मन अनाम करण्यासाठी…

0
180

गावोगावी नेहमी आध्यात्मिक क्षेत्रात अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते. कधी त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात. अनेक सप्ताहांच्या बातम्याही येत नाहीत. माझ्या मनात विचार यायचा की या हरिनाम सप्ताहांचे प्रयोजन काय? अखंड नामस्मरण कशासाठी? जडवादी अशा पाश्‍चात्त्य ज्ञानाच्या प्रभावाखाली असलेली मंडळी याला ‘मॅन अवर वेस्ट’ असे म्हणून हिणवतात. थोडा विचार केला तर असे लक्षात येते की हीच जडवादी मंडळी नंतर मानसोपचारतज्ज्ञांकडे जातात, मन एकाग्र होत नाही अशी तक्रार करतात. झोपेत विचित्र विचार येतात, विचित्र स्वप्नं पडतात अशा व्याधी झाल्याचे सांगतात. भारतातील मानसोपचारतज्ज्ञ अशा लोकांना ‘मेडिटेशन’ म्हणजे ध्यान करायला सांगतात.
ध्यान करताना जर नवोदितांना सांगितले की ‘मन एकाग्र करा’ तर ते सहजशक्य होत नाही. डोळे मिटले की डोळ्यासमोर जगातल्या सगळ्या गोष्टी उभ्या राहातात. विशेषतः जर सूचना केली असेल की, ‘मन एकाग्र करताना अमुक गोष्ट मनात येता कामा नये.’ तर हटकून डोळे झाकले की टाळण्याची ती गोष्टच दिसू लागते. तिची शंभर रूपे, शंभर प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागतात. यात मनाचा काही दोष नाही. चिंतन, मनन हे मनाचे लक्षणच आहे. तेच मनाचे अस्तित्व आहे. हे चिंतन आणि मनन शब्दांच्या आधारे चाललेले असते. कोणतीही भाषा वापरण्याची प्रक्रिया मनात त्या भाषेत विचार करण्यापासून सुरू होते. ज्या भाषेत बोलायचे त्या भाषेत आधी विचार करायला शिका, असे सांगितले जाते. मन आणि विषय यांच्यातील माध्यम बनतात शब्द! त्यामुळे मनाला एकाग्र करण्यासाठी, निर्विषय, निर्विकार बनविण्यासाठी मन हे शब्दांपलीकडे घेऊन जावे लागते.
आता हे कसे करायचे? जसे काट्यानेच काटा काढला जातो, हिर्‍यानेच हिरा कापला जातो, तसे मनाला अनाम करण्यासाठी नामाचेच साहाय्य घ्यायचे. नामस्मरण! म्हणजे असंख्य आणि अमर्याद अशा शब्दसागरातून सगळे मन आधी एका नामावर केंद्रित करायचे. एक जप करताना त्यावरच मन केंद्रित होते. नंतर योग्य वेळी त्या एका नामालाही मनातून बाजूला काढून मन अनाम करून टाकायचे. अशी ती मन निर्विकार आणि निःशब्द करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात जप करण्यावर भर दिला जातो. मंत्र या शब्दाची व्याख्याच ‘मननात त्रायते इति मंत्रः’ अशी केलेली आहे.
मंत्र हा नेहमी शब्दांचा असतो. शब्दात अक्षरे असतात. त्यांचा संबंध ध्वनीशी असतो. ध्वनीचा प्रभाव खूप असतो. आपले तन, मन आणि चेतना यांच्यावर ध्वनीचा प्रभाव असतो. अंतर्मनावर तर जास्तच प्रभाव असतो. मग या जपासाठी कोणताही शब्द किंवा कोणतेही अक्षर चालते. संस्कृतमध्ये शुक्राचार्यांचे एक सुभाषितच आहे.
अमंत्रं अक्षरं नास्ति, नास्ति मूलं अनौषधं|
अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकः तत्र दुर्लभ: ॥
म्हणजे एकही अक्षर असे नाही की जे मंत्र नाही, एकाही झाडाची मुळी अशी नाही की औषध नाही आणि एकही व्यक्ती अयोग्य आहे असे नाही, फक्त या सर्वांचा उपयोग करणारा योजक मात्र दुर्लभ असतो. व्यवस्थापनशास्त्र या एका सूत्रावरच आधारलेले आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणताही एक शब्द मनन करत गेले की त्यात मंत्राचे सामर्थ्य निर्माण होते. मन एकाग्र करणे हेच सामर्थ्य आहे. जर मन एकाग्र केले तर अणुशक्तीपेक्षा जास्त सामर्थ्य मनामध्ये आहे. जीवनात योजक बनण्यासाठी मनाची मशागत म्हणजे जप आहे. चर्चा केल्याप्रमाणे शब्दांचा संबंध ध्वनीशी आहे. मनात जपामुळे ध्वनींची एक साखळी तयार होते. जसे भजनामध्ये टाळ मृदंगांच्या ध्वनिलहरी वातावरणात आणि मनात एका मंगलमयी वातावरणाची पार्श्‍वभूमी तयार करून मनातील इतर विचारांची, स्वार्थाची, व्यक्तिगत सुखदुःखांच्या कल्पनांची गर्दी कमी करतात, हटवून टाकतात. तीच प्रक्रिया जप केल्यानंतर मनात होत राहाते. प्रत्यक्ष टाळ मृदंग नसले तरी टाळ-मृदंग मनात वाजू लागतात. मग ती अवस्था खर्‍या अर्थाने नामसंकीर्तनाची निर्माण होते. टाळ-मृदंगाचा गजर करण्याची गरज राहात नाही. ते वाजत राहिले तरी त्यांचे अस्तित्व मनाच्या दृष्टीने दखलपात्र राहात नाही. हळूहळू जप करत करत अशी अवस्था येते की या जपाच्या मंत्रातील ध्वनींचेही अस्तित्व विलीन होत जाते. मनाची अवस्था निर्विकार, निःशब्द, एकाग्र होण्यापर्यंत जाते. ध्वनी, शब्द, मन यांचे परस्परात विलीनीकरण करण्याची ही योजकता आपण जर साधली तर ज्ञानदेवांनी वर्णन केलेली आनंदाचे डोही आनंद तरंग, ही अवस्था प्राप्त होते.