अजब अनाथालय…!!

0
162

नुकताच श्रीलंकेला जाऊन आलो. हा चिमुकला शेजारी देश अत्यंत प्रेक्षणीय आहे. हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, या काव्यपंक्तींची आठवण होणारे दृश्य सर्वत्र दिसत होते. काही वर्षांपूर्वी एलटीटीईच्या दहशतवादाखाली हा देश भरडला जात होता, यावर विश्‍वास बसू नये असेच वातावरण सर्वत्र होते. मुंबई येथील हार्मनी टूर्सच्या कौस्तुभ जोशी यांनी श्रीलंकेत आमचे अपरिचित रामायण आयोजित केले होते. जेथे मुक्काम असेल त्या हॉटेलमध्ये सभागृह अथवा चक्क आकाशाच्या छताखालील हिरवळीवर प्रतिदिनी ही फिरती रामकथा उत्तरोत्तर रंगत गेली.
वाटेतील प्रेक्षणीय स्थळे पाहताना त्याचा आधीच अभ्यास व तत्संबंधीची पुस्तके वाचून गेलो असल्याने गृहपाठ बर्‍यापैकी तयार होता. बाहेर भटकंती करताना हे महत्त्वाचे असते. जो अपरिचित प्रदेश आपण पाहायला जात आहोत, त्याबद्दल माहिती घेऊन ठेवली की तो पाहण्यात खरी मजा येते. कित्येक जण अशा यात्रांना जातात आणि प्रवास करताना बाहेरचे जग निरखण्यापेक्षा अन्य वेळघालवू साधनात रमून जातात. त्यामुळे खर्‍या अर्थाने जे पाहायला आपण आलो आहोत त्याचा आनंद हरवून बसतात. यात्रेच्या दैनंदिन स्थलदर्शन माहितीवर केवळ विसंबून चालत नाही. ते लोक तुम्हाला जे दाखवणार आहेत आणि जिथे तुमचा मुक्काम होणार आहे तेवढेच देतात. किंबहुना त्यांच्याकडून तीच अपेक्षा असते. अधिकाची माहिती आपण वेगवेगळ्या स्रोतांतून करून घ्यावी. आता तर पुस्तकांव्यतिरिक्त नेट हे उत्तम साधन झाले आहे.
आपल्याकडे हत्तीला शुभ मानले आहे. गजांतलक्ष्मीसारखे शब्द हे त्यामुळे निर्माण झाले आहेत. बौद्धांमध्ये हत्तीला, मृत पितरांचे प्रतीक समजत असल्याने खूप महत्त्व आहे. एका जातक कथेनुसार तथागत एका पूर्वजन्मात सहा सुळे असलेले हत्ती होते आणि ते हत्तींचे राजे होते. गौतम जन्माला येण्याचा संकेतही महामायेला एका स्वप्नदृष्टांतामुळे मिळाला. सफेद हत्ती सोंडेत कमळ धरून तिच्या गर्भाशयात शिरल्याचे स्वप्न तिने पाहिले होते.
दाम्बुलाकडून कोलंबोकडे जाण्याच्या मार्गावर केगालजवळ पिन्नावेला येथे एक छान अनाथालय आहे. ते अत्यंत प्रेक्षणीय आहे. आता अनाथालयात प्रेक्षणीय काय असे वाटेल. तर मुद्दाम सांगतो की, तुम्ही समजता तसे नव्हे, हे ‘हत्ती अनाथालय’ आहे. पूर्वी पोर्तुगिजांनी हत्ती निर्यात केले. इंग्रजांनी तसे करणे बंद केले. पण डोंगराळ भागात शेतीला उपद्रव देणारे हत्ती मुक्तपणे मारले, कधी हौस म्हणून मारले. पण पुढेही हत्ती विषारी पदार्थ व बंदुकीची शिकार होत राहिले. १९९० मध्ये १४००० असलेली हत्तीसंख्या २००५ मध्ये ४००० इतकी घसरली. बळी पडलेल्या हत्तीची बालके सैरभैर होत असत. काय करावे हे त्यांना कळत नसे. ती कुठेही जात व बहुतेक वेळा उपासमारीने मरत. यावर उपाय म्हणून येथील सरकारने १९७५ मध्ये हे अनाथालय सुरू केले. पुढे घटत्या हत्तीसंख्येमुळे येथे हत्तीपैदास प्रकल्प सुरू केला. आज हत्ती संख्या हळूहळू पण निश्‍चित वाढते आहे. दिवसातून ४ वेळा पिलांना दूध पाजले जाते. ही गजशावके अगदी लहान मुलांसारखी वागतात, ते पाहून गंमत वाटते. एका वेळी दोघांना लोकांमध्ये आणून दूध पाजले जाते. तिथे जायला त्यांना बाहेर काढले की एकमेकांना धक्काबुक्की करत दूध पिण्याच्या जागेकडे ती धाव घेतात. तिथे दूध पाजणारे बाटल्या घेऊन उभे असतात. जमलेल्या लोकांना दिसावे आणि फोटो काढता यावेत म्हणून त्या रिंगणात सतत जागा बदलत दूध पाजतात. त्या माणसांच्या मागे धावताना ती पिल्ले लाडिक चिंघाडतात. हलकेच ढुशी देण्याचा प्रयत्न करतात. तो माणूस जास्त सावध असतो. हत्तीची ढुशी कितीही प्रेमाची असली तरी माणसाला सहन होणारी नव्हे! तोंडघशी पडायला व्हायचे. हत्तीणीचा गर्भारपणाचा काळ सर्वात मोठा म्हणजे सुमारे बावीस महिन्यांचा असतो. त्यामुळे नवजात शावक तीन वर्षांचे होईपर्यंत ती संगमोत्सुक होत नाही. कारण तोवर ते शावक तिच्या अंगावर पीत असते. हत्तीचे तसे नसते. तो वर्षातून ठरावीक वेळी माजावर येतो आणि मादी मिळाली नाही तर बेफाम होतो. असे हत्ती घरादारांची, बाग-शेतांची, झाडाझुडपांची नासधूस करतात. अगदी माणूस दिसला तरी त्याला मारतात. अशा मस्तवाल झालेल्या हत्तींना कित्येक वेळा ‘रोग’ असे जाहीर करून मारून टाकले जाते.
श्रीलंकेत मात्र माणसाळलेल्या हत्तींची कुटुंबव्यवस्था १९९४ पासून खूप काळजी घेऊन चालवली जाते. चोवीस एकराच्या जागेत आरंभी लहान शावके होती, पुढे मोठ्या हत्तींची भर पडली. आम्ही गेलो तेव्हा किमान चार हत्ती माजावर आले होते. त्यांना साखळदंडांनी बांधून ठेवले होते. येणार्‍या पर्यटकांवर त्यांनी हल्ला करू नये म्हणून ही काळजी घेतली होती. अन्य हत्ती मात्र मस्त मोकाट फिरत होते. अर्थात तिथे असलेल्या रक्षकांचे त्यांच्यावर लक्ष होते. मोठ्या हत्तीसाठी ८० किलो चारा व २ किलो धान्याचे खाद्य असते. रोज दोन वेळा महाओया नदीवर त्यांचे मुक्त स्नान असते. स्नानासाठी जाताना अगदी घाईने हा सर्व लवाजमा लगबगीने जाताना दिसतो. तेथील हॉटेलमध्ये बसून पर्यटकांना हत्तीस्नान पाहता येते. एकूण हा सर्व कार्यक्रम मजेदार असतो. कोणी पाण्यात शिरताच मस्तपैकी आडवा पडतो, तर कुणी पाण्यात न शिरता कडेने चालत राहातो. कुणी पलीकडे जाऊन माती अंगावर उडवत राहातो, तर कुणी झाडाचा पाला ओरबाडून खातो. काहींना पाण्यात ढकलावे लागते, तर काहीजण सोडलेल्या फवार्‍याखाली शांत उभे राहून भिजतात पण पाण्यात शिरत नाहीत. असा भरपूर वेळ गेला की खुणेची शिट्टी वाजते. ती ऐकली की काहीजण लगेच बाहेर पडून चालू लागतात. काहीजण शिट्टी ऐकू आली नाही असे दाखवत टंगळमंगळ करतात. पुन्हा शिट्टी वाजते आणि तरीही ऐकले नाही तर एखादा माहूत पाण्यात उतरतो. मग मात्र लगबगीने उरलेले नग पाण्याबाहेर निघतात. श्रीलंकन सरकार हत्ती मैत्री शिबिर आयोजित करते. तुमच्या राहाण्या-जेवणासकट सोय असते. महिना-दोन महिने राहून हत्तीमैत्री करता येते. त्यांना खाऊ-पिऊ घालता येते. फक्त हजारो रुपये, डॉलर्स वा पौंडात मोजावे लागतात इतकेच…!!

डॉ. सच्चिदानंद शेवडे