मागोवा रेशीम महामार्गाचा

0
208

इतक्या प्राचीन काळी व्यापार किती सर्वव्यापी होता यावर आज विश्‍वासही बसणार नाही. दमास्कस, बगदाद आणि समरकंदचा कागद प्रसिद्ध होता तर इजिप्तची चांदी. लेबनॉनच्या सीडर नावाच्या लाकडाला जगभर मागणी होती, तर बॅक्ट्रियाचे सोनेही काही कमी नव्हते. सोगदियानाच्या नीलमण्याची जशी सर्वदूर ख्याती होती तशी भारताच्या हस्तीदंताचीही होती. अफगाणी घोड्यांना तर कोठे तोडच नव्हती आणि या सार्‍यांवर वरताण समजले जात असे ते चीनचे रेशमी, तलम कापड. रेशमाला इतके महत्त्व होते की त्याचे कापड किंवा वेळप्रसंगी सूतदेखील पैशांऐवजी वापरले जात असे.

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा काळ. फ्रांसमध्ये गाळले गेलेले एक नाणे एक तरुण शिपाई इंग्लंडमध्ये वापरतो. इंग्लंडमध्ये कर वसुली करणारा रोमन अधिकारी ते नाणे रोमला पाठवतो. फिरत-फिरत हे नाणे एका रोमन व्यापार्‍याच्या हाती पडते. हा व्यापारी युरोपहून समुद्रमार्गे गुजरातच्या भरुचमध्ये येतो आणि तेथे माल खरेदी करताना या नाण्याचा वापर करतो. पुढे हे नाणे सरकारी खजिन्यात जमा होते. तेथील राजाला त्याची जडणघडण आवडते आणि आपल्या राज्यासाठी तसेच नाणे गाळण्याचा तो आदेश देतो. ज्या कारागिराकडे ही कामगिरी सोपविली जाते तो भारतीयच काय, रोमन किंवा पारशी किंवा चिनीदेखील असू शकतो. कारण त्या काळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र असलेल्या बाजारपेठांच्या शहरांमध्ये परदेशी लोकांनी मोठ्या संख्येने वास्तव्य करणे ही साधारण बाब होती.
आज दळणवळणाची अतिजलद साधने उपलब्ध असूनही स्थलांतरण किंवा परदेश वार्‍या म्हणाव्या तितक्या सोप्या नाहीत. तेव्हा हजारो वर्षांपूर्वीच्या अगदी प्राथमिक व अप्रगत साधनांच्या मदतीने इतकी उलाढाल शक्य होत असेल यावर सहजासहजी आपला विश्‍वास बसत नाही. मात्र ‘अ न्यू हिस्टरी ऑफ दी वर्ल्ड’ या पुस्तकात पीटर फ्रँकोपॅन या लेखक-संशोधकाने हे उदाहरण दिले आहे आणि त्याद्वारे प्राचीन काळीसुद्धा वेगवेगळ्या देशांचे आणि संस्कृतींचे संबंध किती समृद्ध होते याचे विस्तृत विवेचन केले आहे. नाण्याचे उदाहरण तसे काल्पनिक असले तरी ते त्यावेळच्या व्यवहारांचे प्रातिनिधिक म्हणून पूर्णपणे सत्यावर आधारित आहे असा फ्रँकोपॅनचा दावा आहे.
या पुस्तकाच्या नावाचीही गंमतच आहे. या पुस्तकाला ‘अ न्यू हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ (जगाचा नवीन इतिहास) असे नाव का दिले हे सांगताना फ्रँकोपॅन म्हणतात की पश्‍चिमेकडे साधारणत: ग्रीक संस्कृतीला आद्य संस्कृती मानले जाते. पाश्‍चात्त्य संशोधकांचा असा अहंमन्य विश्‍वास आहे की ग्रीक संस्कृतीमधून रोमन संस्कृती जन्माला आली, तिच्यातून ख्रिस्ती स्वरूपाच्या युरोपचा उदय झाला, त्यातूनच नवनिर्माण (ीशपरळीीरपलश) आणि जाणीव जागृती (शपश्रळसहींाशपीं) या चळवळी जन्मास आल्या आणि त्यांनी आधुनिक लोकशाहीला जन्म दिला. या आधुनिक लोकशाहीला औद्योगिक क्रांतीची जोड मिळाली तेव्हा त्यातून अमेरिकेचा उदय झाला. यातच संपूर्ण जगाचा इतिहास सामावलेला आहे असा उर्मट सूर पाश्‍चात्त्य संशोधकांच्या लिखाणात वारंवार सापडतो असे फ्रँकोपॅन सांगतात.
फ्रँकोपॅन या मताशी सहमत नाहीत, कारण त्यांच्या वडिलांनी लहानपणी त्यांना भेट दिलेला एक जगाचा नकाशा त्यांना आधीपासूनच अस्वस्थ करून जाई. या नकाशात इराणच्या उत्तरेला असलेला कॅस्पियन समुद्र मध्यभागी, तर आजूबाजूच्या महत्त्वाच्या प्रदेशात भारत, चीन आणि पूर्वी युरोप यांचा समावेश दिसतो. इंग्लंड दूर कुठेतरी पश्‍चिमेकडे दिसते आणि अमेरिकेचा तर त्यात पत्ताच नाही. अरबी भूगोल शास्त्रज्ञांनी हा नकाशा काढलेला असून इंग्लंड-अमेरिकेसारखे आताचे बलाढ्य देश त्यांच्या दृष्टीने कसे अगदी नगण्य होते याचा त्यावरून प्रत्यय येतो.
एकेकाळी आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जगात आघाडीवर असलेले देश आज जरी यादवी युद्धाच्या गर्तेत सापडले असले तरी त्यांचा दैदीप्यमान इतिहास नाकारता येणार नाही. आज वैचारिक मागासलेपणाचा ठपका लागलेले आखाती देश सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी जगाला दिशा दाखविणार्‍या दीपस्तंभांसारखे होते. पण पाश्‍चात्त्य ते सगळे श्रेष्ठ या संकुचित विचारसरणीला हे गैरसोयीचे असल्यामुळे तो इतिहास दडपून ठेवला जातो असा फ्रँकोपॅन यांचा आरोप आहे. त्यामुळे जगाचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक समतोल राखून लिहावा लागणार असे त्यांचे मत झाले आणि म्हणून त्यांनी साधारणत: भूमध्य सागरापासून चीनपर्यंतच्या भागातील ऐतिहासिक घडामोडींचा आढावा घेताना आपल्या पुस्तकाचे नाव ‘द सिल्क रोड्‌स – अ न्यू हिस्टरी ऑफ द वर्ल्ड’ (रेशीम महामार्ग – जगाचा नवीन इतिहास) असे ठेवले. या प्रदेशातील रस्त्यांवरून सतत आणि फार मोठ्या प्रमाणात होणार्‍या रेशमाच्या व्यापारामुळे त्यांना प्राचीन काळापासून ‘सिल्क रोड्‌स’ म्हणूनच ओळखले जाते. हाच संदर्भ घेऊन फ्रँकोपॅन यांनी रेशमी महामार्गाचा उल्लेख पुस्तकाच्या नावात केला आहे.
आज ढोबळ मानाने पूर्वेकडे बौद्ध व हिंदू, आखाती प्रदेशात इस्लाम तर युरोप-अमेरिकेत ख्रिस्ती धर्माचा प्रभाव दिसतो. मात्र, दीड हजार वर्षांपूर्वीचे चित्र फारच वेगळे होते. बौद्ध धर्माचा प्रसार पार अफगाणिस्तानातील हेरातपर्यंत झाला होता, तर इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांमध्ये मध्यपूर्व आशियात तसेच युरोपच्या काही भागांत वर्चस्वासाठी युद्ध सुरू होते. गंमत म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ हे दाखविताना दोन्ही धर्म एकमेकांच्या धर्मग्रंथांमधील आणि कथा-पुराणांमधील किस्से-कहाण्या उचलून त्या आमच्याच म्हणून दाखविण्याचा प्रयत्न करीत. उदाहरणार्थ दोन्ही धर्मात जीझस (इसा) याचा जन्म मेरी (मरियम)च्या पोटी दैवी चमत्कारामुळे झाला असा उल्लेख आहे. सेटन (सैतान) ही संकल्पना दोन्ही धर्मात आहे. जगाचा विध्वंस (कयामत) अटळ आहे, पण त्याआधी ईश्‍वर (किंवा अल्लाह) न्यायाधीशाच्या भूमिकेतून प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल, असे दोन्ही धर्म सांगतात. ज्या दिवशी हा न्याय होईल त्या शेवटच्या दिवसाला ख्रिस्ती धर्मात ‘डे ऑफ जजमेंट’ तर इस्लाममध्ये ‘यौम-अद-दिन’ म्हटले आहे. दोन्ही धर्मात एकसारखी नावे तर असंख्य आहेत. अब्राहम-इब्राहिम, डेविड-दाऊद, सोलोमन-सुलेमान, गेब्रियल-जिब्राल, ऍडम-आदम, आयझॅक-इशाक, जोसेफ-युसुफ, ही त्यातलीच काही उदाहरणे. थोडक्यात म्हणजे फ्रँकोपॅनच्या मते या दोन्ही धर्मांच्या अनुयायांचा इतका घट्ट संबंध होता की एखादी कहाणी मूळ बायबलमधली की मूळ कुराणातली हे अनेकदा सांगता येत नाही.
खरे सांगायचे तर कुठल्याही धर्म नावाच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार होण्यास आणि तिला विशाल स्वरूप प्राप्त होण्यास अनेक राजकीय योगायोग जुळून यावे लागतात असे फ्रँकोपॅनचे मत आहे. आज करोडो अनुयायी असलेल्या ख्रिस्ती धर्माचीही तीच कथा आहे. पुढे जाऊन जगावर त्याचा इतका प्रचंड प्रभाव पडेल असे तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. येशूच्या निधनाच्या सुमारे दोनशे वर्षांनंतर कॉन्स्टन्टाईन नावाच्या एका अतिशय महत्त्वाकांक्षी राजाच्या आश्रयाने या धर्माची घोडदौड सुरू झाली. आपल्या प्रजेला कुठल्या तरी सूत्रात एकत्र बांधण्याची गरज वाटली, तेव्हा त्याने आधी स्वत: हा धर्म स्वीकारला आणि नंतर त्याचा जोमाने प्रसार केला. खिस्ती धर्म खरा फोफावला तो या राजाच्या राजवटीपासून. पुढे त्याने स्वत:च्या नावावर एका शहराची स्थापना केली. त्या काळचे हे कॉन्स्टॅन्टिनोपल शहर आज इस्तांबुल म्हणून ओळखले जाते. टर्की या मुस्लिमबहुल देशातील या शहराचा ख्रिस्ती धर्म लोकप्रिय होण्यात एवढा मोठा वाटा असेल हे आज खरेही वाटत नाही. या धर्माला रोमनेच पुढे आणले असा समज आज रूढ आहे. हा गैरसमज फ्रँकोपॅन फार प्रभावी पध्दतीने दूर करतात.
इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांमध्ये वर्चस्वासाठी जे युद्ध सुरू होते त्याचा एक वेगळाच आणि अनपेक्षित असा फायदा झाल्याचे दिसते. या धर्मयुद्धाची व्यापाराला तर व्यापाराची धर्मयुद्धाला मदत झाली. व्यापार सुलभ व्हावा म्हणून बांधलेले महामार्गच धर्माचे प्रसारकही वापरत. इस्तांबुलपासून दमास्कस, इस्पहान, समरकंद, काबूल व चीनचे द्वार समजले जाणार्‌या काश्गरपर्यंत जाणारा आणि पुढे रेशीम महामार्ग म्हणून नावारूपास आलेला हा मार्गच धर्मप्रसाराचा मार्ग बनला.
इतक्या प्राचीन काळी व्यापार किती सर्वव्यापी होता यावर आज विश्‍वासही बसणार नाही. दमास्कस, बगदाद आणि समरकंदचा कागद प्रसिद्ध होता तर इजिप्तची चांदी. लेबनॉनच्या सीडर नावाच्या लाकडाला जगभर मागणी होती, तर बॅक्ट्रियाचे सोनेही काही कमी नव्हते. सोगदियानाच्या नीलमण्याची जशी सर्वदूर ख्याती होती तशी भारताच्या हस्तीदंताचीही होती. अफगाणी घोड्यांना तर कोठे तोडच नव्हती. आणि या सार्‍यांवर वरताण होते ते चीनचे रेशमी, तलम कापड. रेशमाला इतके महत्त्व होते की त्याचे कापड किंवा वेळप्रसंगी सूतदेखील पैशांऐवजी वापरले जात असे. हान राजवटीत तर सैनिकांचा पगारही याच स्वरूपात दिला जात असे. तामिळ साहित्यात रोमन जहाजांचे सुरेख वर्णन आढळते. ही जहाजे सोन्याने भरून येत आणि येथील मसाले, धातू व हस्तीदंत घेऊन जात अशी वर्णने या साहित्यात वाचायला मिळतात. आज जशा पश्‍चिमेकडे अमेरिका, तर पूर्वेकडे चीन या मोठ्या बाजारपेठा मानल्या जातात, तशा त्या काळी पश्‍चिमेला रोम, तर पूर्वेला पर्शिया या जगातील सर्वात समृद्ध बाजारपेठा मानल्या जात.
पाण्यावर पसरत जाणार्‍या तरंगांप्रमाणे या सगळ्याचा प्रभाव जगभर पसरत गेला. व्यापार्‍यांकडून ऐकलेल्या अद्भुत गोष्टी स्वत: अनुभवाव्यात म्हणून कोणी प्रवासाला निघत तर कोणी विचारांची देवाण-घेवाण व्हावी म्हणून निघत. अर्थव्यवस्थेवर तर याचा परिणाम झालाच, पण साहित्य, तत्त्वज्ञान, संस्कृती, रीतीरिवाज, कला, विज्ञान, अशा सर्वच क्षेत्रांत त्याचे पडसाद उमटले. हे सगळे चित्र एकत्र पाहिले तर त्या काळच्या जगाचे एक अतिशय चैतन्यमय स्वरूप समोर येते. प्रत्येक संस्कृती, प्रत्येक साम्राज्य हे परस्परांपासून शिकत होते, त्या शिकवणीवर आपला स्वत:चा ठसा देत होते आणि त्यातून सर्वांचीच वैचारिक प्रगती होत होती. ऑक्सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ अभ्यासक आणि सेंटर फॉर बायझण्टाइन (आजचे इस्तांबुल) रिसर्चचे डायरेक्टर असलेल्या पीटर फ्रँकोपॅनच्या मते प्रगतीचा हाच खरा मार्ग आहे. त्या काळी प्रत्येकाने आपणच सर्वश्रेष्ठ असा तोरा मिरवला असता तर आज आपण अत्याधुनिक अशा संगणक युगात पदार्पण करूच शकलो नसतो. मानव जातीने इतिहासापासून हेच धडे तर घ्यायचे असतात.

डॉ. अंजली पाटील-गायकवाड