राज्यातील प्राणिसंग्रहालये अद्ययावत करणार

0
57

– प्राधिकरणच्या बैठकीत निर्णय
नागपूर, १३ सप्टेंबर
प्राणिसंग्रहालय नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही प्राणिसंग्रहालय बघण्याची उत्कट इच्छा असते. यातून प्राणी व पक्ष्यांची माहिती मिळून मुलांच्या ज्ञानातही भर पडते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्राणिसंग्रहालये अद्ययावत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्य वनसंरक्षक व प्राधिकरणचे सदस्य सचिव एस. एस. भोळे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. यात राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालये तसेच रेस्क्यू सेंटरचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत इन्व्हेंटरी अहवाल, मृत वन्यप्राण्यांचा शवचिकित्सा अहवाल, प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राणी व पक्षी कुठून आले याबाबत माहिती, प्राणिसंग्रहालयांचा मास्टर प्लान, नवीन सुधारणा आराखडा, संशोधन माहिती पुस्तिका व प्रशिक्षणाबाबतची माहिती, परवाना नूतनीकरण व रिक्त पदांची माहिती, प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त प्राणी असल्यास त्यांना पुन्हा निसर्गात पाठविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती, किती पर्यटकांनी भेटी दिल्या व किती महसूल मिळाला आदी विषयांवर याप्रसंगी प्रामुख्याने चर्चा झाली.