अतर्क्य

0
266

कथा

दिवाळीचे दिवस! सारी मंडळी उत्साहात! संध्याकाळ महत्त्वाची. मी आणि आजी रांगोळीत हरवलो असायचो. तर्‍हेतर्‍हेचे डिझाइन्स आणि रंगरंगोटीचा कार्यक्रम चालायचा आमचा- आजीनं स्वच्छ, सुरेख सडासारवण केलेल्या अंगणात. अगदी समाधीच लागली असायची जणू आमची! पण, त्यानंतर मात्र सारं काम अगदी तुफान मेलसारखं भरधाव चालायचं- ती पडद्यावर पटपट, पटपट हालचालींची मजेदार दृश्यं दाखवतात न सिनेमात, तसं.
पणत्यांत तेल भरलं जायचं, वाती सारल्या जायच्या, ताटांमध्ये नीट गोलाकार रचून तयार ठेवल्या जायच्या पणत्या. मग माझा आवडता, महत्त्वाचा कार्यक्रम- हातपाय धुवून कपडे बदलण्याचा! तर्‍हेतर्‍हेची कारणं, निमित्तं, रुसवेफुगवे, हट्ट, थोडी चतुराई उर्फ चतरेेपणा वगैरे खर्च करून आई-पप्पांचं ‘एक किंवा दोन पुरेत’ गणित पार धुडकावून, उधळून लावून चांगले चार-पाच ड्रेसेस पदरी पाडून घेतलेले असत. त्यामुळे तबियत एकदम खुश असायची. हातपाय धुवायला कसा छान उत्साह वाटे. रुझ, लिपस्टिक, पावडर वगैरे सारे सोपस्कार आटोपून घातला एकदाचा नवा कोरा ड्रेस. वा, कित्ती छान वाटतंय्!
तिकडे आईनं पणत्या उजळून सारीकडे ओळीत मस्त ठेवल्या असतात. आमचे ड्रिलमास्तर आम्हाला रांगेत उभं करतात ना तशा. किती छान डोळे मिचकावत नाचत असतात ज्योती! मी एक गिरकी घेते आणि पणत्यांच्या रांगांमधून नाचत, उडत, डोळे मिचकावत फिरते. कमीजचा मोठ्ठा घेर मस्त फुगून गोल गिरकी घेतो. मी पुन्हा गोल फिरणार तोच,
‘‘ए बाईऽ, त्या पणत्यांच्या इतक्या जवळ अशी वेडीवाकडी नाचू, मुरडू नकोस. सरळ चाल जरा माणसांसारखी!’’
‘‘काऽय पप्पा, अगदी उत्साहभंग करता तुम्ही असं काहीतरीच बोलून! छान मजा करू द्या न जरा मनमोकळी!’’ मी फुरंगटून म्हणते.
‘‘पण मी म्हणते, इतकं वाकडंतिकडं न होता, अंग न मुरडता, साध्या सरळ हालचाली नाहीच करता येत का तुला?’’ आता आईपण पप्पांच्या सुरात सूर मिसळते.
तेवढ्यात आजी अंगणात येते. ‘‘आऽजीऽ, बघ न गं हेऽ!’’
‘‘अरे काय आहे रे हे? सणावाराचं काय उगाच बोलताय तिला? रांगोळी नाही दिसली का तुम्हाला तिची? किती सुंदर काढलीय बघा न जरा!’’ आजी जरा चढत्या पट्टीत बोलली.
‘‘हे बाकी खरं हं! रांगोळी खरंच छान काढतं हं माझं पिल्लू!’’ आई कौतुकानं म्हणाली.
‘‘हो ना. एकदम इतका वेळ ही अशी शांत बसून, स्वस्थ चित्तानं काही करू शकते हे खरंच वाटत नाही समोर दिसतं तरी! आणि पिल्लू ‘माझं’ काय म्हणतेस गं? ‘आमचं’ म्हण. आपल्या दोघांचं नाही का ते? तू एकटी काय करू शकली असतीस?’’ बाबा मिस्कीलपणानं आईला म्हणाले आणि ती एकदम गोरीमोरी झाली.
‘‘अहो, आई आहेत न समोर. काहीतरीच काय बोलता?’’
‘‘अरे! हे काय? आई, या फाटकाजवळच्या पणत्या एकदम कशा विझल्या एवढ्यात?’’ मी जोरात म्हणाले.
‘‘अगं बाई खरंच की! ही पाच पणत्यंाची उजवीकडची आणि चार पणत्यांची डावीकडची पूर्ण रांग विझली. चल चटकन पुन्हा लाव. मी तेल घालते.’’
‘‘ए, काय गं आईऽ! असं छान तयार झाल्यावर किती जिवावर येतं ते तेलकट काम करणं!’’ कुरकुरत मी लावल्या पुन्हा त्या पणत्या.
मग सारे जण छान अंगणातच बसलो खुर्च्या टाकून, निरनिराळे आकाशदिवे आणि फटाके पाहत. आईनं लक्ष्मीपूजनाची तयारी करून सार्‍यांना आत बोलावलं. मग आजीनं सांगितलं तसं आई आणि बाबांनी छान लक्ष्मीपूजन केलं. माझी वही, पुस्तक, पेन सारं ठेवलं होतं पूजेत. किती छान वाटतं नाही अशी विद्येची पूजा करायला? मीही वाहिलं न हळदकुंकू, अक्षता, फुलं वगैरे. आपल्या या अशा पद्धती किती छान आहेत. त्यामुळे अभ्यास करायलाही उत्साह वाढतो.
‘‘ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. अभ्यास म्हणजे देवी सरस्वतीची आराधना आहे,’’ असं आजी सांगते. पूजा झाल्यावर मी लाह्या-बत्ताश्यांचा बोकणा भरून पुन्हा अंगणात आले माझे फटाके घेऊन आणि लगेच बाकीही सारे आलेत बाहेर फटाके उडवायचे म्हणून. आणि पाहतो तर काय? पुन्हा सार्‍या बाहेरच्या पणत्या विझलेल्या! सार्‍यांनाच आश्‍चर्य वाटलं, पणत्यांमधलं तेल संपलेलं पाहून.
‘‘आता पुन्हा नका लावू हं त्या बाहेरच्या पणत्या. उद्या बघू काय ते! हं चला सोनुराणी, काढा तुमचे ते चक्र आधी आणि बॉम्बपण!’’ बाबा म्हणाले आणि मग आम्ही खूप वेळ चक्र, रॉकेट, फुलझड्या वगैरे उडवल्यात. मस्त मज्जा आली.
दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पुन्हा छान नवी रांगोळी काढली. नवा ड्रेस घातला. पणत्या ठेवल्या कालच्यासारख्याच बाहेर लावून. जरा अंधार पडल्यावर किती छान दिसत होत्या त्या लुकलुकणार्‍या ज्योती! थोड्या वेळानंतर आई आणि आजी आत घरात गेल्यात. बाबा अंगणातच आडोशाला उभे राहिले चुपचाप. मीही त्यांच्या बाजूला अगदी स्टॅच्यू!
काही वेळ गेला. माझा श्‍वास जरा जोरातच सुरू होता. त्या वाचलेल्या डिटेक्टिव्ह कथांमधल्या पात्रांसारखेच बाबा आणि मी शूर, वीर, धाडसी, बुद्धिमान डिटेक्टिव्ह वगैरे असल्यासारखे वाटत होतं मला. उत्साहामुळे थोडी गाफील असताना बोगनवेलीची एक खोडकर फांदी उगाच नाकाशी वळवळली आणि मला येऊ पाहणारी शिंक मला अशा काही कौशल्यानं आवरावी लागली की, काही विचारूच नका. नाही तर तेव्हाच्या तेव्हाच हकालपट्टी झाली असती माझी बाबांकडून. ‘जय स्वामी समर्थ’ म्हणून (अर्थात मनातल्या मनात) हात जोडले, मला तिथे सुरक्षित ठेवलं म्हणून. पण, डास चांगलेच दिवाळसण साजरा करत होते माझ्या रक्तावर. एकदा तर चुकून टाळी वाजणार होती माझी त्या डासांपायी! पण, हातावर हात पडण्यापूर्वीच सावध केलं मला स्वामी समर्थांनी. तेच हात हलकेच जोडून मी स्वामींना नमस्कार केला.
‘‘अगंबाई! ती बघा, ती दोन मुलं. आठ-दहा वर्षांची मुलगी आणि सहा-सात वर्षांचा मुलगा, चोर पावलांनी, चोरट्या नजरेनं इकडेतिकडे पाहत, प्लास्टिकचा एक डबा हातात घेऊन आलेत आणि भराभर भराभर त्यांनी पणत्या उचलून तेल त्या आपल्या डब्यात ओतलं आणि भर्रकन जायला वळणार तोच, चपळाईनं बाहेर पडून बाबांनी त्या मुलीला पकडलं तिचा हात गच्च धरून. तिचा तो साथीदार किंवा भाऊ चपळाईनं पळाला वेगानं.
‘‘चल, तुला पोलिसांच्याच ताब्यात देतो आता.’’ बाबा तिला संतापून म्हणाले.
‘‘नाई, नाई सायेब, चूक झाली. माफ करा.’’ ती रडत रडत म्हणाली.
‘‘आज पकडली गेलीस म्हणून ‘माफ करा’ नाही का? नाही तर रोज किती घरच्या पणत्यांमधलं तेल चोरत राहणार होतीस? तुझ्या तेलासाठी लावतो का आम्ही दिवे? नाव काय तुझं?’’
‘‘सगुणा.’’ ती डोळे पुसत म्हणाली.
‘‘वा! नाव तर अगदी झकास ठेवलंय आईबापांनी! नाव ‘सगुणा’ आणि लक्षणांनी पोरगी ‘दुर्गुणा.’’’
‘‘सायेब, सोडा न मला!’’ ती अगी गळा काढत बोलली.
‘‘कुठे रहातेस? चूप. रडण्याचं कारण नाही. चांगली बेरड आहेस.’’ बाबा संतापून म्हणाले, ‘‘मी सोडून दिलं की आणखी दुसर्‍या घरच्या पणत्यांतलं तेल चोरायला मोकळी, नाही का?’’
‘‘नाई, नाई सायेब. आता नाई करणार असं.’’ ती हुंदके देत म्हणाली.
‘‘मग आता का केलंस? तुला तेल चोरण्याकरता लावतो का आम्ही पणत्या? कुठे राहतेस?’’ बाबांचा इतका रागीट, करडा आवाज, तिचं ते हमसून रडणं यामुळे खरं तर आता मलाही रडू फुटत होतं.
‘‘बोल, कुठे राहतेस?’’ बाबा.
‘‘ते दूर आहे ते खोपटं. त्या मैदानाच्या पल्ल्याड. सायेब, माज्या आईला तेल पायजे हो. ती बायंतीन आहे पाच दिवसांची. बहीन झाली आहे आम्हाला. घरात तेलाचा थेंब नाई. आमचा बाबा निसता दारू ढोसते अन् तिले मारते. तिची पाठ-कंबर खूप दुखून रायली दोन दिवसापासून. मी तिला तेल चोळून देते कालपासून!’’ ती मुठीनं डोळे पुसू लागली.
आता बाबा एकदम स्तब्ध झाले. मला घळघळ रडू येऊ लागलं.
‘‘बाबा…’’ मी त्यांच्याकडे पाह्यलं आणि आवंढा गिळला.
‘‘सगुणा नाव आहे तुझं नाही का? थांब रडू नको.’’ तिच्या पाठीवरून त्यांनी हळुवारपणे हात फिरवला. मला म्हणाले,
‘‘सोनू घरातून तेल घेऊन ये एका बाटलीत आणि फराळाचंही आण थोडं पिशवीत बांधून.’’ मी लगेच आत गेले व आई, आजीला घाईघाईत सांगितलं आणि तेलाची बाटली आणि फराळाची पिशवी घेऊन बाहेर आले. आई-आजीपण आल्यात.
‘‘घे हे तेल. असं लोकांच्या पणत्यांमधलं तेल चोरून नेऊ नकोस पुन्हा.’’ बाबा म्हणाले तिला.
मी माझ्या हातातली तेलाची बाटली आणि पिशवी दिली तिला. आणि हे काय? अहो, ती चक्क माझ्या पाया पडली झट्‌कन!
‘‘अगंऽ अगंऽ, नको असं करू. ऊठ!’’ मी तिला उठवलं. आजवर कध्धीच, कुणीच माझ्या पाया पडलं नव्हत ना? मला काहीच सुचेना. जड पावलांनी चाललेल्या त्या पाठमोर्‍या सगुणाकडे, मूर्तिमंत दारिद्र्याकडे मी खिळल्यासारखी पाहत राह्यले आणि नंतर एकदम आजीच्या गळ्यात पडून मुसमुसायला लागले, त्या अतर्क्य जीवनदर्शनानं…!

उषा चौसाळकर/९४२३३३८०७४