साप्ताहिक राशिभविष्य

0
1309

रविवार, ३० ऑक्टोबर ते शनिवार, ५ नोव्हेंबर २०१६

सप्ताह विशेष
•सोमवार, ३१ ऑक्टोबर ः दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, अभ्यंगस्नान, वहीपूजन, गोवर्धन पूजन, अन्नकूट, कार्तिक मासारंभ, महावीर जैन संवत् २५४३, गुजराती विक्रम संवत् २०७३ कीलकनाम संवत्सर प्रारंभ, सरदार वल्लभभाई जयंती. मंगळवार, १ नोव्हेंबर ः भाऊबीज, चंद्रदर्शन (चंद्रास्त सायंकाळी ७.०६), यमद्वितिया, यमपूजन, मंगळ मकर राशिप्रवेश सकाळी ८.३४, विश्‍वनाथबाबा पुण्यतिथी- डव्हा (वाशीम). बुधवार, २ नोव्हेंबर ः औद्योगिक सुरक्षा दिन, मुस्लिम सफर मासारंभ. गुरुवार, ३ नोव्हेंबर ः विनायक चतुर्थी, भद्रा प्रारंभ १९.४५. शुक्रवार, ४ नोव्हेंबर ः भद्रा समाप्त ८.५०, प्रल्हाद महाराज काळे पुण्यतिथी- साखरखेर्डा (बुलढाणा). शनिवार, ५ नोव्हेंबर ः पांडव पंचमी, कड पंचमी, तुळसीमाय पुण्यतिथी- धापेवाडा (नागपूर).

मेष : आठवणींची साठवण
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी मंगळ भाग्यातील धनू राशीत आहे. याशिवाय आठवड्यातील संपूर्ण ग्रहस्थितीचा विचार करता पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध आपणांस अधिक सुखावह जाईल, असे दिसते. मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी चिरस्मरणीय आठवणी साठवून ठेवाव्यात, असा हा काळ राहील. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा विविध आघाड्यांवर सरशी होणार आहे. मुलांकडून सुवार्ता, इच्छुकांना संतती योग, शेअ़र वा तत्सम बाबींतून लाभाचेही योग अनुभवास यावेत. प्रेमसंबंध, विवाह योग जुळून येण्याची शक्यता राहील. कार्यक्षेत्रात आपला वरचष्मा राहील. आरोग्य उत्तम राहील. पूर्वार्धात मात्र काहीसा मनस्ताप सहन करावा लागेल. शुभ दिनांक- ३०, ४, ५.

वृषभ : भाग्योदयाचे योग
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी शुक्र शनीसह सप्तमात आहे. एकंदर ग्रहस्थिती उत्तम असून अनेक शुभ व आकर्षक फले लाभण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच्या अनिश्‍चित व अस्थायी सुखावरील सावट दूर होऊ शकेल. आर्थिक आघाडीवर सुबत्ता राहण्याची शक्यता असतानाच हौसेखातर होणार्‍या अचानक मोठ्या खर्चाचे संकेतही मिळत आहेत. तरुणवर्गाला नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, भाग्योदयाचे योग यावेत. मात्र, सोबतच काहींना त्यांच्या जवळच्या मित्रमंडळी वा नातलगांबाबत काळजीजनक वातावरण निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. जोडीदाराच्या निवडीवर कुटुंबाची संमती मिळविण्यास हा काळ उत्तम राहू शकेल.
शुभ दिनांक- १, २, ३.

मिथून : कामाचे कौतुक
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी बुध हा रवी व चंद्रासह पंचमात व अस्तंगत आहे. त्यामुळे तो काहीसा संघर्ष, विलंब, अनिच्छा निर्माण करेल, असे वाटते. मात्र, त्याच वेळी षष्ठातील शनी नोकरीत प्रशंसा, कामाचे कौतुक, वरिष्ठांची मर्जी देऊ शकतो. आपली बाजू वरचढ होत असतानाच मात्र हाताखालच्या सहकार्‍यांकडून मानहानीचे, असहकाराचे, मनास बोचतील असे वर्तन घडण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करणे अवघड जाईल, तथापि, आपल्या कामाची दिशा, झपाटा बदलू न देता आगेकूच करण्यातच हित आहे. मुलांचे शिक्षण, नोकरी-व्यवसाय, विवाहसंबंधी कार्ये यात सुरुवातीस चालढकल घडू शकते. शुभ दिनांक- ३०, ४, ५.

कर्क : आवक वाढेल
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी चंद्र हा धनेश रवी व बुधासह सुखस्थानी आहे, विशेषतः नोकरी-व्यवसायासाठी हा उत्तम काळ ठरणार आहे. आपण आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज होेईल. कामाचे कौतुक, नवीन जवाबदारी, पदोन्नती, पगारवाढ, आकर्षक इन्सेंटिव्ह अशा स्वरूपात लाभ पदरी पडण्याची, आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांची मर्जी आणि सहकार्‍यांची साथ लाभेल. घरात काही शुभकार्ये ठरण्याची शक्यता असल्यामुळे आनंदात भरच पडेल. भूमी, घर, मोठे वाहन यांच्या खरेदीच्या योजना असल्यास त्यांना गती मिळू शकेल. प्रवासाच्या योजनांना वेग मिळेल. जोडीदाराचे मन राखण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक- १, २, ३.

सिंह : आर्थिक समाधान
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी रवी स्वतःच्या नावडत्या राशीतच व्येश चंद्र व धनेश बुधासह पराक्रमस्थानी आहे. हे बघता हा आठवडा आपणांस विशेषतः आर्थिक व कौटुंबिक समाधान दर्शविणारा ठरतो. वाढीव पैसे येतील तेव्हा त्याला अधिकचे पाय फुटण्याचीदेखील शक्यता राहील. मोठी खरेदी, अचानक लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरी- व्यवसायातील विरोधक डोके वर काढू शकतात, मात्र आपणांस त्यांच्यावर वचक ठेवता येईल. तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी लाभू शकतात. काहींना मात्र कुटुंबात काहीसा तणाव सहन करावा लागू शकतो, मात्र ते कपातले वादळ ठरू शकेल.
शुभ दिनांक- ३०, ३१, १.

कन्या : संमिश्र ग्रहमान
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी बुध अस्तंगत असून तो रवी आणि चंद्रसह धनस्थानातच आहे. या शिवाय एकंदर ग्रहस्थिती पाहता हा आठवडा बराचसा संमिश्र स्वरूपाचा आपणांस जाऊ शकतो. आठवड्याची सुरुवात आपणांस काहीशी तापदायक, मानापमानाच्या कात्रीत अडकवणारी, मनस्तापाचे प्रसंग अनुभवास आणणारी ठरू शकते. व्यवसायात अतिशय दगदग, धावपळ, अपेक्षाभंग होऊ शकेल. आपल्या मनातील योजनांना, हाती घेतलेल्या उपक्रमांना चालना देणारे मानसिक बळ उभारणे आपणांस कठीण होणार आहे. भलत्या वेळी तोंडघशी पाडण्याचा अनुभव काहींना येऊ शकतो. पदरचे मोडून खर्च करण्याच्या वृत्तीला लगाम घातला पाहिजे.
शुभ दिनांक- ३०, ३१, ४.

तूळ : मेहनतीला फळ
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी शुक्र शनीसह धनस्थानात आहे. यासह एकंदर ग्रहस्थितीवर नजर टाकल्यास हा आठवडा आपणांस उत्तम संधी देणारा असून तो काही लाभदायक क्षण पदरी पडण्याचे संकेत देत आहे. आपल्या मेहनतीला योग्य फळ मिळाल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे तरुणवर्गाला भवितव्य घडविण्यासाठी या काळात अधिकाधिक परिश्रम घ्यायला हवेत. ओळखीतून तसेच वरिष्ठांच्या सहवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. वडीलधार्‍या मंडळीचा सल्ला आपल्या योजना कार्यान्वित करताना अवश्य घ्या. धनविषयक लाभदायक हालचाली घडून येतील. विवाहेच्छू युवावर्गाला चांगले योग यावेत. भागीदारीची तसेच व्यावसायिक कर्जप्रकरणे मार्गी लागतील. शुभ दिनांक- ३०, ३१, १.

वृश्‍चिक : प्रतिष्ठा उंचावेल
या आठवड्याच्या आरंभी राशिस्वामी मंगळ धनस्थानी आहे. मात्र राशिस्थानी शनी आहे. त्याचा अडेलतट्टूपणा व असहकार्य मंगळाला फारसा मोकळेपणाने आपणांस लाभदायक देऊ शकेल याबाबत शंका आहे. विशेषतः जवळच्या वाटणार्‍या व्यक्तींकडूनच विश्‍वासघात, भ्रमनिरास असे अनुभव घेण्याची शक्यता नाकारता येेत नाही. त्यामुळे कोणावरही विश्‍वास टाकताना पुरेपूर खातरजमा करून घेणे फायद्याचे ठरेल. लाभस्थानातील गुरू काही अफलातून प्रयोगासाठी आपणांस प्रेरित करू शकतो व त्यातून हमखास यश मिळेल व कौतुकदेखील होईल. दरम्यान, कुटुंबात काही क्षणिक वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. ते टाळण्याचे प्रयत्न करा. लहान मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. शुभ दिनांक- १, २, ३.

धनू : निश्‍चिंत असाल
या आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्वामी गुरू दशमस्थानात, तर राशीत मंगळ मुुक्कामाला आहे. ही स्थिती आपणांस बव्हंशी उत्तम ठरणार असल्याने सध्याच्या काळात तरी प्रगतीच्या वाटचालीबाबत आपण निश्‍चिंत राहावयास हरकत नाही. नोकरी- व्यवसायात प्रगती, समाजात मान-सन्मान वाढणे, प्रतिष्ठा उंचावणे असले योग यामुळे निर्माण होत आहेत. सरकारी नोकरीत असतील त्यांना तर आठवड्याचा पूर्वार्ध निश्‍चितच सुखावह व महत्त्वाच्या नवीन संधी देणारा राहील. समाजकार्य, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनीदेखील या उपयुुक्त ग्रहयोगांचा लाभ पदरी पाडून घेतला पाहिजे. मनासारखी कामें घडून येतील. प्रतिष्ठा मिळेल. तीर्थाटन, सहलीसाठी सुखावह काळ. शुभ दिनांक- ३०, ४,

मकर : . सतर्क राहा
या आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्वामी शनी लाभस्थानात असला, तरी त्याचा स्थानेश मंंगळ व्ययस्थानात आहे. हा योग आपणांस शारीरिक व मानसिकदृष्ट्या विचलित करणारा आहे. मात्र भाग्यातून गुरू दिलासा देऊ शकेल. यासह एकंदर ग्रहस्थिती बघता हा काळ आपणांस काहीसा संघर्ष, मानसिक अस्वस्थता, प्रकृतीविषयक चिंता, कुटुंबात व नोकरी-व्यवसायात असमाधान दर्शविणारा आहे. त्यामुळे सध्या कोणतेही नवे धाडस करू नये व आहे त्यात समाधान मानून शांतपणे परिस्थितीला सामोरे जाण्याचे धोरण स्वीकारण्यास सुचवीत आहे. कुटुंबातील भांडणे विकोपाला जाणार नाही, याची काळजी घ्या. वाहने सांभाळून चालवावीत. संपूर्ण सतर्कताच यावर उत्तम उपाय आहे. शुभ दिनांक- ३१, १, २.

कुंभ : व्यवसायात प्रगती
या आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्वामी शनी दशमात तर त्याचा त्याचा स्थानेश मंगळ लाभस्थानात आहे. यामुळे शनी भाग्यवर्धक ठरणार आहे. वैयक्तिकदृष्ट्या शुभकारक घटना घडाव्यात. नोकरी-व्यवसायात प्रगतिपथावर राहाल, शत्रूंच्या कारवाया थांबतील, स्पर्धा-विरोधाचे वातावरण शमेल, मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. सन्मननीय व्यक्तींचा सहवास घडेल. काहींना प्रकृतीची काळजी घ्यावी लागू शकते. या आठवड्यातील ग्रहयोग व्यसनांपासून दूर राहण्यास सुचवीत आहेत. खानपानाचे पथ्य, औषधोपचाराचे वेळापत्रक सांभाळावयास हवे. वाहने सांभाळून चालवावीत. कोर्टकज्जाची प्रकरणे लांबू शकतात. त्यातून नाहक मनाचा त्रागा करून घेऊ नका. शुभ दिनांक- ३०, २, ५

मीन : महत्त्व वाढेल
या आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्वामी गुरू सप्तम स्थानात मुक्कामाला असून तो शुभसूचक आहे. याशिवाय अन्य ग्रहस्थिती पाहता काही अपेक्षित घटनाक्रम घडावेत, असे दिसते. नोकरी-व्यवसायात आपले महत्त्व वाढावे. आपल्या योजना कार्यान्वित होतील. काही कौटुंबिक प्रश्‍न सुटतील. मुलांची प्रगती व्हावी. नोकरीच्या शोधात असणार्‍या युवकांना चांगल्या संधी लाभतील. विवाहेच्छू युवक-युवतींना अनुरूप स्थळे लाभावीत. संततीची अभिलाषा बाळगणार्‍यांना हा काळ सुयोग्य ठरू शकतो. अष्टमातील नीच रवी प्रकृतीची काहीशी कुरबूर दर्शवितो. बदलत्या हवामानात प्रकृतीची काळजी घ्या. वाहने सांभाळून चालवा. व्यसनांपासून दूर राहा. शुभ दिनांक-२, ३, ४.

•मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६