वर्धेत गोंधळ; ५ नगराध्यक्षांसाठी ६६, नगरसेवकांसाठी ६९५ अर्ज

0
165

वर्ध्यात नगराध्यक्षासाठी १६ अपक्ष
तभा वृत्तसेवा
वर्धा, २९ ऑक्टोबर
जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, सिंदी रेल्वे व आर्वी या सहाही नगर पालिकांची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातली असून शनिवार, २९ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वर्धा नप सोडता ५ नगर पालिकांतील नगराध्यक्षपदासाठी एकूण ६६ तर नगरसेवक पदासाठी एकूण ६९५ अर्ज दाखल झाले आहेत.
विविध राजकीय पक्षाच्या तिकिटावर व अपक्ष निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर केले.
रात्री उशिरापर्यंत वर्धेत गोंधळाची स्थिती असल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकासाठी किती अर्ज दाखल झाले याची माहिती मिळू शकली नाही.
ऑन लाईन उमेदवारी दाखल करायची असल्याने पूर्वीसारखे यंदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून धामधूम दिसून येत नव्हती. परंतु, शुक्रवारी ऑफ लाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने अनेक इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. निवडणूक आयुक्तांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ४ वाजेपर्यंत वेळ वाढवून दिल्याने निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणारे कर्मचारी आणि उमेदवारांना हायसे वाटले होते.
वर्धेत ४ वाजताची प्रक्रिया सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. रात्री ८ वाजेपर्यंत मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्‍विनी वाघमळे यांचे संथगतीने काम सुरू असल्याने वर्धेतील स्थिती कळू शकली नाही.
नगराध्यक्षपदासाठी हिंगणघाट येथे २६, आर्वीत ९, पुलगाव येथे १७, देवळी ४, सिंदी रेल्वे येथे १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरसेवकासाठी हिंगणघाट येथे ३०७, आर्वीत १०४, पुलगाव येथे ११७, देवळी ७२, सिंदी रेल्वे येथे ९५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा असल्याने अनेकांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली. वर्ध्यात सराफा व्यवसायी अशोक कठाणे, समाजसेवक प्रदीप दाते, युवा कार्यकर्ता सुधीर पांगुळ, कॉंग्रेसचे बंडखोर चंद्रशेखर खडसे, अनुप जयस्वाल, नीरज गुजर, आशु पुरोहीत आदी १६ जणांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले.
कॉंग्रेसचे नेते…
शनिवारी, २९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. वर्धा नगरपालिकेत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्षपदासाठी अतुल तराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, डॉ. शिरीष गोडे यांच्यासह पक्षातील मोठे नेते जातीने हजर होते. कॉंग्रेसतर्फे नगराध्यक्षपदासाठी प्रवीण हिवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराष्ट्र प्रदेश सचिव शेखर शेंडे, शहर अध्यक्ष राजेंद्र शर्मा, कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष इक्राम हुसैन यांचीच उपस्थिती होती. प्रभार असलेले जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, आ. रणजित कांबळे पैकी कोणीही आढळून न आल्याने कॉंग्रेसमध्ये वर्धा नगराध्यक्षपदावरून दुफळी असल्याचे स्पष्ट जाणवत होते. दरम्यान, आ. कांबळे गटाचे उमेदवार सुधीर पांगुळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.