आजाराचे ठरतेय कारण बदलते वातावरण!

0
34

व्हायरल आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ- डेंग्यू, मलेरियाची दहशत

नागपूर, १३ सप्टेंबर

दिवसागणिक बदलणारे वातावरण आजारांना निमंत्रण देत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. परिणामी सर्वच रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येते. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत चालल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.उन्ह-पावासाचा लपंडाव सुरू असल्याने सर्वत्र दमट वातावरण दररोज असते. हवेतील आर्द्रता वाढली आहे. सूक्ष्म जीवजंतूंसाठी हे वातावरण खूपच पोषक असल्याने आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मेयो, मेडिकल व खासगी रुग्णालयांमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि नागपूर भागातील रुग्ण उचारासाठी येत आहेत. यामध्ये अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे असणारे रुग्ण अधिक आहेत.

वातावरणातील बदलामुळे व्हायरल आजार जोर धरत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डेंग्यूचे २२ रुग्ण नागपूर शहरातील १० झोनची तपासणी करण्यात आली. यात २२ शाळा आणि १४ रुग्णालयांमध्ये डेंग्यूचा लाळवा आढळला. एकट्या नागपूर शहरात जानेवारी २०१७ ते ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे २२ रुग्ण आढळले. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात पाच रुग्णांची नोंद करण्यात आली. मलेरियाचाही प्रकोप शहराला डेंग्यू आणि स्वाईन फ्लूसह मलेरियाचीही लागण झाली आहे. उपराजधानीत मलेरिया नावाचा रोगही आता पाय पसरू लागला आहे.

जानेवारी ते ऑगस्टपर्यंत १० लोकांना मलेरिया झाल्याचे उजेडात आले. एकट्या ऑगस्ट महिन्यात सात नागरिक या आजाराला बळी पडले. व्हायरलचे दररोज दीडशे रुग्णमेडिकलमध्ये मध्यभारतातील रुग्ण उपचारासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात दररोज हजार ते दीड हजार रुग्णांची तपासणी केली जाते. त्यातील कान- नाक- घसा आणि औषधशास्त्र विभागात सुमारे दीडशे रुग्ण व्हायरल इन्फेक्शनचे असतात, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

झोननिहाय डेंग्यूचे आकडे

झोन

लक्ष्मीनगर  १, धरमपेठ (प्रभाग १६) २, धंतोली (प्रभाग ३३) २, गांधीबाग (प्रभाग ८, १३) ३, सतरंजीपुरा १, लकडगंज ३, आशीनगर ६, मंगळवारी ४
डेंग्यू आणि मलेरिया हे आजार कीटकजन्य आहेत. डेंग्यूचे डास सूर्योदयापूर्वी आणि खासकरून दुपारी ३ ते ४ या वेळेत ऍक्टिव्ह असतात. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. नागरिकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी प्रशासनातर्फे अनेक जागृतिपर कार्यक्रम घेण्यात आले. नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.

जयश्री थोटे, हत्तीरोग व हिवताप अधिकारी, मनपा.