अंबरीश कवीश्‍वर यांचे निधन

0
619

तभा वृत्तसेवा
अकोला, २३ ऑक्टोबर
स्थानिक भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि शिवस्पर्श या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक अंबरीश महेंद्र कवीश्‍वर यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते तीस वर्षांचे होते.
तरुण भारतचे माजी जिल्हा प्रतिनिधी महेंद्र कवीश्‍वर यांचे अंबरीश हे धाकटे पुत्र. रविवारी सकाळी ११.३०च्या सुमारास रामदासपेठस्थित राहत्या घरी अचानक अंबरीश कोसळले. त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. अंबरीश यांच्या निधनाच्या धक्कादायक वृत्ताने स्थानिक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रमुख यांनी कवीश्‍वर यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली.
अतिशय मनमिळावू स्वभाव, सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव, सर्वांशी हसतमुख संवाद साधण्यात ते अग्रेसर राहत. भारत विद्यालयात शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत स्नातक व स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता म्हणून त्यांनी सामाजिक जीवनात वाटचाल सुरू केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांनी अनेक वेळा आंदोलनात सहभाग नोंदविला. ते अभाविपचे प्रांत सहमंत्री म्हणून काही काळ कार्यरत होते. भाजपा महानगर मीडिया सेलचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. रविवारी दुपारीच त्यांच्या पार्थिवावर उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.