बडे गुलाम अली ते गुलाम अली…

0
2968

खॉंसाहेब बडे गुलाम अली हे शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं एक फार मोठं नाव होतं. खॉंसाहेब हे पंजाबी मुसलमान. लाहोर या पंजाब प्रांताच्या राजधानीजवळ असलेलं कुसूर हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडील अलिबक्ष खॉं आणि काका काले खॉं हे दोघेही पतियाळा-कुसूर घराण्याचे उत्कृष्ट गायक होते. पण बडे गुलाम अलींना तालीम मिळाली, काका काले खॉं यांची. काले खॉं काही काळ काश्मीर दरबारचे राजगायकही होते. पण ते मैफली करीत देशभर फिरत असत. काही वर्षे ते मुंबईला, पुण्याला येऊन राहिले होते. त्यावेळी बडे गुलामही त्यांच्याबरोबर होते. काले खॉं यांनी आपल्या पुतण्याला गाणं आणि सारंगी वादन या दोन्ही कलांमध्ये निपुण केलं. काले खॉं च्या मृत्यूनंतर वडील अलिबक्ष यांनी मुलाला शिकवण्याचं मनावर घेतलं. त्यामुळे बडे गुलाम अली आपल्या स्वत:च्या गायकीत त्यांनी पतियाला-कुसूर घराण्याबरोबरच जयपूर, ग्वाल्हेर आणि धृपद या गायकींचंही मिश्रण केलं.
लाहोर, कराची, लखनौ, कोलकाता, हैद्राबाद इत्यादी तत्कालिन संगीत रसिकांची शहरं गाजवून बडे गुलाम अली मुंबईत उतरले ते तसे उशिराच, म्हणजे १९४४ साली. बडे गुलाम अलींचा जन्म १९०१ सालचा. म्हणजे यावेळी ते ४३ वर्षांचे होते. १९४४ साली मुंबईत, मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ‘विक्रमादित्य संमेलन’ भरलं होतं. बडे गुलाम अली लहान असताना काका काले खॉं यांच्यासह मुंबईत राहिलेले होते. पण मोठे होऊन गायक म्हणून मान्यता मिळाल्यावरचं त्यांचं पहिलं गाणं, या संमेलनात झालं आणि ते ऐकायला उत्सुकतेने समोर कोण बसले होते माहित्येय? भारतीय संगीतातले प्राचीन काळचे ऋषीच जणू असे खॉंसाहेब अल्लादियाखॉं, आफताब-ए-मौसिकी म्हणजे संगीतसूर्य फैय्याज खॉं आणि उस्ताद हाफीज अलिखॉं. बडे गुलाम अलींनी प्रथम ‘मारवा’ आणि मग ‘पूरिया’ असे राग गाऊन रसिकांना चकितही केलं आणि उत्कृष्ट गायनाचा भरपूर आनंद दिला. तेव्हापासून देशभर खॉंसाहेब बडे गुलाम अली हे नाव गाजू लागलं.
या घटनेनंतर तीनच वर्षांत पाकिस्तान हा नवा देश निर्माण झाला. बडे गुलामांचं कुसूर हे गाव, लाहोर शहर हे सगळंच पाकिस्तानात गेलं. बडे गुलाम अली बाकायदा पाकिस्तानचे नागरिक झाले. त्यांचं मुख्य घर लाहोर शहरात होतं; पण फाळणीचं वातावरण जरा स्थिरस्थावर झाल्यावर ते पूर्वीप्रमाणेच कराची, पतियाळा, जालंदर, अमृतसर, लखनौ, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता असे फिरत कार्यक्रम करू लागले.
आणि हे दौरे करत असातानाच खॉंसाहेबांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातला फरक कळायला लागला. ‘हरि ओम् तत् सत्’ असं एक भजन आहे. काश्मीरचे महाराज राजा हरिसिंग यांचे गुरू स्वामी सत्‌देव यांची ही रचना, खॉंसाहेबांचे वडील अलिबक्ष यांनी खुद्द स्वामीजींकडूनच शिकली होती. ती त्यांनी अर्थातच बडे गुलामांना शिकवली होती. बडे गुलाम अतिशय उत्कटतेने ती रचना सादर करत असत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात त्यांना ती रचना सादर करण्याची फर्माईश व्हायचीच. पण आता पाकिस्तानातल्या मैफलीत मुल्ला-मौलवींनी त्यांच्या या भजनाला आक्षेप घ्यायला सुरुवात केली. कारण… कारण ते हिंदू भजन होतं!
लाहोरमधल्या एका मैफलीचा किस्सा तर असा सांगितला जातो की, पाकिस्तानी राजवट ही अत्यंत अरसिक अशी औरंगजेबी राजवट होती याची खात्री पटावी. भारतीय रागदारी संगीतात विविध रागांच्या हजारो चीजा, ख्याल, ठुमर्‍या, ंहोर्‍या, कजर्‍या आहेत. त्यांचे बोल म्हणजे कवन किंवा शब्द मुख्यत: भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचं वर्णन करणारे आहेत. इतरही देवदेवतांची कवनं आहेत; पण मुख्य भर कृष्णावर आहे, कारण त्याला मुळी संगीत कलेचाच देव मानलं गेलेलं आहे. तर असं सांगतात की, लाहोरमधल्या त्या मैफलीत बडे गुलाम अलींनी ‘कौन गली गयो श्याम’ ही प्रसिद्ध ठुमरी गायला मन्ना डे यांच्या ‘आयो कहॉं से घनश्याम’ या चित्रपट गीतामुळे चांगली परिचित आहे.
तर बडे गुलाम अलींनी म्हणे ही ठुमरी सुरू केली आणि मैफलीतले काही बोकडदाढ्ये (म्हणजे बोकडाप्रमाणे दाढी ठेवून मिशी सफाचट केलेले) उठून उभे राहिले आणि खॉंसाहेबांना म्हणाले, ‘गाणं बंद करा.’ का? तर म्हणे, ‘हा पाकिस्तान आहे. इथे हिंदू देवाचं नाव घेऊ नका. कौनत गली गयो अल्ला, खुदा, परवरदिगार असं काही तरी म्हणा.’
असं म्हणतात की, त्या क्षणी बडे गुलाम अलींनी निर्णय घेतला की, लाहोर की इन गलियों में, आपला निभाव लागणं कठीण, तेव्हा भारत की गलियांच आपल्याला खरा आसरा देतील.
पण हे व्हावं कसं? कारण खॉंसाहेब मूळचेच लाहोरचे असल्यामुळे बाकायदा (सध्याच्या भाषेत बाय डीफॉल्ट) ते पाकिस्तानचे नागरिक होते. मग ते सारखे भारतात यायचे. ठिकठिकाणी मैफली करून रसिकांना आनंदी करायचे, स्वत:ही आनंदी व्हायचे. पण व्हिसाची मुदत संपली की, त्यांना परत जावंच लागायचं.
अशात एकदा त्यांची मैफल मोरारजी देसाईंच्या घरी झाली. मोरारजी त्यावेळी मुंबई प्रांताचे पंतप्रधान होते. त्या वेळेपर्यंत महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री हा शब्द, दोन्ही अस्तित्त्वात आलेले नव्हते. मलबार हिलवरच्या मोरारजींच्या बंगल्यातल्या त्या मैफलीनंतर खॉंसाहेबांनी खुद्द मोरारजींनाच गळ घातली की, ‘पाकिस्तानात माझा जीव घुसमटतोय. मला भारताचं नागरिकत्व मिळवून द्या.’ मोरारजींनी त्यांच्याकडून रीतसर अर्ज लिहून घेऊन, स्वत:च्या शिफारशीसह दिल्लीला पाठवला. १९५७-५८ साली खॉंसाहेब बाकायदा भारताचे नागरिक झाले.
मुहम्मद पैगंबर हे अरब होते. त्यामुळे अरब हे आद्य मुसलमान. अरबांनी क्रमाक्रमाने तुर्क, इराणी, इजिप्शियन, अफगाणी यांना बाटवलं. पण यापैकी कुठल्याही देशातल्या कोणत्याही बादशहाने, खलिफाने कलावंतांना त्रास दिल्याचं उदाहरण नाही. या सर्व देशांच्या संगीत, चित्रकला, खेळ यांच्या परंपरा आहेत नि त्या त्यांनी आजही जपलेल्या आहेत. भारतात हिंदू राजवट संपल्यानंतर घोरी, खिलजी, तुघलख, लोदी आणि मुघल अशा क्रमाने मुसलमानी राजवटी झाल्या. हे सगळेच बादशहा हिंदूंचे पक्के वैरी होते. पण त्यांनी कला-क्रीडा यांना, त्या इस्लाम विरोधी आहेत म्हणून बंदी केल्याचं उदाहरण नाही. एक औरंगजेब हाच असा निघाला की, त्याने आपल्या राज्यात संगीत-नृत्य-चित्र इत्यादी कलांवर चक्क बंदी घातली. आता पाकिस्तानला इतर बादशहांपेक्षा ही औरंगजेबी परंपराच पुढे चालवावीशी का वाटली? उत्तर स्पष्टच आहे. इस्लामचा आत्यंतिक अभिमान आणि हिंदूंचा आत्यंतिक द्वेष हेच औरंगजेबाचं जीवनध्येय बनलेलं होतं. पाकिस्तानच्या जन्माचं कारण आणि जीवनध्येय केवळ तेच आहे. आणि त्याचमुळे तो कला क्रीडा अशा जीवनातल्या आनंदाचाही द्वेष करतो. ब्रिटिश भारताचा वेगवान गोलंदाज महंमद निस्सार, रुस्तमे हिंद गामा पहिलवान, अभिनेत्री गायिका नूरजहॉं ही मंडळी फाळणीनंतर पाकिस्तानात गेली. पाकिस्तानने त्यांचं काय केलं? लोणचं घातलं! महंमद निस्सार आणि गामा निराश अवस्थेत मरण पावले. नूरजहॉं एकदा बोलून गेली, ‘संगीत हाच माझा देव आहे.’ झालं! तिच्यावर बहिष्कार पडला. का? तर इस्लामी राजवटीत एकच देव आहे. मग संगीत हा देव मानणं म्हणजे कुफ्र आहे. पाखंडीपणा आहे! अर्थात नूरजहॉं म्हणजे बडे गुलाम अली नसल्यामुळे तिने पाकिस्तानचे हुकूमशहा फिल्डमार्शल अयुबखान यांच्यावर मोहिनीअस्र सोडून आपला कार्यभाग साधून घेतला.
सध्याचे लोकप्रिय पाकिस्तानी गजल गायक गुलाम अली यांनाही राजकारणी आणि धार्मिक कट्टरवादी यांच्या दडपणाखाली वावरावं लागतं. मेहेंदी हसन यांनाही फार त्रास सहन करावा लागला होता. मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवणं हे पंजाब आणि सिंध या दोन्ही प्रांतात फार लोकप्रिय होतं. ते त्याला पतंगबाजी म्हणतात. पण मुल्ला-मौलवींनी या खेळावरच आक्षेप घेतला, का? तर हा खेळ म्हणे हिंदूंचा आहे!
असो. हिंदूंच्या आत्यंतिक द्वेषापोटी ज्यांनी जीवनातला आनंद हद्दपार करायचा ठरवलाय, त्यांना कोण रोखणार? पण आपण हिंदूंनी काय करावं? मेहेंदी हसन आणि विशेषत: गुलाम अलींच्या गजला अत्यंत सुंदर, श्रवणीय, आनंददायी असतात. आपण त्या ऐकाव्यात का? मला वाटतं ऐकू नयेत. कारण गुलाम अलींना कट्टरवाद्यांचा कितीही त्रास होत असला, तरी ते पाकिस्तानातच रहाताहेत. बडे गुलाम अलींप्रमाणे ते कायमचे भारतात आलेले नाहीत. तेव्हा शत्रूदेश जोपर्यंत आपलं वैर विसरत नाही, तोपर्यंत त्याच्या नागरिक कलावंतांनाही दूर ठेवावं. तुम्हाला काय वाटतं?

मल्हार कृष्ण गोखले