कारफेन्टानिल- नवं रासायनिक शस्त्र

0
2288

आजपर्यंत जगभरातल्या मादक पदार्थांचे मोठे पुरवठादार होते पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, थायलंण्ड, लाओस, ब्रह्मदेश, मेक्सिको, कोलंबिया इत्यादी देश. पण कारफेन्टानिलचा पुरवठादार आहे चीन आणि आतापर्यंतचे मादक पदार्थ मुख्यत: वनस्पतिजन्य होते, तर कारफेन्टानिल हा मुख्यत: रासायनिक पदार्थ आहे.

‘‘अण्णा, अहो आपल्या त्या ह्याचा तो मुलगा शेवटी गेला बरं का! नवसा-सायासाने झालेला एकुलता एक पोरगा! अवघा १९ वर्षांचा. आता बसलेत आई-बाप रडत! हवं तेव्हा लक्ष दिलं नाही, आता बसा बोंबलत!’’ गावाहून आलेला आमचा एक नातेवाईक माझ्या आजोबांना सांगत होता. पानसुपारीचं तबक समोर ठेवलेलं होतं आणि गावाकडच्या गप्पा, ज्यांना कोकणात ‘गजाली’ असं म्हणतात, त्या सुरू होत्या.
वर दिलेल्या गजालीचं तात्पर्य असं होतं की, गावातल्या एका श्रीमंताचा मुलगा वाईट संगतीने व्यसनी बनला. शाळेत असतानाच तो दारू प्यायला लागला. पण अल्पावधीतच त्याला दारूची नशा पुरेनाशी झाली. मग अफू, गांजा, सुतार लोक लाकडाला लावायला वापरतात ते फ्रेंच पॉलिश, असं वाट्टेल ते पिणं सुरू झालं. नंतर या कशानेच नशा येईनाशी झाली, तेव्हा म्हणे, तो जिभेला साप चावून घ्यायला लागला. म्हणजे विविध प्रकारच्या अमली पदार्थांनी त्याचं सगळं रक्त इतकं विषमय झालं की, सापाच्या विषाचा त्याच्यावर परिणाम न होता, त्यामुळे त्याला नशा येत होती. त्या सगळ्याचा परिणाम अटळच होता-झटपट मृत्यू! तो त्याने वयाचा १९ व्या वर्षीच मिळवला.
ही माझ्या लहानपणी म्हणजे ५० वर्षांपूर्वी ऐकलेली गोष्ट आहे. यातली जिभेला साप चाववून घेऊन नशा आणण्याची गोष्ट कितपत खरी आहे, कोण जाणे! पण असेल सुद्धा खरी. कारण नशेची तलफ आल्यावर गर्दुल्ले काय काय करतात, याबद्दल गेल्या १०-२० वर्षांत आपण बरंच काही वाचलंय्. अफू, गांजा, हेरॉईन, चरस, हशीश या मालिकेतला गर्द हा सगळ्यात नवा पदार्थ.
पण आता गर्द सुद्धा जुना झाला म्हणायची वेळ आली. कारण, गर्दपेक्षा जास्त नशिला आणि कमालीचा घातक पदार्थ पश्‍चिमेच्या अमली बाजारपेठेत आलासुद्धा! त्याचं नाव आहे, कारफेन्टानिल; आणि त्याचा पुरवठादार आहे चीन. आजपर्यंत जगभरातल्या मादक पदार्थांचे मोठे पुरवठादार होते पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, थायलंण्ड, लाओस, ब्रह्मदेश, मेक्सिको, कोलंबिया इत्यादी देश. पण कारफेन्टानिलचा पुरवठादार आहे चीन आणि आतापर्यंतचे मादक पदार्थ मुख्यत: वनस्पतिजन्य होते, तर कारफेन्टानिल हा मुख्यत: रासायनिक पदार्थ आहे.
वनस्पतिजन्य मादक पदार्थ हे मुख्यत: अफू आणि गांजा यापासून बनतात. अफू ही वनस्पती जगभरात भारतीय उपखंड, रशिया, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, तुर्कस्तान, मेक्सिको, इत्यादी देशांत होते, तर गांजा ही वनस्पती भारतीय उपखंड, दक्षिण अमेरिकन देश, युरोपात नेदरलॅण्ड यांच्यासह खुद्द अमेरिकेतही महामूर उगवते. मुळात मादक पदार्थ हे वाईट नाहीत. उलट आयुर्वेद, युनानी वैद्यक आदी प्राचीन वैद्यक शास्त्रांपासून आमच्या ऍलोपॅथीपर्यंत सर्व वैद्यक शाखा उत्कृष्ट वेदनाशामक म्हणून त्यांचाच वापर करतात. त्यासाठी मुख्यत: अफूपासून बनणार्‍या मॉर्फिन या द्रव्याचा उपयोग केला जातो.
पण मनुष्यस्वभाव ही मोठी विचित्र गोष्ट आहे. मादक पदार्थांमुळे शारीरिक वेदनेचा विसर पडतो, एवढ्यावरच थांबला तर तो माणूस कसला! मादक पदार्थ खाल्ला किंवा त्याचा धूर शरीरात घेतला की, एक सुखद अशी गुंगी येते, नशा येते. शरीर आणि मन यांच्यावर अंमल चढून काही काळापुरता का होईना, आपण अत्यंत सुखात आहोत, असा आभास निर्माण होतो; हे कळल्यावर माणूस त्या मादक पदार्थाचं वारंवार सेवन करू लागला आणि मग ते व्यसन बनलं.
समजा, हे एवढ्यावरच भागलं असतं तरी चाललं असतं. पण तसं होत नाही. हे आभासी सुख शरीराच्या श्‍वसन आणि पचन यंत्रणा हळूहळू बिघडवत नेतं. तंबाखू आणि दारू यांच्यात हा बिघडवण्याचा वेग कमी असतो, तर अफू आणि गांजा यांच्यापासून बनणार्‍या विविध अमली पदार्थार्ंंत तो जास्त असतो. म्हणून तर तंबाखू आणि दारूवाल्यांच्या शरीराचं हळूहळू डबडं होतं. तर चरस, गर्दवाल्यांच्या शरीराचं अल्पावधीत डबडं झालेलं दिसतं.
मद्य, अफू आणि गांजा या अमली पदार्थांचं सेवन जगभरात प्राचीन काळापासून चालू आहे. क्वचित त्यांचं व्यसनात रूपांतर झाल्याचे किस्सेही आढळतात. उदा. अलेक्झांडर आणि हुमायून. पाश्‍चिमात्य इतिहासकार मारे गळा काढून सांगतात की, जिंकायला भूमीच शिल्लक न राहिल्यामुळे अलेक्झांडर मेला आणि त्याच्या दुप्पट गळा काढून मुसलमानी इतिहासकार सांगतात की, जिन्यावरून खाली उतरत असताना हुमायूनला नमाजाची बांग ऐकू आली आणि तो तिथेच गुडघे टेकून बसण्याच्या प्रयत्नात गडगडत गेला आणि मेला. अहाहा! काय ही नमाजावरची निष्ठा!
प्रत्यक्षात, भारतातून जबर मार खाऊन परतावं लागल्यामुळे अलेक्झांडरचं दारूचं व्यसन अतोनात वाढलं आणि त्यामुळे लिव्हर फुटून तो परतीच्या वाटेवरच मेला, तर हुमायून अफूच्या नशेत जिन्याला सपाट जमीन समजला नि गडगडत खाली पडून डोकं फुटून मेला. पण या जुन्या गोष्टी झाल्या. अमली पदार्थाचं सेवन ही जागतिक समस्या झाली ती साधारण १९६० च्या दशकापासून आणि त्याचं मुख्य केंद्र म्हणजे अमेरिका हा देश, तिथला समाज आणि त्याची मानसिकता होय.
१९३० साली जागतिक मंदी आली. तिच्यावर मात करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँंकलीन रुझवेल्ट यांनी काही विशेष योजना आणल्या. १९३९ साली हिटलरने युद्ध सुरू केलं. ते भडकलं आणि जागतिक महायुद्ध बनलं. अमेरिकेच्या आर्थिक योजनांना या युद्धाने चांगलाच हात दिला. १९४५ साली महायुद्ध संपलं तेव्हा अमेरिका ही राजकीय आणि सामरिक महासत्ता बनलीच होती, पण आर्थिक महासत्ताही बनण्याच्या मार्गावर होती. पुढच्या १५ वर्षांत घटनाक्रम पूर्ण झाला. १९६० साली अमेरिका आर्थिक सुबत्तेच्या शिखरावर होती.
सत्ता आणि संपत्ती ही माणसाच्या डोक्यात जातेच. तशी ती जाऊ नये, म्हणून तर धर्म आणि संस्कृती आवश्यक असते. मानवी जीवनाला आवश्यक त्या सर्व गरजा भागल्या, संपूर्ण सुरक्षितता मिळाली आणि शिवाय भरपूर पैसा खिशात खुळखुळू लागला. म्हणाल ते सुख, म्हणाल ती चैन, सहज मिळाली. मग आता पुढे काय? मग सुखच दुखायला लागतं.
हा टप्पा मोठा नाजुक असतो. इथेच पुढचं जीवनध्येय सांगायला द्रष्ट्या मार्गदर्शकाची गरज असते. आपल्याकडे अशा लोकांना ऋषिमुनी किंवा संत म्हणतात. अमेरिकेत तसे कुणी नव्हते. त्यामुळे सत्ता, संपत्ती, सुबत्ता यांची प्रचंड शक्ती, स्वैराचार, व्यभिचार, मादक पदार्थांच्या सेवनातून मिळणारं आभासी सुख यांच्याकडे वळली. मग त्यांना अफू आणि गांजा पुरेना. कोकेन, मॉर्फिन, हेरॉईन, चरस, हशीश, एल.एस.डी., गर्द, फेण्टानिल अशी नशेची, आणखी नशेची द्रव्ये निघू लागली. आता जे अमेरिका करते ती लेटेस्ट फॅशन, त्यामुळे जगातले सर्व स्वत:ला पुढारलेले समजणारे लोक मादक पदार्थ खाऊ अथवा फुंकू लागले. आज जगातल्या प्रौढ म्हणजे २१ वर्षे पूर्ण केलेल्या लोकसंख्येपैकी ४ टक्के लोक म्हणजे किमान १ अब्ज ६२ कोटी लोक मादक पदार्थ सेवन करतात. एकट्या अमेरिकेपुरतं बोलायचं तर हा एकटा देश एका वर्षाला किमान ३२० कोटी डॉलर्सची मादक द्रव्ये सेवन करतो.
आता या अवाढव्य बाजारपेठेत कारफेन्टानिल या नवीन द्रव्याची भर पडली आहे. तसं ते नवं नाही. मुळात १९७४ साली रसायन तज्ज्ञांनी ते शोधून काढलं. कशासाठी; तर हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याला गुंगी आणण्यासाठी. आता जे मादक द्रव्य हत्तीला गुंगी आणतं, ते जर माणसाने इंजेक्शनद्वारे शरीरात टोचून घेतलं, तर काय होईल? प्रचंड गुंगी! प्रचंड आभासी सुख! आणि मग श्‍वसन इंद्रियं किंवा पचन इंद्रिय यांचा प्रचंड दाह होऊन झटपट मृत्यू!
तुम्हाला आठवतं का?२००२ साली रशियन राजधानी मॉस्कोमध्ये चेचेन मुसलमान फुटीर अतिरेक्यांनी एका थिएटरमध्ये बर्‍याच नागरिकांना ओलिस धरलं होतं. रशियन सैन्याने तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर त्या बंडखोरांचा साफ मोड केला होता. कारवाईत अतिरेक्यांसह किमान १२५ नागरिकही मेले होते.
त्या कारवाईत रशियन सैन्याने थिएटरच्या वातानुकूल यंत्रणेतून सरळ कारफेन्टानिल आणि रेमीफेन्टानिल ही मादक द्रव्यं सोडली होती. म्हणजेच पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्यानं दोस्त सैन्यावर सोडलेल्या विषारी वायूसारखाच हा प्रयोग होता.
आणि असं हे कारफेन्टानिल द्रव्य चीन १ किलोला २७५० डॉलर्स एवढ्या अल्प किमतीत विकतोय्. अमेरिकेला खरी चिंता आहे ती ही की, हे द्रव्य ‘इसिस’च्या हाती लागलं तर काय होईल?
पुराणातला भस्मासुर विविध रूपांनी पुन: पुन्हा मानवासमोर येतोय्.

मल्हार कृष्ण गोखले