शिक्षण स्वावलंबन शिकविणारे असावे : नंदा जिचकार

0
52

– शिक्षणसमीक्षा द्वैमासिकाचे विमोचन

नागपूर, १३ सप्टेंबर
महापौर झाल्यापासून रोज अनेक लोक नोकरीबाबत विचारतात. उच्चशिक्षित विद्यार्थिदेखील शिपाई अथवा बस कंडक्टर बनण्यास तयार असतात. आपल्याकडे काय कौशल्य आहेत, असे विचारल्यास ते निरुत्तर होतात. यावरून आजच्या शिक्षणाचा दर्जा कळतो. त्यामुळे शिक्षण केवळ पदवी मिळविण्यापुरते नसावे तर ते स्वावलंबन शिकविणारे असावे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
भारतीय शिक्षण मंडळद्वारे ‘शिक्षणसमीक्षा’ या द्वैमासिकाचे प्रकाशन बुधवार १३ सप्टेंबरला धंतोलीस्थित हिंदू धर्म संस्कृती मंदिरात महापौरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मनपा शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षणतज्ज्ञ व शिक्षणसमीक्षाचे माजी प्रधान संपादक डॉ. बाबासाहेब नंदनपवार, मुख्य संपादक श्री. म. पांडे, भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर प्रामुख्याने उपस्थित होते. आतापर्यंत बाबासाहेब नंदनपवार यांनी या मासिकाचे प्रधान संपादकत्व भूषविले.
डॉ. नंदनपवार यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षण घडविणे हा शिक्षणसमीक्षा द्वैमासिकाचा उद्देश असून, भारतीय शिक्षण मंडळाकडून या उद्देशाची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षणसमीक्षा मासिक महानगरपालिकेतील शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला आणि कल्पक उपक्रम शाळांमध्ये राबविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. यावेळी मुकुल कानिटकर आणि श्री. म. पांडे यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. डॉ. मारोती पवार यांनी प्रास्ताविकातून शिक्षणसमीक्षाची भूमिका मांडली. संचालन अरुंधती कावडकर यांनी केले. यावेळी डॉ. सतपाल सोवळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सत्यवान मेश्राम यांनी भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ कार्यकारिणीची घोषणा केली. शांभवी खानविलकर यांच्या श्‍लोकाने उपक्रमाची सांगता झाली.