रविवारची पत्रे

0
167

लक्ष्मीपूजन
सकाळचा सुखद गारवा, पारिजातकाचा मंद सुगंध, पानापानांवरील चमकणारे दवबिंदू, हिरवीगार झाडे… मन कसं प्रसन्न! आश्‍विन महिन्यातील नवरात्रीची धमाल आणि लगेच लागतात दीपावलीचे वेध!
भारतीय संस्कृतीमध्ये चार पुरुषार्थ वर्णिले आहेत- धर्म, अर्थ, काम व मोक्ष. यातल्या अर्थाशी निगडित आहे दीपावली- दीपपूजन, लक्ष्मीपूजन. सामान्य माणसाच्या भोग, आरोग्य आणि धर्माचे मुख्य साधन म्हणजे ‘अर्थ’ होय. आजच्या संदर्भातही प्रत्येकालाच उत्तम आरोग्य, शिक्षण, सुकीर्ती अशा आयुष्याची कामना आहेच.
देव-दानवांनी अमृतप्राप्तीकरिता समुद्रमंथन केले. त्यातून विविध १४ रत्ने प्रकट झाली. देव-दानव, यक्ष-किन्नर, ऋषी-मुनी सगळेच जिच्या अप्रतिम तेजाने स्तिमित झाले ती देवी लक्ष्मी! सागराने तिला रेशमी वस्त्र, वरुणाने वैजयंतीमाला व सरस्वतीने कंठातील रत्नहार बहाल केला, त्या तेज:पुंज दैवी शक्तीला प्रणाम!
सुवर्णासारखे तेज असणार्‍या अत्यंत तेजस्वी, मनमोहक, प्रकाशमान, कमलासनावर आरूढ असलेल्या देवतेचे पूजन करण्याचा लक्ष्मीपूजनाचा दिवस! श्रीलक्ष्मी ही अन्नधान्य, संपत्ती, सुकीर्ती यांची प्रदात्री आहे. घरातील आपत्ती व असंतोष नाहीसे करणारी शक्ती आहे! या सुवर्णकांतेचे वास्तव्य स्थान कोणते?
श्रीलक्ष्मीदेवी उत्तर देते- ‘‘मी प्रयत्नांत राहते, प्रयत्नफलात विलसिते, उद्योगात रमते, शांती, प्रेम, दया, न्याय, नीती हे सद्गुण जिथे प्रकर्षाने नांदतात तिथे माझे वास्तव्य आहे.’’ हे सुवर्णाप्रमाणे तेज असणार्‍या लक्ष्मीदेवते, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर! हे जगन्माते लक्ष्मीदेवी! मी आजची आधुनिक स्त्री! मी अर्थार्जन करून कुटुंबाची प्रगती करते, मुलांचे योग्य संगोपन, शिक्षण याची काळजी घेते, एका उत्तम गृहिणीच्या भूमिकेतून घराचे सुव्यवस्थापन करते! हे कमलनयने! तू मला मनाने समृद्ध कर. तू माझ्या घरातील असंतोष, आपत्ती, दरिद्रता नाहीशी करण्याचे बळ दे. मला सक्षम कर! प्रामाणिकपणे काम करून सत्याची कास धरून धन-संपदा-वैभव मिळू दे! सत्कर्माची प्रेरणा दे!
हे विष्णुप्रिये! प्रामाणिक प्रयत्न आणि प्रार्थना यांचा संगम असलेले प्रकाशमान आयुष्य दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना.
॥ महालक्ष्म्यै च विद्महे
विष्णुपत्नींच धीमही
तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात॥
रश्मी वाघमारे

शेती क्षेत्रातील खुपणारा विरोधाभास…
२३ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘शेती क्षेत्रातील खुपणारा विरोधाभास’ हा प्राचार्य योगानंद काळे सरांचा अभ्यासपूर्ण लेख वाचण्यात आला, त्याबद्दल सरांचे अभिनंदन!
सरांनी आपल्या लेखात, शेती उत्पादनखर्च लक्षात घेता, गव्हाला ७६०० रु. प्रतिक्विंटल भाव असावा, असे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांना आज मिळणारा भाव १४५० रु. प्रतिक्विंटल आहे. विविध उत्पादनखर्चावर आधारित भाव व शेतकर्‍याला प्रत्यक्ष मिळणारा भाव यात ५५०० रु.चा फरक आहे.
सरांनी, भाववाढ होऊ नये म्हणून शेतकर्‍याच्या बँकेच्या जनधन खात्यात ५५०० रु. जमा करावे, अशी सूचना केली आहे. एक रकमी प्रतिक्विंटल ७६०० रु. भाव दिल्यास भाववाढ होईल व जनतेत यामुळे आक्रोश निर्माण होईल, हे खरे आहे. त्यामुुळे शेतकर्‍याला होणारे नुकसान टाळावयाचे असल्यास, जनधन योेजनेत जमा होणारे ५५०० रुपये शेतकरी दोन वर्षांपर्यंत काढू शकणार नाही, असे बंधन टाकावे व या रकमेवर सामान्य बचत दराने सरकारने शेतकर्‍याला व्याज द्यावे. यामुुळे भाववाढ होणार नाही. दोन वर्षांनंतर शेतकर्‍याला ५५०० रु. व त्यावरील व्याज मिळण्याची हमी मिळाल्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त होणार नाही व एकूणच सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल.
भारताच्या राज्यघटनेनुसार ‘शेती’चा विषय राज्य सरकारचा आहे, म्हणून शेती सुधारणा हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे, केंद्र सरकार त्याविषयी दखल घेत नाही.
परंतु सद्य:परिस्थिती लक्षात घेता, शेती व शेतकर्‍यांच्या समस्या, हे महत्त्वाचे मुद्दे बनले आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार म्हणून शेती व शेतकर्‍यांचे प्रश्‍न हाताळण्याची गरज आहे आणि म्हणून राज्याची जबाबदारी असलेली शेती ही केंद्र व राज्य सरकार अशी संयुक्त जबाबदारी होण्याची गरज आहे.
त्यामुळे स्वामिनाथन समितीने केलेल्या शिफारशीनुसार शेती हा विषय सामायिक सूचीत उेर्पिींशी ङळीीं समाविष्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी ही केंद्र व राज्य सरकार या दोघांची राहील. एक सार्वजनिक सेवा क्षेत्र या दृष्टिकोनातून शेतीकडे पाहण्याची आज गरज आहे. सरांनी म्हटल्याप्रमाणे, कृषी व ऋषी हा भारतीय जीवनदृष्टीचा आधार आहे.
डॉ. सुधाकर इंगळे
नागपूर

खंत सलते उरी!
सुरमयी सुवर्णकाळ गाजविलेल्या मन्ना डे यांच्या निधनाने रसिक शोकाकुल झाले. त्यांना श्रद्धांजलिनिमित्त, एखादी जुनी मुलाखतीची रेकॉर्ड ऐकायला कान आतुर होते. परंतु, सखेद नमूद करावेसे वाटते की, एकाही वाहिनीवरून तसल्या मुलाखतीच्या श्रवणाचा योग आला नाही. अर्थात, कुठे झाला असेलही, परंतु अत्यल्प प्रमाणात!
२४ बाय ७ कार्यक्रम सादर करणार्‍या शेकडो वाहिन्या जर भूक भागवू शकत नसतील, तर या उदासीनतेला काय म्हणावे? किंवा ९४ वर्षे जगलेल्या कलाकाराच्या हयातीत त्यांच्या फारशा मुलाखती रेकॉर्ड करण्याचे कुणाला सुचलेच नाही की काय? असे खरेच असेल, तर या घोर असंवेदनशीलतेला काय म्हणावे?
पूर्वी दूरदर्शन एकटा जबाबदार होता तेव्हा मान्यवर ज्येष्ठ कलाकारांच्या मुलाखती वरचेवर ऐकायला मिळत. पण, हल्ली लाईट, डीजे यांच्या तालावर कार्यक्रमच उरला नाही, असे एकूण दृश्य आहे. खरे तर लाईट, सजावट, वादन असा कोणताच खर्च न करता मुलाखतीचा कार्यक्रम होऊ शकतो. किमान यापुढे ज्येष्ठ कलावंत हुडकून मुलाखतीद्वारे त्यांची रोचक कारकीर्द पुढे आणणारी एखादी स्वतंत्र वाहिनी निर्माण होईल काय? कारण त्याचीच तर वानवा आहे!
मो. बा. देशपांडे
चंद्रपूर

खट्याळ सुनांना सुप्रीम समज!
आजकाल लग्नाळू मुलींना एकत्र कुटुंबातील मुलगा नवरा म्हणून नको असतो. एकटा, स्वतंत्र, आई-बापाचा लबेदा नसलेला मुलगा त्यांच्या पहिल्या पसंतीला उतरतो. पण देखणा, रुबाबदार, लठ्‌ठ पगाराचा शहरी मुलगा सांगून आल्यास, त्याच्या माता-पित्यांसह त्याला स्वीकारायला ती तयार होते. सुखी संसाराची तिची कल्पना ‘हम दो, हमारा एक’ अशी आटोपशीर असते. मुलगा लहान असेपर्यंत त्याचा सांभाळ करायला तिला सासू-सासरे हवे असतात. पोरगा जसा मोठा होतो आणि त्याचे आजी-आजोबा जसे वार्धक्याकडे झुकायला लागतात, तसे सासू आणि मामंजींची तिला अडचण व्हायला लागते. मग त्यांच्याविरुद्ध कुरबुरी, नवर्‍यापाशी तक्रारी सुरू होतात. पुढे याचे पर्यवसान भांडणात होते. त्यांना ऐतखाऊ, ‘खायला काळ न् भुईला भार’ अशी शेलकी विशेषणे लावली जातात. तिला शॉपिंग करणे, ब्युटीपार्लरच्या वार्‍या, मैत्रिणीसोबत पार्ट्या झोडणे हवे असते. सासूमुळे तिच्या या स्वातंत्र्याला लगाम बसतो. सुनेच्या आक्रस्ताळेपणाला म्हातारा-म्हातारी कंटाळतात. दुसरा पर्याय नसेल, तर ते हा जाच मुकाटपणे सहन करतात. सुनेची हुकूमशाही असह्य झाल्यानंतरच ते तिची मुलाकडे फिर्याद करतात. तो बायकोला समजुतीच्या चार गोष्टी सांगतो. ती बर्‍या बोलाने वठणीवर येत नसेल, तर तो शेवटचा उपाय म्हणून घटस्फोटाची धमकी देतो. ती बया संस्कारहीन, मुजोर, लाडावलेली असेल तर ती नवर्‍याच्या अल्टिमेटमला जुमानत नाही. शेवटी नाइलाजाने त्या बिचार्‍याला घटस्फोटासाठी कोर्टाकडे धाव घ्यावी लागते.
अशाच एका मुकदम्यात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवून, एका फिर्यादी नवर्‍याच्या बाजूने घटस्फोटाला अनुकूल निर्णय दिला.
या केसमध्ये एक महिला सासू-सासर्‍यांना घराबाहेर घालवून देण्यासाठी नवर्‍यावर सतत दबाव आणत होती. हे तिचे दबावतंत्र म्हणजे क्रूरपणाच असल्याचे सांगून, अशा पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी कोर्टाला विनंती करणे कायद्याला धरून असल्याने न्यायमूर्ती दवे आणि नागेश्‍वर राव यांनी त्या बापड्याला बायकोच्या जाचातून कायमचे मुक्त केले. आता तो सुखाने आपल्या वृद्ध आई-बापाची सेवा करू शकेल. त्या महिलेच्या निमित्ताने न्यायमूर्तींनी सर्व कुटिल, कारस्थानी, कजाग, स्वार्थी स्त्रियांना सबक शिकवला आहे.
रा. ना. कुळकर्णी
तोंडी तलाक
जेव्हा मर्जी झाली तेव्हा निकाह करायचा व वाटेल तेव्हा मर्जीप्रमाणे क्षणात तलाक द्यायचा. तीनदा तलाक हा शब्द उच्चारला की, जन्मोजन्मीचे हे नाते फक्त स्वमर्जीखातर तोडून टाकायचे, याचा अर्थ महिलांना, त्यांच्या मताला काडीचेही महत्त्व नाही. ती पायाची दासी आहे, महिलांना स्वत:चे मत वा महत्त्वच नाही. ती बिचारी पत्नी व मुले जीवनात ठोकरा खात फिरतील, याची त्या पुरुषाला तमा नाही, व समाजालाही नाही. ही पद्धत सुसंस्कृतपणाचा लवलेश नसणारी व रानटी वाटते. याच्या समर्थनार्थ त्यांचं म्हणणं आहे की, मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक प्रथा संपुष्टात येऊ नये. आम्हाला मनमानी करू द्यावी. उलट, घटस्फोट द्यायचा झाला तर कोर्टाला रीतसर अर्ज करून त्याची नीट छाननी करून मग आवश्यकता सिद्ध झाली तरच घटस्फोट द्यावा. या दोन पद्धतीत किती जमीन-अस्मानाचा फरक आहे. याच्या पुष्ट्यर्थ लंगडे समर्थन देताना अन्य धर्मियांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण मोठे आहे, विशेषत: हिंदू समाजात हे प्रमाण मुस्लिमांच्या तुलनेत दुप्पट आहे, असा दावा करण्यात येतो. जिथे मुस्लिम महिलांना बोलूच दिले जात नाही त्यांचं म्हणणं, बाजू, मत विचारातच घेत नाहीत, आवाज दडपून टाकला जातो, तिथे त्या समाजात घटस्फोट होतीलच कसे? संसार करताना कधीकधी मतभेद असू शकतात, गैरसमजसुद्धा असू शकतात. ते सामोपचाराने लवादाद्वारा सोडविणे शहाणपणाचे, की फक्त एकतर्फी खेळ समजून पुरुषांनी हुकूम केला की महिलांनी विनातक्रार तो ताबडतोब पाळायचा, हा स्त्रियांवर केवढा मोठा अन्याय आहे. असेल असा कायदा शरीयतमध्ये, पण जग आता सुधारले आहे, फार पुढे गेले आहे. यात अनिष्ट प्रथांना फाटा देऊन सुधारणा का करू नये?
या कायद्यामुळे भारतातील बहुविधता संपुष्टात येईल, सर्वांना एकाच रंगात रंगविले जाईल, अशी भीती मुस्लिम संघटनांनी व वली रहमानी यांनी व्यक्त केली आहे, हे अनाठायी आहे, अन्याय्य आहे. याच धर्तीवर स्त्रियांनासुद्धा नवर्‍याला तीन वेळा ‘तलाक’ म्हणून घटस्फोटाचा अधिकार असला पाहिजे, तो तसा आहे का? नाही! आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत. एक महिला देशाची पंतप्रधान होऊ शकते, समर्थपणे देशाचे काम सांभाळते, तरीही ती अबला कशी? उदा. इंदिरा गांधी व बांगला देशची. हा बघा उफराटा न्याय, नवरा बायकोला तोंडी तलाक देऊ शकतो, पण बायको नवर्‍याला तलाक देऊ शकत नाही, जणू चुकीचे फक्त बायकाच करू शकतात. समान हक्कसुद्धा असू नये?
श्रीधर हरकरे

आपल्याच ताटात घाण करणारे नतद्रष्ट
पाकच्या भूमीत घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करणे हे भारतीय जनमानसाने अनेक वर्षांपासून जोपासलेले स्वप्नच होते. गेली अनेक वर्षे भारतातील सामान्य जनता, सैन्य व पोलिस या दहशतवादाचे बळी ठरत आले. पण यावेळी प्रथमच दहशतवाद्यांना हल्ला करून नुकसान करण्याची संधी न देताच त्यांच्याच सुरक्षित गढीवर हल्ला करून नष्ट करण्याची कामगिरी आपल्या जवानांनी केली. सार्‍या भारतीयांची छाती आपल्या देेशाच्या, सैनिकांच्या आणि सध्याच्या सरकारच्या नेतृत्वाविषयीच्या अभिमानाने भरून आली. सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांनी जवानांचे व मोदी सरकारचे अभिनंदन केले. तरी मनात शंका होतीच की, या देशात एक नतद्रष्ट पंचमस्तंभी जमात आहे, ती या उज्ज्वल यशाला काही ना काहीतरी अपशकुन केल्याखेरीज कशी काय शांत आहे. पण नाही! अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपला भरल्या ताटात घाण करण्याचा कार्यक्रम केलाच. केजरीवाल, दिग्विजयसिंह व संजय निरुपम यांनी लष्कराच्या सर्जिकल अटॅकवर जाहीर शंका घेऊन आपली नीच कृती दाखवूनच दिली. त्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. भारतात अनेक लोक सीआयए किंवा आयएसआयच्या पॅरोलवर असले पाहिजेत.
अजय तेलंग
नागपूर