वसुबारस…

0
210

दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपली. तरीपण हरीच्या घरी ना दिवाळीची काही तयारी, ना काही धामधुमीचं वातावरण दिसत होतं. कसं दिसणार? नुकतंच महिन्यापूर्वी हरीच्या बापाचं निधन झालं होतं. तसा हरीचा बाप जरुरीपुरता ‘शिकलेला’ होता. शेती आणि संबंधित व्यवहारात तो चोख होता. दोन्ही मुलांसाठी शेतीच्या सारख्या वाटण्या त्याने आधीच करून ठेवल्या होत्या. सोनं-चांदी फारसं नव्हतंच. पण जे काही थोडंथोडकं पदरी होतं, तेही दोन्ही सुनांच्या स्वाधीन करून तो मोकळा झाला होता. त्यांच्याकडे एक कबर्‍या रंगाची गाय होती. तिला सगळे ‘कबरी’च म्हणत. लहान मुलगा हरी. त्या हरीचा फार जीव होता तिच्यात. अगदी पहिल्यापासून, ‘तिची काय वाटणी करायची…? तो हरीच सांभाळेल तिला…’ असं तो केव्हा केव्हा म्हणे.
कालांतराने सर्व स्थिर-स्थावर झाल्यावर एक दिवस थोरला लेक म्हातारीला म्हणू लागला, ‘आये, आता किती दिवस असं घरातच अडकून पडायचं आमी? शेतीची कामं जागीच अडकली आहेत. इतरही छोटी मोठी कामं बाकी आहेत. आमाला जा लागीन नं आता लवकर तिकडं… सुकळीले…?’
म्हातार्‍याच्या नावावर एकूण बारा एकर शेती होती. सहा एकर शेती गावालगतच होती. ती हरीला मिळाली. दुसरा एक सहा एकराचा तुकडा सलग असा, मालेगावहून पंधरा-सोळा किलोमीटरवर असलेल्या सुकळी गावाच्या लगतच्या शिवारात होता. ती शेती थोरल्याच्या वाट्याला आली. म्हणूनच थोरला मायला म्हणत होता की, आम्ही जातो आता तिकडे सुकळीला. सुकळीच्या वावरातल्या घरात… राहायला…
आतापर्यंत दोेन्ही पोरं एकत्रच राहायचे. थोरला इथूनच सुकळीची शेती पाहायचा. म्हातारा गेल्यावर आणि जायच्या आधीपासूनच थोरला सुकळीला राहाण्याची गोष्ट काढायचा. आता त्यानं पक्कच ठरवलं होतं. म्हणून म्हातारीजवळ बोलला. वेगळा होऊन सुकळीला राहायला जाणार म्हटल्यावर माय थोडी नाराज झाली. तरी पण माहीत होतंच की आज ना उद्या असं होणारच. बाच्या बोलण्यातही असं कधीतरी यायचं म्हणून माय म्हणाली.
‘व्हो राजा, जा तर लागीनच तुले सुकळीले. मी कुटं नाई म्हंते? पन एकदम घर रिकामं होईन. थे वर गेलेत तवापासून रिकामपण मले खाय उठते. आता तू अन् तुहं खटलं जाणार. कससंच वाट्टे न रे.’
‘हो माय. कसंतरी वाट्टे. वाटणारच, मले तरी कुटं गोड वाट्टे? पण कवा तरी जा तर लागीनच ना? ती येळ तर येणारच ना? आता दोन-चार दिसांनी जायचं म्हणतोय् मी. कस?’
‘आता? या दोन-चार दिवसात? नाई-नाई आता दिवाळी तोंडाशी आली हाय. दिवाळी तिथं सुकळीच्या घरात करणार तुमी तिथीसा? नाई नाई. थे काई नाई. दिवाळी याच घरात करूनच तुमी जा सुकळीले.’
थोडं थांबून माय म्हणाली-
‘तशी दिवाळी म्हनून आपल्याले करायची नाई म्हना यंदा. पन दिवाळीत आपण समदे यका ठिकाणी रायलो… तर तेवढंच मनाले बरं वाटीन ना. असं माहं म्हननं.’
थोरल्याला ते पटलं. तो थोडा हट्टी अन् आपलंच खरं करणारा असा होता. त्याला पटलं म्हटल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दिवाळी इथलीच करून सुकळीला जायचं असं ठरलं.
—–
हरी अठरा-वीस वर्षांचा होत नाही तोच मालेगावच्या बाहेर असणार्‍या ‘कपिला गोरक्षण संस्थेत’ तो नोकरीला लागला. सुरुवातीला त्याला काऊ शेडमध्ये काम मिळालं. ते त्याच्या आवडीचं काम होतं. अंग मेहनतीत तो कमी नव्हताच. पाहता पाहता हरी त्याच्या अन्य सहकारी सोबत्यांमध्ये प्रिय झाला. त्या सर्वांच्या कामकाजावर देखरेख करणारे अधिकारी आणि गोरक्षण संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुद्धा त्याच्यावर खुष होते. आजारी पडलेल्या जनावरांना या गुरांच्या दवाखान्यात नेण्याच्या कामातही हरीचाच पुढाकार असायचा. गाई-वासरांना दाणापाणी करणं, चारा टाकणं, दूध काढणं, चराई रानात त्यांना चरायला नेणं असली कामं करताना हरी इतका रंगून जायचा की, इतर गोष्टीचं भानच त्याला राहात नसायचं. खरं म्हणजे ही त्याची खरी-खुरी गोसेवा होती. गाई-वासरांना हरीचा आणि हरीला गाई-वासरांचा लळा लागला. काऊ शेडमधली गाई-वासरं जेव्हा मोकळी सोडली जात तेव्हा जिथे कुठे तरी काम करीत असायचा तिथे त्या यायच्या. कधी कधी आवाजाची एक विशिष्ट, वेगळीच हेल काढून तो त्यांना बोलवायचा. त्या यायच्या. हरी मग त्या गाईंना गोंजारायचा. त्यांच्या मानेला, पोळीला, खाजवायचा. त्यांच्या पाठीवर थाप मारायचा आणि हो त्यांच्याशी बोलायचा सुद्धा. वेगवेगळे विचित्र आवाज काढणं हेच हरीचं त्या मुक्या प्राण्यांशी बोलणं. हे दृश्य पाहण्यासारखं असायचं. हरीचे सोबती अशा वेळी म्हणायचे, ‘‘हरी तुहं नाव ‘हरी’ नको होतं राजा. तूज हरी हे नाव बदला लागते गड्या. तू हरी नाहीच. तू त्याईचा कुस्ना हायेस… कुस्ना.’’
बाकीचे सोबती मग मस्त हसायचे.
कबरी गायीचीही सगळी देखभाल हरीला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आस्थेनेच करायचा. या गोरक्षण संस्थेच्या नोकरीमुळे त्याच्या कबरीच्या संगोपनात भरच पडली. आपण ज्या संस्थेत नोकरी करतो तेथील गाई-वासरांची एवढी सेवा करतो, तर आपल्या घरच्या कबरी-मायची सेवा आपण नको का करायला? असा विचार तो करायचा. हरीने नुसता आवाज दिला, तरी कबरी कान टवकारून त्याच्याकडे धावत यायची. दाणापाणी असो की दूध काढणं असो ती सगळं काही हरीकडूनच करून घ्यायची. चुकून एखादे वेळेस दुसरं कोणी दूध काढायला असलं, तर ती दूध काढायला त्रास द्यायची, नाही तर पान्हा चोरायची. मग बाकीचे म्हणायचे, पाहा कबरा माय कशी ‘पार्सलिटी’ करते ते.
हरीची नोकरी सुरू झाल्यावर लवकरच दिवाळीचा सण आला. वसुबारसेला संस्थेतही सण साजरा होत असे. ज्या बैलांच्या भरवशावर आपण शेती करतो, ते बैल आपल्याला गाईंपासूनच मिळतात. म्हणून वसुबारसेच्या दिवशी सवत्स-गोपूजनाचं महत्त्व आहे. या दिवशी सकाळी संस्थेच्या सर्व गाई-वासरांना मोकळ्या जागेत सामुदायिक आंघोळ घालून स्वच्छ केले जाई. नंतर सगळ्या गाई-वासरांना मध्य भागातील पटांगणात आणून एका मोठ्या चर्‍हाटाचा चौकोन करून त्या चर्‍हाटाला त्यांना बांधून ठेवण्यात येई. चौकोनाच्या मध्यभागी एका खुंटीला बांधलेल्या एका सवत्स धेनूची पूजा संस्थेने आमंत्रित केलेल्या एखाद्या सन्माननीय गो-प्रेमी पाहुण्यांच्या शुभहस्ते केली जाई आणि त्यानंतर अन्य गाई-वासरांचे पूजन संस्थेचे कार्यकर्ते, कर्मचारी वृंद करीत. सर्व गाई-वासरांना हार, हळद-कुंकू, गोग्रास देऊन गोपूजन संपन्न होत असे. या वसुबारस कार्यक्रमात हरीचा सहभाग असायचा… हे ओघाने आलेच. हीच प्रेरणा घेऊन दरवर्षी हा सकाळचा संस्थेचा कार्यक्रम आटोपताच हरी घरी यायचा आणि घरच्या कबरी गायीचं अन् वासरीचं पूजन करून घरची वसुबारस साजरी करायचा. थोरला घरी असला तर जेमतेम तिथे हजर असायचा. असा क्रम सुरू होता.
दिवाळीनंतर थोरला त्याच्या खटल्यासह सुकळीला राहायला जाणार हे ठरलं होतं. तरीही यंदाच्या वसुबारसेला दोघा भावांत वांधा झालाच.
त्याचं असं झालं की यंदाचा संस्थेचा वसुबारसचा समारंभ आटोपून हरी घरी आला. आल्या आल्या कबरी माय अन् तिच्या वासरीच्या वसुबारसच्या पूजेच्या कामाला तो लागला. पूजा पार पडली. गोग्रास दिल्यावर सर्वांची जेवणं झाली. जेवताना थोरल्यानं सर्वांसमोर एकदम कबरीला सोबत नेण्याचा विषय काढला. ते ऐकल्यावर हरीचा घास हातातच राहिला. माय आणि बाकी सगळे एकदम अवाकच झाले. माय म्हणाली,
‘हे काय काहाडलस रे शहान्या तू आता? याईनं तुम्हा दोघा पोरांना शेतीचे वाटे हिस्से बराबर करून देले. आता एकदम कबरीले घेऊन जायच्या गोष्टी करतं तू. थे काई नाई. कबरी हरीकडे इथंच राहीन.’
पण थोरला हट्टालाच पेटला. ‘माय तू पडू नोको एच्यात. सांगून ठेवतो. बा नं वाटे हिस्से बराबर केलेत माझी तक्रार नाही त्याबद्दल. पन हरी लायना म्हनून लय लाड करत आले तुमी त्याचे. तो लायना म्हणून त्याला इथल्ली शेती, इथलं घर, नोकरी पन मिळवून दिली अन् मले सुकळीची दूरची शेती देल्ली.’
‘मग काय बिगडलं म्हंते मी, तू मोठा हायेस. सुकळीची शेती तू चांगली करशील. घरही आहे आपलं तिथं मग काय बिघडलं?’ माय समजुतीच्या सुरात म्हणाली, ‘गाईचं काय घेऊन बसला रे?’
थोरला एक नाही… अन् दोन नाही. मग हरी तिरीमिरीनं बोलला,
‘नेऊ दे माय त्याले कबरीले. थो नाई ऐकनार तुजं अन् कोनाचंच. नेहमी आपलंच दामटायची सवय हाय त्याला. मी र्‍हाईन कसा बी… कबरी शिवाय.’
हातातला घास हरीनं जेमतेम तोंडात ढकलला. पाणी प्याला आणि ताडकन पानावरून उठला. बायकोनं समजावलं, ‘भरल्या पानावरून उठू नका. वसुबारसेचा परसाद हाय तो.’
हरी एक क्षण थबकला. दुसर्‍याच क्षणी तो पानावर बसला. कोणाशीही एक शब्द न बोलता, त्यानं ताट संपवलं.
पुढे दिवाळी आली. दिवाळीचा सण म्हणून साजरा करायचा नव्हताच. या प्रसंगामुळे नाराजीत भर पडली. थोरला आपल्याच तोर्‍यात वावरत होता. बाकीचे सर्व कोरडेपणानं आपापली कामं करीत होती. कबरीचं दाणा पाणी हरी करतच होता.
दिवाळी संपल्यावर एक दिवस थोरला बिर्‍हाड आणि कबरीला घेऊन गेला.
काळ पुढे सरकत होता. थोरला तसा मेहनती होता. शेतातच त्याचं छोटंसं घर होतं. मधून-मधून तो मालेगावला यायचा, तेव्हा हरीशी तेवढ्यापुरतं बोलायचा. मायचा जीव दोन्ही लेकरांसाठी तुटायचा. दोन्ही भावांमध्ये बर्‍यापैकी संबंध असावे. ते आणखी सुधारावे असं तिला वाटायचं. तसे प्रयत्न ती तिच्या परीने करायची. पुढे पुढे कबरीचा विषयही बंद झाला आणि ते थोरल्याच्या पथ्यावर पडलं. दरम्यानच्या काळात कबरीला एक वासरी अन् एक गोर्‍हा झाला…
काही निमित्ताने माय सुकळीला गेली असता तिला दम्याचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांना आणून औषध-पाणी झालं पण या खेपेला मात्र म्हातारी वाचली नाही. एका सकाळी म्हातारीनं या जगाचा निरोप घेतला.
थोरल्यानं हरीला कळवताच हरी व त्याचे कुटुंब सारीजण लगोलग सुकळीला पोहोचले. हरीने मायकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहिलं. त्याला हुंदका फुटला. शेजारीच उभ्या असलेल्या थोरल्याच्या खांद्यावर त्याने मान टाकली. दोघांनी एकमेकांना सावरलं. संध्याकाळी सर्व अंत्यविधी पार पडले. म्हातारी पंचत्वात विलीन झाली. सर्व संबंधितांचा मुक्काम झाला.
सकाळी उठून हरी घरालगतच्या गोठ्यात गेला. एक बैलजोडी, एक वासरू आणि एक म्हैस त्याला दिसली. हरीची नजर कबरीला शोधत होती. थोड्या अंतरावर मोकळ्या जागेत, एका झाडाखाली त्याला कबरी बांधलेली दिसली. दुसर्‍याच क्षणी त्याने मोठ्यांदा, हेल काढून हाक दिली… ‘कबरी’ आणि तो तिच्याकडे धावतच सुटला. कबरीने ती हाक ऐकली. तो आवाज तिच्या चांगलाच ओळखीचा होता. तिने कान टावकारून मागे वळून पाहिलं तेवढ्यात तरी तिच्याजवळ पोहोचला आणि तिच्या सर्वांगाला थोपटायला लागला. तो स्पर्शही तिच्या चांगलाच परिचयाचा. ती हंबरली. हरीला चाटायला लागली. मुकं जनावर… भडंभडं बोलू लागलं. ती जे बोलली… ते हरीला पूर्णपणे कळलं. तो थोडा बाजूला झाला. कबरीकडे डोळे भरून पाहू लागला. कबरी रोड झाली होती. तिचं वय झालं होतं. हरीला तिची दया आली. तेव्हाच हरीनं, आता इथून जाताना कबरीला सोबत घेऊन जाण्याचं पक्क ठरवलं. थोरल्याची पर्वा करायची नाही. त्यानं पर्वा केली होती का माझी… तिला इथे आणताना…?
नंतर मायची तेरवी आटपल्यावर परत निघताना त्याने कबरीला नेण्याचा विषय थोरल्याजवळ काढला. आश्‍चर्य म्हणजे तो लगेच तयार झाला. हरीने आनंदाने बायकोला ही गोष्ट सांगितली.
‘तुमी तर लय भोळे सांब आहा जी. थे आता गायीले न्या म्हनतेत. कारण ती आता कामाची राईली नाही म्हनून. इतके वर्स दूध-दुभतं, गोर्‍हे, कालवडी… दिल्या तिनं आता तिचं वय झालं… म्हनून न्या मनतेत थे.’
ते हरीच्याही लक्षात आलं होतं, पण तरीही तो म्हणाला,
‘तो तिचा हिसाब असल मले ते काईच नको. मले कबरीमायची फक्त सेवा करायची आहे म्हनून आपण अन् तिच्या गोर्‍ह्याले घेऊन चाललो.
हरी आपल्या बायकोपोरांसह गाय-गोर्‍ह्याला घेऊन मालेगावच्या घरी पोहोचला. कबरी परत घरी आलेली पाहायला आज माय नव्हती. हे सर्वांना जाणवलं. सुकळीहून आल्यानंतर दोन तीन दिवसातच कबरीची तब्येत नरम गरम दिसायला लागली. तिचं चारा पाणी बंद झालं. रवंथ करीनाशी झाली. एकाच जागी बसून राहायची. ते पाहून हरी चरकला. त्याच्या मनात कुशंका डोकावली. लगेच त्यानं डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी गाईची पूर्ण तपासणी करून औषधोेपचार केला. तिला अशक्तपणा असल्याने डॉक्टरांनी सलाईन दिले. तीन चार दिवसाच्या इलाजानंतर कबरीच्या तब्येतीत सुधारणा झाली.
पावसाळ्याला सुरुवात झाली होती. हरीचं चाकोरीबद्ध जीवन सुरूच होतं. संस्थेची नोकरी सांभाळून तो त्याच्या शेतीवाडीची कामं करून कबरी मायची सेवा करायचा. त्याच्या जगण्याची ही त्रिसूत्री झाली. माय गेल्याची उणीव जाणवत होती. पण त्याच्या कळत न कळत तो कबरी मायमध्ये आपली माय पाहायला लागला.
पाहता-पाहता पावसाळाही संपत आला होता. सुदैवाने यंदा दमदार पाऊस झाला. थंडीची चाहूल लागली होती. लवकरच दिवाळी येणार होती. हंगामही मनाप्रमाणे झाला होता. म्हणून हरी एकदम खुश होता. त्याच्या खुशीचं आणखी एक कारण होतं… येणारा वसुबारसचा सण. यंदाच्या वसुबारसच्या सणाला त्याच्या आवडत्या कबरीचं पूजन इतक्या वर्षांनंतर तो करणार होता.
वसुबारसेचा दिवस उजाडला. सकाळी त्याच्या गोरक्षण संस्थेचा वसुबारसेचा कार्यक्रम पूर्ण करून तो घरी परतला. हरीने गाय-गोर्‍ह्याला यथेच्छ आंघोळ घातली. पोरांचा उत्साह तर उतू जात होता. दोघा नवरा-बायकोनी कबरीची आणि गोर्‍ह्याची पूजा केली. त्यांच्या गळ्यात हार घातले. त्यांना बाजरीची भाकरी अन् गुळाचा नैवेद्य दाखवून त्यांना गोग्रास खाऊ घाला. नंतर सर्वांची आनंदात जेवणं झाली. सर्वांच्या चेहर्‍यावर समाधान होतं.
हरीला पाच वर्षापूर्वीचा वसुबारसचा दिवस आठवला. त्या दिवसाच्या कटु आठवणी आजच्या आनंदाच्या दिवशी पूर्णतः विसरायच्या असं हरीनं पक्क ठरविलं. त्यानं मोबाईल हातात घेतला आणि त्याची बोट थोरल्याचा मोबाईल नंबर शोधू लागली.

डॉ. अशोक कासखेडीकर