पॅराकमांडोजचे शौर्य भारताचे भूषण सैन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

0
192

जगातील सर्वात कठीण समजल्या जाणार्‍या जागतिक स्तरावर होणार्‍या कमांडो कॅब्रियन पट्रोल सरावात भारतीय सैन्याचे छाप पडली आहे. भारतीय सैन्याच्या गोरखा रायफल्सच्या जवानांनी या सराव शिबिरात सुवर्ण पदक पटकावले आहेत. वेल्समध्ये २०/१०/२०१६ ला पार पडलेल्या या स्पर्धेत विविध देशांमधील सैन्याचे पथक सामील झाले होते. त्यामुळे भारतीय सैन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ब्रिटिश आर्मी ऑफ वेल्सने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गोरखा बटालियनच्या आठ जवानांचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे. भारताच्या गोरखा रायफल्सच्या दुसर्‍या बटालियनमधील ८ जवानांचे अभिनंदन, त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या कार्यक्रमात गोरखा बटालियनच्या जवानांना कुकरी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कॅब्रियन पट्रोल सराव मोहीम वेल्समधील कॅब्रियन डोंगररांगांत पार पडते. या कमांडो मोहिमेत जगभरातील सैन्याची कमांडो पथके सामील होतात. मोहिमेमध्ये जवानांना ५५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. हा मार्ग अत्यंत खडतर असतो आणि ४८ तासांमध्ये त्यांनी हे अंतर पूर्ण करणे गरजेचे असते. यामध्ये जवानांना अनेक लष्करी आव्हानांचा सामना करावा लागतो. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांना सोबत दिलेले सामान आणि किट ज्याचे वजन ३५-४० किलो आहे ते बाळगावे लागते. यातील काही सामान हरवल्यास संघाचे गुण वजा होत जातात. सुवर्ण पदक विजेत्या संघाला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण, रौप्य पदक पटकावणार्‍या संघाला ६४ ते ७५ टक्के आणि कांस्य पदकासाठी ५५ ते ६४ टक्के मिळवणे गरजेचे असते.
सर्जिकल स्ट्राईकनंतर सगळ्या देशातर्फे भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले. अशा प्रकारचे स्ट्राईक हे आठ ठिकाणी कुपवाडा, पुरी, नवशेरा, केजी (जिथे मी एका ब्रिगेडचे नेतृत्व केले होते) या भागासमोर असलेल्या पाकिस्तानच्या दहशतवादी लॉचपॅडवर करण्यात आले होते. याविषयी अनेक ठिकाणी लेख लिहून आले आहे, पण सहभागी अधिकारी आणि सैनिक यांच्याविषयी काहीही माहिती प्रकाशित झाली नाही. या स्ट्रराईकमध्ये सामील झालेले सैनिक हे दोन प्रकारचे होते. इन्फंट्री बटालियनचे घातक प्लाटून आणि स्पेशल फोर्सेस म्हणजे भारतीय सैन्याच्या पॅराकंमांडो बटालियन त्यांचे सैनिक आणि अधिकारी यात सामील होते.
कमांडो विंगची १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका
प्रत्येक इन्फंट्री बटालियन त्यात साडे आठशे सैनिक असतात त्यामध्ये एक घातक प्लाटून म्हणजे कमांडो दस्ता तयार असतो. कमांडो प्लाटूनला कमांडो कोर्स करणे अनिवार्य असते व त्याशिवाय त्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. कमांडोंचे खडतर प्रशिक्षण कसे असते याचे चित्रीकरण आपल्याला नाना पाटेकर यांच्या प्रहार या सिनेमात पहायला मिळते, ज्यामध्ये मराठा रेजिमेंटचे चित्रण व बेळगावात कमांडो विंग मधले प्रशिक्षण आपण पाहू शकतो. कमांडो विंगने १९७१ च्या युद्धात मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण देऊन महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सहा बिहार, दहा डोगरा आणि इतर रेजिमेंटच्या कमांडो प्लाटूननी या स्ट्रराईकमध्ये सहभाग घेतला होता. सहा बिहार आणि दहा डोगरा या बटालियनचे उरीमध्ये झालेल्या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. त्यामुळे या दोन्ही बटालियनसच्या कमांडो प्लाटूनचा या हल्ल्यात मुद्दाम समावेश केला गेला. कारण यामुळे आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा जबाब देण्यासाठी त्यांना मदत मिळाली.
सीमापार करताना जिवंत परत येण्याची शक्यता फार कमी
मुख्य हल्ले हे नाईन पॅरा स्पेशल फोर्सेसआणि फोर पॅरा स्पेशल फोर्सेस (४ झअठअ डऋ) या बटालयिन्सच्या अधिकारी आणि सैनिकांनी केले आहेत. हे सैनिक मरून रंगाची बेरे कॅप घालतात व त्यांच्या छातीवर बलिदान नावाचा एक बॅच लावलेला असतो. पॅराकमांडोंना अतिशय कठीण प्रशिक्षणातून बाहेर पडावे लागते. पॅराकमांडोचा सैनिक ज्यावेळी सीमापार करतो तेव्हा त्याला जिवंत परत येण्याची शक्यता फार कमी आहे याची कल्पना असते. सीमा पार करताना आपला जीवनाचा पट डोळ्यांसमोरून येऊन जातो. बहुतेक सैनिक आपल्या नातेवाईकांकरता आपले शेवटचे पत्र पण लिहून ठेवतात. जर ते परत आले नाही तर ते पत्र त्यांच्या नातेवाईकांना पाठवले जाते. सुदैवाने या हल्ल्यात आपण एकही सैनिक गमावला नाही. पॅराकंमाडोची निर्णयक्षमता, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता अत्युच्च दर्जाची लागते. पॅराकमांडो बटालियनमध्ये येण्यासाठी भारतीय सैन्याच्या इन्फंट्री बटालियन्समधील सैनिक, अधिकारी इथे येऊ शकतात.
सातार्‍याचे शौर्य चक्र विजेते कर्नल संतोष महाडिक यांचा काश्मीरमधील कुपवाडामध्ये मृत्यू झाला. त्यांनीही दोन स्पेशल फोर्सेस बटालियनचे नेतृत्व केले होते. त्यांच्या वीर पत्नीने आता सैन्याची कठीण परिक्षा पास करून सैन्यात अधिकारी बनण्याकरता ओटीए चेन्नायीमधे प्रवेश केला आहे. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
देशाकरिता प्राण देण्यासाठी कधीही तयार
सर्वात पहिले प्रशिक्षण हे ९० दिवसांचे असते. पहिल्या दोन आठवड्यातच पन्नास टक्के सैनिक हे कठीण ट्रेनिंग करू शकत नाही म्हणून बाहेर पडतात. त्यापुढील दोन आठवड्यात आणखी २५ टक्के सैनिक बाद केले जातात. शेवटी तीन महिन्यात केवळ वीस टक्के सर्वात चांगले सैनिक टिकून राहातात. ज्यावेळी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते त्याच वेळेला त्यांना पॅरामिलिटरी सैनिकाचा पोशाख घालण्याची संधी मिळते आणि छातीवर बलिदान बॅच लावता येतो. या बॅचमध्ये पॅराकमांडोचे पंख आण सुरा असे चित्र असते. छातीच्या उजव्या बाजूला आपल्या नावाखाली हा बॅच असतो. याचा अर्थ असा की तुम्ही देशाकरिता प्राण देण्यासाठी कधीही तयार आहात, तुम्हाला सर्जिकल स्ट्राईककरिता/ स्पेशल ऑपरेशनकरिता पाठवले जाऊ शकते.
शारीरिक क्षमता किती उच्च दर्जाची असावी हे समजून घ्यायचे असेल, तर दहा किलोमीटरपासून साठ किलोमीटरपर्यंतचे अंतर आपल्याला पार करावे लागते आणि शरीराच्या वजनाच्या निम्मे वजन पाठीवर घेऊन रात्रीच्या वेळेला पळावे लागते. रात्रीच्या वेळेला आपण न दिसता शत्रूला हुडकून काढणे हे देखील करायचे असते. या प्रशिक्षणाचा दर्जा इतका उच्च आणि कष्टाचा असतो की सैनिक पुरता थकून गेलेला असतो. पण त्यामुळे उच्च दर्जाची शारीरिक व मानसिक क्षमता हासिल करता येते. या प्रशिक्षणादरम्यान कमीत कमी पाण्यावर कसे जगायचे, उपाशी राहून सुद्धा हल्ले कसे करायचे, शत्रूवर हल्ला कधी व केव्हा करायचा, शस्त्राचा वापर कसा केव्हा करायचा असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये डोंगराच्या कठीण भागातून जाणे, जंगलात लपून राहाणे, शत्रूवर स्फोटक पदार्थांचा वापर करून हल्ला करणे, अनआर्म्ड कॉम्बॅट, रात्रीच्या वेळेला रस्ता शोधणे किंवा आकाशातील तार्‍यांच्या मदतीने लक्ष्य गाठणे, या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.
फ्री फॉलच्या मदतीने हल्ले
पॅराकमांडोजना पॅराशूटच्या मदतीने सुद्धा विमानातून उड्या माराव्या लागतात. अतिशय उंचीवरून पॅराशूटच्या मदतीने उडी मारली जाते. त्यातील तीन चतुर्थांश अंतर फ्री फॉलच्या मदतीने खाली उतरावे लागते. एक हजार फूट उंचीवर पोहोचल्यावर पॅराशूट उघडण्यात येते. याला हॅलो ऑपरेशन म्हटले जाते. हाय अल्टिट्यूड लो ओपनिंग असे याला म्हणतात. यामुळे शत्रूला केव्हा हल्ला होत आहे हे शोधणे अतिशय कठीण जाते. म्हणून शत्रूला फसवण्यासाठी हॅलो ऑपरेशनचा वापर केला जातो. यावेळच्या सर्जिकल स्ट्राईकवेळीही हॅलो ऑपरेशनचा वापर केला गेला होता, असे वर्तमानपत्रामध्ये आले आहे. जेम्स बॉंडच्या चित्रपटात पॅराशूटच्या मदतीने शत्रूच्या गोटात प्रवास करतो त्याच धर्तीवरचा प्रवास हे पॅराकमांडोज करतात. आपल्या लक्ष्याच्या जवळ पोचल्यावर एक ते दोन किलोमीटर अंतरावर उतरून, पायी शत्रूवर हल्ला केला जातो. नेमके हेच सर्जिकल स्ट्राईकमध्येही करण्यात आले.
लक्ष्य दृष्टिक्षेपात आल्यावर आपल्याकडील अधुनिक शस्त्रांच्या जसे रायफल, लाईट मशीनगन, बॉम्ब, रॉकेट लॉंचरच्या मदतीने शत्रूचे तळ बरबाद केले जातात. लक्ष्य उद्ध्वस्त केल्यानंतर आपले पॅराकमांडो पायीच, मात्र वेगळ्या रस्त्याने परत आपल्या भूभागावर परत येतात. मात्र, शत्रूच्या नजरेला न पडण्याची काळजी घेत लपतछपतच यावे लागते. काही वेळा आपल्या हेलिकॉप्टरचा वापर करून सैनिकांना परत आणता येते. सर्जिकल स्ट्राईकच्या रात्री आपल्या सैनिकांनी रात्री ११.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ही कारवाई केली. दहशतवादी लॉचपॅड म्हणजे एलओसीमधील काही खेड्यांमध्ये पंचवीस ते तीस दहशतवादी भारतात प्रवेश करण्याकरिता लपले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना कंठस्नान घातल्यानंतर आपली घातक प्लाटून आणि पॅराकमांडोज आपल्या भूभागात परतले. अर्थातच त्यांना मदत करण्याकरिता शत्रूला वेगवेगळ्या रीतीने चकवा देण्यात आला. हल्ला न केलेल्या भागात तोफखान्याचा वापर करून शत्रूचे लक्ष विचलित केले. अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईकचे काम पार पाडले.
पॅराकमांडोज हे देशाचे महत्त्वाचे शस्त्र
पॅराकमांडोजचे प्रशिक्षण किती कठीण आहे, त्यांनी आत्तापर्यंत काय केले याची अत्यल्प माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचली आहे. वर्तमानपत्रातही त्याविषयी फार कमी माहिती आली आहे. पॅराकमांडोज हे देशाचे महत्त्वाचे शस्त्र आहे. त्यांना आपण सर्व आधुनिक शस्त्रसामग्री देऊन तयार ठेवले पाहिजे. या सैनिकांविषयी फार माहिती दिली जात नाही. पण हे सैनिक आपले काम करून आपल्या बराकीत येतात तेव्हा त्यांच्या नजरेस टीव्हीवर चाललेल्या चर्चा आणि वर्तमानपत्रातील बातम्या वाचायला मिळतात. आपल्याकडील काही राजकारणी व्यक्ती सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका व्यक्त करतात. ते वाचायला मिळाल्यावर पॅराकमांडोजना वाईट वाटतेच. सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका घेणे आणि सैनिकांचे मनोबल खालावेल अशा पद्धतीने चर्चा करणे नक्कीच टाळले पाहिजे.
आपल्या स्पेशल फोर्सेस या नक्कीच अत्युच्च दर्जाच्या आहेत. गरज लागेल तेव्हा पुन्हा ते देशासाठी नक्कीच लढतील पण एका सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानने चालवलेला दहशतवाद संपणार नाही. तो संपवण्यासाठी असे हल्ले भविष्यातही करावे लागतील. यापुढेही पॅराकमांडोज असलेल्या प्रत्येक सैनिकाला, अधिकार्‍याला अनेक शूरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाईन पॅराकमांडो, टू पॅराकमांडो यांना युनिट सॉर्ट सायटेशनने गौरवण्यात आले आहे. पॅराकमांडोची अधिक माहिती या दुव्यावर हींींिी://शप.ुळज्ञळशिवळर.ेीस/ुळज्ञळ/झरीर (डशिलळरश्र ऋेीलशी) वाचता येईल. २६-११ ला झालेल्या हल्ल्यात दहा दहशतवाद्यांपैकी आठ जणांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजीने मारले. हे सर्व सैनिक पॅराकमांडो आणि इन्फंट्री बटालियनमधून आलेले सैनिक आणि अधिकारी हेच होते.
एनएसजी आणि पॅराकमांडो ही आपल्याला अभिमान वाटणार्‍या स्पेशल फोर्सेस आहेत. आपण त्यांनी केलेल्या शौर्याचे कौतुक करणे गरजेचे आहे. कठीण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सैनिकांना जखमा होतात, अनेकांचे हातपाय तुटतात, अनेक जण कायमचे सैन्यातून बाहेर पडतात असे अनेक पॅराकमांडो आर्टिफिशियल लिंब सेंटर पुण्यातल्या पॅराप्लाजिक होम खडकी येथे आहेत. पॅराकमांडोजच्या बटालियन आणि आकाशातून पॅराशूटच्या मदतीने उड्या मारून शत्रूवर हल्ला करणार्‍या बटालियन आहेत. त्यांना आतापर्यंत अशोकचक्र, महावीरचक्र, वीर चक्र, कीर्तिचक्र, शौर्यचक्र, युद्धा सेवा शौर्य पदकाने गौरवण्यात आले आहे, म्हणून अशा उच्च दर्जाच्या सैनिकांचे कौतुक करणे गरजेचे आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन/९०९६७०१२५३