भारताचा शक्तिसंदेश…

0
181

पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या बिळात घुसून मारण्यासाठी केलेल्या लष्करी कारवाईमुळे संपूर्ण जगात भारताचा धाक निर्माण झाला. आता रडणारा आणि सहन करणारा भारत नाही तर प्रत्याघात करणारा, मारा करणारा भारत आहे.
मात्र, या पार्श्‍वभूमीवर भारतात राहून भारताच्या कारवाईवर संशय घेणार्‍यांनी, सोमनाथवर गजनीच्या हल्ल्याच्या वेळी घरातील गजनीच्या मित्रांची आठवण करून दिली. कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी यांच्या प्रख्यात ‘जय सोमनाथ’ या पुस्तकात असे वर्णन आहे की, परमार राजांच्या नेतृत्वात हिंदूंच्या सेनेने गजनीला सोमनाथच्या जवळपासही फिरकू दिले नव्हते. मात्र, एक अतिमहत्त्वाकांक्षी, आत्मकेंद्रित पुजारी आपल्या भविष्य आणि समृद्धीसाठी गजनीला मंदिरात गुप्त मार्गाने घेऊन आला आणि संपूर्ण इतिहासच बदलला. गजनीने त्याचाही वध केला. मात्र, हिंदू पराभूत झाले.
आज जे भारतात जन्म घेऊनही पाकिस्तानवर अधिक विश्‍वास ठेवून आपले सरकार आणि लष्करावर अविश्‍वास व संशय व्यक्त करीत आहेत, ते गजनीयुगातील महत्त्वाकांक्षी लोकांप्रमाणेच आहेत. जो मुख्यमंत्री अंधविश्‍वासातून निपजलेल्या मदर टेरेसांच्या संत झाल्याच्या घोषणेवर विश्‍वास ठेवून नि:संकोच श्रद्धावान होऊन व्हॅटिकनला गेला, त्याच भारतीय मुख्यमंत्र्याच्या लष्करी कारवाईबाबतच्या संशययुक्त प्रश्‍नाचा पाकिस्तानला आधार मिळाला आणि आमच्या देशाचा रक्तबंधू पाकिस्तानचा हिरो बनला.
यावेळी केवळ भारताला जागतिक स्तरावर जबरदस्त पाठिंबा मिळाला असे नसून, ‘सार्क’ देशांनीही अभूतपूर्व एकी दाखवून भारताला साथ दिली आणि ‘सार्क’ बैठकीवर बहिष्कार टाकला. मात्र, अनेक वर्तमानपत्रांनी, प्रामुख्याने इंग्रजी वर्तमानपत्रांच्या तथाकथित संपादक आणि स्तंभलेखकांनी असे लेख छापले की, जणू भारतच जगात एकटा पडला आहे आणि पाकिस्तानला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. हे लेख भारतीय पत्रकार, स्तंभलेखकांनी लिहिले आणि पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी ते उद्धृत करून आनंद साजरा केला. जे कधीही काश्मिरी हिंदूंच्या दु:खात सहभागी झाले नाहीत ते, पाकिस्तानी मुल्ला-मौलवींच्या सुरात सूर मिळवत होते, यापेक्षा आणखी मोठी विंडबना दुसरी कुठली असू शकेल?
ज्यांनी दहा वर्षे सातत्याने, दररोज गुजरातेत नरेंद्र मोदींचा एखाद्या पिशाचाप्रमाणे पाठलाग केला, खोट्यानाट्या कथा रचल्या, निवडणुका होईपर्यंत द्वेषमूलक भावनेने मुखपृष्ठावर त्यांची प्रतिमा झळकवली, ज्यांनी अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्यास विरोध केला, काश्मिरात कलम ३७० संपुष्टात आणण्यास तसेच गोरक्षेला विरोध केला, ज्यांनी देशातील प्रत्येक शैक्षणिक व बौद्धिक संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या, ज्यांनी आपल्या नियंत्रणातील वर्तमानपत्रांना गुलाम व सायबेरिया (रशियन व कम्युनिस्टधार्जिणे) बनवून टाकले, ज्यांनी फक्त असहिष्णुता, घृणा, व द्वेष बाळगला त्यांना जगात मोदींच्या नेतृत्वाखालील भारताचे वाढते यश पाहवले नाही, मोदींच्या प्रचंड वाढत्या प्रभावाने संतापून पाकिस्तानच्या सुरात ते आपला सूर मिळवत आहेत.
अर्थात हे काही नवीन नाही. नवीन गोष्ट ही आहे की, भारत आक्रमक बनला आहे. आता भारताचा प्रत्येक आघात पाकिस्तानला दुर्बल करेल. ज्यांना आमच्या सैनिकांची किंमत नाही, ज्यांना आमच्या जवानांशी काहीही देणेघेणे नाही असेच लोक पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात काम करण्याचे समर्थन करीत आहेत. दहशतवादावर गप्प बसणार्‍या आणि भारताला पैसे कमविण्याचे माध्यम समजणार्‍या पाकिस्तानी कलावंतांविषयी ज्यांना आपुलकी वाटते, अशांसाठी आमच्या सैनिकांनी सीमेवर का म्हणून लढावे? पाकी कलावंतांचे समर्थन करणार्‍या भारतीय चित्रपट अभिनेत्यांचे चित्रपट चित्रपटगृहातही झळकायला नकोत, अशी राष्ट्रभक्त नागरिकांची प्रखर भावना आहे. पाकिस्तानात विविध संघर्षात मारले जाणार्‍या मुसलमानांची संख्या जगात सर्वाधिक आहे. शिया-सुनी भांडणात मशिदीत बॉम्बस्फोट होत आहेत. रस्त्यातच बसमधून शियांना उतरवून ठार मारले जाते. स्त्रियांवर व्यभिचाराचा आरोप ठेवून, बापाला आपल्या मुलीला दगड मारून ठार मारण्याचे फतवे जारी केले जातात. पाकिस्तानने आपल्या भूमीवर आजपर्यंत एकही युद्ध जिंकलेले नाही. ना अफगाणिस्तानात ते तालिबान्यांना लढत देऊ शकले, ना आपल्याच देशातील बलुची, सिंधी आणि पश्तुनी बंडखोरांवर नियंत्रण मिळवू शकले. १९७१ मध्ये आपले बेल्ट आणि शस्त्रास्त्रे खाली ठेवून भारतीय सैनिकांसमोर त्यांनी शरणागती पत्करली. १९६५ मध्ये रशियाच्या पाठिंब्याने अयूब खानने शास्त्रीजींना धोका दिला, चोरांप्रमाणे वेष बदलवून कारगिलमध्ये घुसले खरे, पण भारतीय जवानांच्या पराक्रमामुळे त्यांना पळून जावे लागले. त्यामुळेच भारताला रक्तरंजित करण्यासाठी पाकिस्तान युद्ध नाही तर दहशतवादाचा आधार घेत आहे!
भारताच्या आक्रमक लष्करी कारवाईने आता पाकिस्तानला दहशतवादी तंत्र वापरणे युद्धाप्रमाणेच महागात व प्रचंड नुकसानदायक ठरणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सणसणीत प्रत्युत्तर दिल्यानंतर लगेच आपले लक्ष विकास आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयावर केंद्रित केले. ही अतिशय विरळी अशी वीतरागी भावना आहे. पाकिस्तान एक डोकेदुखी आहे. मात्र, आज भारत लष्करी दृष्टीने सशक्त आणि आर्थिक दृष्टीने पाकिस्तानच्या तुलनेत कित्येक पटींनी पुढे आहे. कौशल्यविकास, दारिद्र्यनिर्मूलन, नवीन रोजगारांच्या कोट्यवधी संधी, जागतिक व्यापार करणार्‍या देशांच्या यादीत सातत्याने वरचे स्थान मिळविणे, रशियासमवेत आधीपेक्षा चांगले संबंध, फ्रान्सशी अणुसहकार्य व राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानांची खरेदी, खाडीतील मुस्लिम देशांशी प्रेमाचे व विश्‍वासाचे संबंध, हिंद महासागर क्षेत्रात वाढती प्रभावशाली भूमिका… ही अशी पावले आहेत- त्या भारताची उभारणी करेल, जो समृद्ध आणि सुरक्षित असेल. त्याकडे लक्ष देण्याची आता आवश्यकता आहे, ज्याला नरेंद्र मोदींनी ‘युद्धाकडून बुद्धा’कडे वळणे असे म्हटले होते.
आर्थिक विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात सर्वोच्च स्तर प्राप्त करणे यातच भारताला स्वारस्य आहे. पाकिस्तान डोकेदुखी आहेच, पण जगातील सर्वश्रेष्ठ प्रथम १०० विद्यापीठांत एकही भारतीय विद्यापीठ नसणे आणि चीनची पाच विद्यापीठे पहिल्या ५० मध्ये असणे, ही भारताच्या दृष्टीने सर्वाधिक चिंताजनक बाब आहे. जगात सर्वाधिक गरीब आणि निवारा नसलेले नागरिक भारतात का आहेत? जगातील सर्वश्रेष्ठ आरोग्यसेवा आणि कृषिविकास भारतात नाही तर मग आणखी कुठे होणार? भ्रष्टाचारावर अंकुश लावणारे आता भारताला काळ्या धनाबरोबरच काळ्या मनापासून मुक्त करण्याची मोहीमही राबवत आहेत. १९६२ मध्ये ज्यांनी चीनला साथ दिली आणि इतक्यात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यामुळे ज्यांची सर्वत्र नाचक्की होऊन न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागले ते डावे कम्युनिस्ट आणि सेक्युलॅरिस्ट भारत शक्तिसंवर्धनाच्या या पर्वावर अपशकुन करणारेच आहेत.
दिल्लीत पंडित दीनदयाल उपाध्याय समग्र साहित्य खंडांचे प्रकाशन करणारे आणि लखनौत रावणावर शरसंधान करणारे नरेंद्र मोदी हाच आत्मविश्‍वासपूर्ण संदेश देतील की, हा भारत सशक्त भारत आहे. हा तो आधीचा लाचार आणि असहाय भारत नाही. हा शक्तिमंत्र विजयादशमीला भारताचा संदेश आहे.

तरुण विजय