रकरणात जे कुणी अधिकारी, कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चितच कारवाई करण्यात येईल, असे कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले.