भारत व रशिया यांचे नवे मैत्रीपर्व

0
332

भारत व रशिया यांची जुनी मैत्री आहे. अनेक वेळा या मैत्रीचा जगाला प्रत्यय आला आहे. गोव्यात सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने या जुन्या मैत्रीला नवी झळाळी आता प्राप्त झाली. रशियाने भारताला शस्त्ररसद पुरवून मित्रत्वाचे दर्शन घडविले आहे. मैत्रीचे हे नवे पर्व उभय देशांना हितकारक झाले आहे.
अत्याधुनिक एस-४०० ही क्षेपणास्त्रप्रणाली महत्त्वाची
या परिषदेपूर्वी मोदी व पुतीन यांनी ज्या सोळा करारांवर स्वाक्षर्‍या केल्या ते सारे करार महत्त्वपूर्ण आहेत. हवेतून आकाशातील क्षेपणास्त्रे आणि विमानांचा अचूक वेध घेणारी अत्याधुनिक एस-४०० ही क्षेपणास्त्रप्रणाली, कामोव्ह हे २० हजार उंचीपर्यंत उडणारे हेलिकॉप्टर्स आणि नाविक दलासाठी चार शक्तिशाली फ्रिगेट्‌स खरेदी करण्याच्या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यापैकी एस-४०० ही प्रणाली भारताच्या आकाश संरक्षणप्रणालीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ४०० कि. मी. वर असलेल्या कोणत्याही लक्ष्याचा ३६ दिशांनी वेध घेणारी ही प्रणाली आहे.
कामोव्ह या अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचा वापर कारगिल आणि सियाचीन या अत्यंत उंच भागात कार्यरत आपल्या जवानांना रसद पोहोचविण्यासाठी होणार आहे. भारताजवळ असलेल्या चिता अणि चेतक हेलिकॉप्टर्सची जागा कामोव्ह घेतील. सध्या भारताजवळ रशियानिर्मित ४०० हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे. त्यात येत्या काही वर्षांत आणखी २०० कामोव्ह हेलिकॉप्टर्सची भर पडणार आहे. यापैकी ४० रशियातून येणार आहेत. तर उर्वरित १६० भारतात रशियाच्या मदतीने बांधली जाणार आहेत. ही हेलिकॉप्टर युद्ध व नैसर्गिक आपत्तीवेळी महत्त्वपूर्ण सिद्ध झाली आहेत. सुमारे साडेतीन हजार किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या हेलिकॅप्टरमध्ये आहे.
करार केल्यानंतर सोबत अर्धेअधिक उत्पादन भारतात व्हावे, अशी भारताने अट घातली. ती रशियाने मान्य केली आहे. भारत एरॉनॉटिक्स लि. व रशियाची कंपनी यांच्यात संयुक्त करारामुळे मेक इन इंडियाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भारतातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांना संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण विकसित केलेल्या तेजस विमानावर सातत्याने संशोधन होत असून, ते अधिक शक्तिशाली बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियनशी केलेली मैत्री हा भारताचे आर्थिक, राजकीय, लष्करी हित साधण्याचा प्रयत्न होता. मोदींचे सरकार आल्यानंतर अमेरिकेशी होणारी जवळीक पाकिस्तानसह चीन व रशियाला अडचणीची वाटू लागली होती. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेली विनंती अमान्य करून रशियाने पाकिस्तानसोबत संयुक्त लष्करी सराव केला होता. आगामी काळात अशा घटना टाळल्या जाव्यात, अशी अपेक्षा मोदी यांनी पुतीन यांच्यासमवेतच्या चर्चेत व्यक्त केलेली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद व आर्थिक सहकार्य या मुद्यांवर भर देताना रशियाची मैत्री महत्त्वाची आहे.
आणखी आठ अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव
दोन्ही नेत्यांनी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील एका युनिटचे लोकार्पणही केले. हा अणुऊर्जा प्रकल्प भारताच्या दृष्टीने अत्यंंत महत्त्वाचा असून तो आता मार्गी लागण्याच्या दिशेने पावले पडली आहेत, हे निश्‍चित. रशियाच्या सहकार्याने देशात आणखी आठ अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे मोदी यांनी जाहीर करतानाच अणुऊर्जा संदर्भातील व्यापक सहकार्याचे संकेतही दिले. हेही महत्त्वाचे आहे. भारताने अमेरिकेबरोबर अणुकरार केल्यानंतर त्याची चर्चाच जास्त झाली; परंतु प्रत्यक्ष अणुऊर्जा प्रकल्प साकार होणे लांबतच गेले. आण्विक पुरवठादार गटाचा भारत सदस्य नसल्याने अणुतंत्रज्ञान देण्यास विविध देश टाळाटाळ करीत होते. भारत त्या गटाचा सदस्य नसला तरी आता ते आण्विक एकाकीपणाचे चित्र बदलत आहे.
ऊर्जा, वीज, जहाजबांधणी, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रांत करार
रशियाला त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी बाजारपेठ हवी आहे ती गरज भारत पुरवू शकतो. त्या अनुषंगाने भारत-रशियामध्ये संरक्षण, ऊर्जा, वीज, जहाजबांधणी, अवकाश तंत्रज्ञान यांसह क्षेत्रांत झालेले करार पाकिस्तानला चपराक आहे. भारताने उरी हल्ल्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक केले त्याचे रशियाने समर्थन केले होते व आता रसदही पुरवली आहे. उभय देशात आगामी काळात मैत्रीच्या नवनव्या पायर्‍या पादाक्रांत होणार हे स्पष्ट आहे. ते केवळ लष्करी करार नाहीत. उभय देशातील या करारामुळे व्यापार, उद्योग, गुंतवणूक, अणुऊर्जा, स्मार्ट सिटी, रेल्वेसह, संरक्षण या विषयांना चालना मिळणार आहे. भारताला पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून धोका होऊ शकतो. चीन शस्त्रसज्ज आहे. या पार्श्‍वभूमीवर जगात सर्व आघाड्यांवर सरसावलेला भारत शस्त्रसज्ज असणे काळाची गरज बनली आहे.
या करारामुळे उभय राष्ट्रांची मैत्री जशी उजळून निघाली आहे तशी उभय राष्ट्रातील सहकार्य आणि व्यापार, गुंतवणुकीला चालना मिळणे यासाठीही चांगले वातावरण तयार झाले आहे. भारत आणि रशिया यांच्यात जुनी मैत्री असली तरी या दोन देशांदरम्यान व्यापारी संबंध तितकेसे वृद्धिंगत झालेले नाहीत. आगामी काळात व्यापाराच्या क्षेत्रात भरीव काम करण्याचे या दोन देशांनी ब्रिक्स परिषदेदरम्यान ठरविले आहे.
तेल आणि वायू क्षेत्रात दोन्ही देशांत करार
संरक्षण क्षेत्राच्या बाहेर जाऊन व्यापक आर्थिक सहकार्याची दिशाही या बैठकीत निश्‍चित झाली, याचीही नोंद घ्यायला हवी. एस्सार समूहाच्या तेल उत्पादन केंद्रात रशियन कंपनी करणार असलेली ७८ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक एक ठळक पाऊल म्हणावे लागेल. रशियाच्या रॉसनेफ्ट या सरकारी मालकीच्या कंपनीने एस्सार ऑईल ही भारतीय कंपनी खरेदी केली. थेट परकीय गुंतवणुकीचा हा विक्रमी व्यवहार १३ अब्ज डॉलरला पार पडला.
अणुऊर्जेसह तेल आणि वायू क्षेत्रात दोन्ही देशांत अनेक करार करण्यात आले आहेत. चीनपेक्षा रशियाला जास्त महत्त्व देण्याची भारताची भूमिका भविष्याच्या दृष्टीने भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. सामरिकदृष्ट्या रशियाची ताकद गेल्या काही वर्षांत वाढत असल्याचे दिसून आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या बाजारपेठेत त्यामुळे भारताची मदत घेण्यास रशिया उत्सुक आहे.
उभय देशात पायाभूत सुविधा प्रकल्पातही काम सुरू होणार आहे. त्यासाठी एक अब्ज डॉलरचा गुंतवणूक निधी उभारला जाणार आहे. दोन्ही देश वार्षिक लष्करी औद्योगिक परिषद भरवणार आहेत. रशिया, भारत, चीन व पाकिस्तान यांना लष्करी विमाने, हत्यारे विकत आहे. हे पण लक्षात घेतले पाहिजे. आणि मैत्रीचा हात पक्का करत असताना देशाचे सामर्थ्य व स्वयंपूर्णता वाढवली पाहिजे.
चीन-पाकिस्तानला शह देताना रशियाची मैत्री जरुरी
गोवा मुक्ती, बांगलादेशचा जन्म किंवा काश्मीर अशा प्रत्येक महत्त्वाच्या विषयांत सुरक्षा समितीत रशियाने नकाराधिकाराचा वापर करून भारताच्या भूमिकेची पाठराखण केलेली होती. रशियाने अलीकडेच पाकिस्तानबरोबर संयुक्त लष्करी कवायती केल्याने भारताबरोबरची पारंपरिक मैत्री इतिहासजमा झाली की काय, अशी भीती व्यक्त होत होती; परंतु ती निरर्थक असल्याचे स्पष्ट झाले. चीन-पाकिस्तानला राजकीय व लष्करी शह देताना रशियाची मदत घेणे हे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
रशियालाही दहशतवादाचे चटके बसले आहेत. मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला. सीरियात रशियाचे अमेरिकेबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत. त्या देशाची आर्थिक वाढ मंदावलेली आहे. अशा वेळी रशियालाही भारताची गरज आहे. रशियाने सांगितले पाकशी आपले संबंध प्रगतिपथावर नाहीत त्यांनी व आम्ही पाकिस्तानसोबत केलेल्या संयुक्त लष्करी कवायती दहशतवादाविरोधी होत्या. आपल्या शत्रुराष्ट्राशी रशियाने हातमिळवणी करू नये, या धारणेतूनच ही चिंता वाढली होती. पण त्यातून मोदी यांनी मार्ग काढलाच. रशिया आपला ६५ वर्षांपासूनचा मित्र आहे. म्हणून दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र चांगला असे सूचक उद्गार मोदींनी काढले.
उज्ज्वल भविष्यासाठी रशिया-भारत एकत्र
या दरम्यान, भारताने सीमेपलीकडून होत असलेल्या दहशतवादाच्या मुद्यावर केलेल्या कृतीला समर्थन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी रशियाची प्रशंसा केली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या अनुषंगाने मोदी यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण असेच आहे. मोदी यांनी सांगितले की, ‘दहशतवाद आणि त्याला पाठिंबा’ याबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचा आम्ही दोघांनीही पुनरुच्चार केला आहे. त्याला पुतीन यांनी साथ देत, दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या बाबतीत दोन्ही देशांचे घनिष्ट सहकार्य असल्याचे स्पष्ट केले. ‘उज्ज्वल भविष्यासाठी रशिया व भारत हे दोन मित्र एकत्र आले आहेत.’
एकविसाव्या शतकातील आमची समान उद्दिष्टे गाठण्यासाठी आम्ही भागीदारीचे प्रारूप तयार करत आहोत. आमच्या घनिष्ट मैत्रीने विविध क्षेत्रांतील भागीदारीला स्पष्ट दिशा मिळाली आहे. प्रादेशिक व जागतिक स्तरावर भरारी घेण्यास हे मैत्रीपूर्ण संबंध ऊर्जेचे स्रोत बनले आहेत, अशा शब्दात पुतीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि जुन्या मित्राला आपली भक्कम साथ कायम असल्याचा विश्‍वासही दिला.
चर्चेनंतर मोदी अणि पुतीन यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारत- रशिया यांच्यातील करारांची माहिती देण्यात आली. चर्चेने भारत रशियामधील राजनैतिक संबंध आणखी दृढ झाले आहेत. संरक्षण व आर्थिक क्षेत्रातील संबंध आगामी वर्षांत आणखी घट्ट होण्यासाठी या चर्चेने पाया घातला आहे, असे मोदी म्हणाले. वार्षिक संरक्षण औद्योगिक परिषदेसाठीही दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे. थोडक्यात या जुन्या मित्रांनी एकमेकांचे हात हाती घेऊन मैत्रीचे नवे पर्व सुरू केले आहे. रशियाची पाकिस्तानशी मैत्री व चीनचे पाकिस्तानधार्जिणे धोरण यातून मार्ग काढायचा म्हणजे रशियाशी पूर्वीचे संबंध अधिक दृढ करणे हाच मुत्सद्देगिरीचा मार्ग आहे. उभय देशांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेच. पण, भारताकडे शत्रुत्वाच्या दुष्ट भावनेने बघणार्‍या सर्वांनाच यामुळे चाप लागणार आहे. आता अधिक सज्जता, शस्त्रसज्जता आणि मैत्री यामुळे देशाची प्रतिमा उंचावणार यात शंका नाही. पाकिस्तानचे मित्र चीन, भारताशी आर्थिक सहकार्य करताना आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवतात.

ब्रिगेडियर हेमंत महाजन