माजी आमदार रामभाऊ आस्वले यांचे निधन

0
228

तभा वृत्तसेवा
भंडारा, २३ ऑक्टोबर
भारतीय जनता पार्टीचे ज्येेष्ठ नेते व विधानसभेत भंडार्‍याचे आमदार म्हणून तीनदा प्रतिनिधित्व करणारे रामभाऊ आस्वले यांचे रविवार, २३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
अत्यंत मनमिळाऊ व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून रामभाऊंची ओळख होती. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
रामभाऊंच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. सोमवार, २४ रोजी सकाळी ११ वाजता वैनगंगा स्मशानभूमीत रामभाऊंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात रामभाऊंचा सिंहाचा वाटा होता. ज्या भंडारा विधानसभा मतदार संघात १९९० पर्यंत भारतीय जनता पार्टीला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही, त्या मतदार संघातून रामभाऊ सलग १९९०, १९९५ व १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करीत सलग पंधरा वर्षे निवडून गेले व आमदार राहिले. विशेष म्हणजे रामभाऊंच्या या कार्याची फलश्रुती म्हणून आजही हा मतदार संघ भाजपाच्या हाती आहे.
आमदार असताना रामभाऊंनी १९९५ साली भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूकही लढविली होती. या निवडणुकीत अगदी कमी मताच्या फरकाने त्यांना पराभव पहावा लागला होता. भाजपाच्या संघटनात्मक विविध जबाबदार्‍याही त्यांनी पार पाडल्या. जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जिल्ह्यात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कठोर परिश्रम घेतले.
पुणे येथून एम. ई. (सिव्हिल) शिक्षण घेऊन परतलेल्या रामभाऊंनी राजकारणात येण्यापूर्वी अनेक वर्षे भंडारा जिल्ह्यात आघाडीचे आर्किटेक्ट म्हणून काम केले. त्यांच्या तालमीत अनेकजण घडले. युती शासनाच्या काळात म्हाडाचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.
प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख लोकांमध्ये त्यांची होती. मागील काही वर्षांपासून आजारपणामुळे ते राजकारणापासून अलिप्त झाले होते. काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरी जाऊन रामभाऊंच्या तब्येतीची चौकशी केली होती.