अडथळ्यांमुळे ‘वनबाला’ अजूनही थांबलेलीच

0
61

-लहान मुलांसह मोठ्यांचाही हिरमोड
नागपूर, १३ सप्टेंबर
वनविभागाकडून संचालित होणारी वनबाला काही महिन्यांपूर्वी येनकेनप्रकारे सुरू झाली होती. मात्र सुरक्षिततेच्या गोंडस नावाखाली तिला पुन्हा ‘ब्रेक’ लावण्यात आला. हा ब्रेक निघून वनबाला १५ ऑगस्टपासून सुरू होईल, अशी खात्री संबंधित अधिकार्‍यांनी दिली होती. मात्र ऑगस्ट संपून सप्टेंबर देखील मध्यावर आला आहे, पण वनबाला थांबलेलीच आहे.
रेल्वे ट्रॅकवरील दुरुस्तीच्या कामामुळे वनबाला सध्या बंद करण्यात आली होती. ती सुरू करण्यापूर्वीच तिचा ट्रॅक योग्य आहे किंवा नाही याची नीट तपासणी करणे गरजेचे होते. अनेक ठिकाणची गिट्टी निघालेली होती तर, बर्‍याचशा लाकडी फळ्याही कुठे तुटल्या होत्या, तर कुठे कुजलेल्या स्थितीत होत्या. मात्र बनबाला बंद असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर वनविभागाला जाग आली व थातुरमातुर डागडुजी करून वनबाला पुन्हा सुरू करण्यात आली. जेमतेम दोन ते अडीच महिन्यांतच झालेल्या दुरुस्तीने आपला रंग दाखवला आणि वनबाला परत बंद पडली. त्यामुळे वनविभागाच्या आर्थिक उत्पन्नाला खीळ बसण्यासोबतच वनबालाप्रेमींचाही हिरमोड झाला.
आज निरीक्षण करणार : गंगावणे
सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या संबंधित विभागाला ट्रॅकचे निरीक्षण करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र रेल्वेकडून निश्‍चित तारीख मिळाली नाही. असे असले तरी उद्या १४ सप्टेंबरला ट्रॅकचे निरीक्षण करून वनबाला केव्हापासून सुरू करता येईल, याचा निर्णय घेतला जाईल.
क्रॉसिंगजवळील सिमेंटीकरण पूर्ण
वनबालेच्या मार्गात डांबरी रस्ता येतो. या क्रॉसिंगच्या ठिकाणचे डांबर निघून खड्डे पडले होते. त्यामुळेही वनबालासमोर अडथळा निर्माण झाला होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून तेथे सिमेंटीकरण करण्यात आले. त्यामुळे हाही अडथळा दूर झाला असून, वनबाला आता येत्या एक-दोन दिवसांत धावू शकेल, असा विश्‍वासही गंगावणे यांनी बोलून दाखविला. मात्र झालेल्या सिमेंटीकरणाकडे बारकाईने लक्ष दिल्यास झालेले कामही किती दिवस टिकेल याबाबत शंका नक्कीच निर्माण होते.