पावसाच्या पाण्यामुळे डासांची प्रचंड पैदास

0
82

– रोगांचा प्रादुर्भाव, काळजी घेणे आवश्यक
नागपूर, १३ सप्टेंबर
क्षणात पाऊस व क्षणातच तापणारे कडक उन्ह यामुळे सप्टेंेबर महिन्यातच हिवाळ्याची प्रचिती येत आहे. पावसाचा जोर कधी कमी तर कधी जास्त राहात असल्याने सर्वत्र थंड व आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या वातावरणामुळे घराघरांमध्ये डासांची पैदास वाढत आहे. तापमान कमी असल्याने वातावरणात गारवा व आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. परिणामी आजारही बळावले आहेत.
पावसामुळे घरांच्या छतांवर पाणी साचते. या पाण्यात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियासारख्या जीवघेण्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. शासनाच्या वतीने नियमित जनजागृती अभियान राबविण्यात येत असूनही, स्वच्छतेबाबत नागरिक उदासीन असल्याने डासांची पैदास घटत नाही.
पावसाचे पाणी कुंड्या, फुलदाण्या व कूलरच्या रिकाम्या टाक्यांमध्ये साचतात. यात डासांची पैदास झपाट्याने होते. शिवाय छतावर पडलेले टायर्स, नारळाच्या कवट्या, प्लास्टिकचे डबे, रिकाम्या बॉटल्स, छतावर अंथरलेले प्लास्टिक, रांजण आदी ठिकाणी पावसाचे पाणी जमा होते. यात डास अंडी घालतात. परिणामी दिवसागणिक डासांची पैदास झपाट्याने होत आहे. शहरातील काही ठिकाणी रस्त्यालगत असणारे खड्डे व उद्यानांमधील कारंजांच्या पाण्यातही डासांची पैदास होते. परिणामी डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचा सामना नागपूरकरांना करावा लागत आहे. महानगरपालिकेने ऑगस्ट महिन्यात केलेल्या झोननिहाय तपासणीनुसार घरांच्या छतांवरील कूलरच्या टाक्यांमध्ये डासांची पैदास प्रामुख्याने होत असल्याचे आढळून आले. तसेच सिमेंटच्या टाक्या व मातीची भांडीसुद्धा डासांच्या निर्मितीसाठी कारणीभूत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले.
सध्याच्या परिस्थितीत दीक्षाभूमी रोडवर रस्त्यांलगत पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यात डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. तसेच आठ रस्ता चौकातील तोफखाना स्मारकामध्येही पावसाचे पाणी जागोजागी साचत आहे. या स्मारकाभोवती तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डेंग्यूचा लाळवा आढळला आहे. त्यामुळे या परिसरात आजार पसरण्याची भीती आहे. तसेच इंडियन जिमखाना परिसरात निर्मानाधीन इमारतीत मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे.
डेंग्यूची लक्षणे
तीव्र ताप, सांधेदुखी, स्नायुदुखी, डोळ्यांमागे वेदना होणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, रक्तस्राव आदी डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.